Milk Rate : दूध उत्पादकांचा खर्चही निघेना, डेअरीवाले खातायेत मलाई, भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची नाराजी
Milk Rate : सध्या राज्यात दुधाचे भाव तुफान वधारले आहेत. अनेक ठिकाणी म्हशीचे दूध गुणवत्तेनुसार 60 ते 90 रूपयांच्या घरात पोहचले आहे. पण यामध्ये शेतकर्यांना काहीच फायदा मिळत नसल्याची ओरड होत आहे.

राज्यात कोरोनानंतर दुधाचे दर सातत्याने वाढत आहे. गुणवत्तेनुसार दुधाचे भाव 60 ते 90 रुपयांच्या घरात आहेत. बाजारात दुधासाठी ग्राहकांचा खिसा कापल्या जात असला तरी शेतकर्यांना त्याचा काहीच फायदा होत नसल्याची ओरड होत आहे. पशुधन महाग होत आहे. चारा, कडबा महागला आहे. त्यात दूध संकलन करून दूध डेअरीला पोहचवले जाते. पण त्याचा शेतकऱ्यांना काहीच फायदा होत नाही. त्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याचा आरोप होत आहे. दूध डेअरवालेच मलई खात असल्याचा आरोप करण्यात येत आहे
28 रुपये लिटर भाव
सोलापूर जिल्ह्यातील करमाळयात जिल्हा दूध संघ तालुक्यात बंद असल्याने खाजगी दूध केंद्र शेतकर्याकडून केवळ 28 रुपये लिटर प्रमाणे दूध खरेदी करतात. तर त्या दूधावर प्रक्रीया केल्यानंतर त्याची विक्री मात्र 60 रुपये दराने होत आहे. त्यामुळे खाजगी दूध केंद्र चालवणारे मालामाल होत असले तरी दूध उत्पादक शेतकर्यांना मात्र ना नफा ना तोटा या तत्त्वावर दुग्ध व्यवसाय करावा लागत असल्याचे दिसते.




दूध उत्पादनाचा व्यवसाय आतबट्ट्याचा
वास्तविक दुग्ध व्यवसाय करताना पशुधनाची जोपासना हा मुख्य भाग आहे दूध दरवाढीसाठी हिरवा चारा,पेंड खुराक,औषधोपचार, वैरण, घास,पशुवैद्यकीय उपचारासाठी यासाठी शेतकऱ्यांना रोख पैसे मोजावे लागतात. त्यातच पशुखाद्य व खुराकांचे भाव दर तीन-चार महिन्याला वाढतात. मात्र दुधाचे दर जैसे थे राहत असल्याने हातात दमडीही राहत नसल्याचे तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी सांगत आहेत.
प्रति लिटर 60 रुपये हमीभाव देण्याची मागणी
एकीकडे पशुधनाचा सांभाळ करण्यासाठी पशुपालकांना मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत असताना दुसरीकडे चांगल्या प्रतीच्या दुधाला देखील योग्य दर मिळत नसल्याने दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे सरकारने प्रति लिटर दुधाला 60 रुपये हमीभाव द्यावा अशी मागणी दूध उत्पादकातून होत आहे.
असे आहेत पशुखाद्याचे दर
सरकी पेंड : 30 ते 33 रुपये प्रति किलो शेंगदाणा पेंड : 40 ते 45 रूपये प्रति किलो सुग्रास : 30 ते 35 रुपये प्रति किलो.