रब्बी हंगामात हरभरा पिकाचा सर्वाधिक पेरा, ‘असे’ करा व्यवस्थापन तरच उत्पादनात वाढ
रब्बी हंगामातील पेरण्या पूर्ण झाल्या असून आता पिकांची उगवण झाली आहे. उत्पादनवाढीसाठी शेतकरी एक ना अनेक पर्याय उपलब्ध करीत असताना मात्र, वातावरणातील बदल आणि अवकाळी पावसाचा परिणाम पिकांवरही झाला आहे. आता पावसाने उघडीप दिली असली तरी ढगाळ वातावरण कायम आहे. त्यामुळे हरभरासह इतर पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. आता पीक जोपासले गेले तरच उत्पादनात वाढ होणार आहे.
लातूर : ( Rabi season) रब्बी हंगामातील पेरण्या पूर्ण झाल्या असून आता पिकांची उगवण झाली आहे. उत्पादनवाढीसाठी शेतकरी एक ना अनेक पर्याय उपलब्ध करीत असताना मात्र, वातावरणातील बदल आणि अवकाळी पावसाचा परिणाम पिकांवरही झाला आहे. आता पावसाने उघडीप दिली असली तरी ढगाळ वातावरण कायम आहे. त्यामुळे ( chickpea crop) हरभरासह इतर पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. आता पीक जोपासले गेले तरच उत्पादनात वाढ होणार आहे. यंदा रब्बी हंगामात सर्वाधिक पेरा हा हरभऱ्याचा झाला आहे. शिवाय किडीचा धोकाही याच पिकाला असल्याने पिकाचे व्यवस्थापन कसे करावे याची माहिती शेतकऱ्यांना असणे गरजेचे आहे.
सर्वाधिक धोका घाटी अळीचा
हरभऱ्यावरील लहान लहान अळ्या सुरवातीला कोवळी पाने, कळ्या व फुले खातात. घाटे लागताच अळ्या घाटे कुरतडून नुकसान करतात. घाटे खात असताना त्या शरीराचा पुढील भाग घाट्यामध्ये तर बाकी भाग बाहेर ठेवून दाण्यांवर उपपिविका करतात. या अळीमुळे हरभऱ्याचे 5 ते 30 टक्यापर्यंत नुकसान होऊ शकते.
काय आहे उपाय ?
पिकाची पेरणी वेळेवर करावी. शिफारस केलेल्या वाणींचीच म्हणजेच फुले जी -12, बी.डी.एन.जी. 796, साकी – 9516 विश्वास, विजय विशाल विराट योग्य अंतरावर पेरणी करावी. हरभरा पिकांत आंतरपिक अथवा मिश्र पीक म्हणून जवस, कोथिंबीर, मोहरी या पिकांची लागवड करुन शेत हे तणविरहित ठेवावे लागणार आहे. पीक फुलोऱ्यात येताना पाच टक्के निंबोळी अर्क 25 किं.ग्रॅ. हेक्टरी याचा वापर करावा असे करूनही आठ ते दहा पतंग प्रति कामगंध सापळ्यात सतत आढळल्यास दुसरी फवारणी करावी यामध्ये एन्डोसल्फान 35 टक्के किंवा क्लोपायरिफॉस 25 मि.लि किंवा प्रोफेनोफॉस 25 मि.लि प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
हकभरा पिकाची मुळे कुरतडणारी अळी
या किडीचा प्रादुर्भाव हरभरा सोबतच टोमॅटो, भेंडी, बटाटा, मिरची, भोपळा व कांदा पिकांवर आढळतो. ही अळी पिकांचे शेंडे अथवा फांद्या कापते. काही ठिकाणी प्रादुर्भाव 30 टक्क्यांपर्यत असू शकतो अळी निशाचर असते, त्यामुळे ती दिवसा जमिनीत राहत व रात्री बाहेर येऊन जमिनीलगतच्या रोपांना कुरतडते.
उपाय : पिकास वेळोवेळी खुरपणी करावी किंवा पिकाला हलके पाणी द्यावे लागणार आहे, त्यामुळे जमिनीत दडून बसलेल्या अळ्या बाहेर येऊन पक्षांचे भक्ष बनतील. पाने पोखरनारी अळीचा प्रादुर्भाव पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेत कमी जास्त प्रमाणात आढळून येतो. ही अळी पाने पोखरून आतील हरितद्रव्यावर उपजिविका करते. यामुळे पानाच्या वरच्या बाजूस नागमोडी आकाराच्या रेषा निर्माण होतात व प्रादुर्भाव जास्त झाल्यास पानगळसुद्धा होऊ शकते. पाने पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव जास्त आढळून आल्यास एन्होसल्फान 15 मि.लि. किंवा कार्बावरील 20 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
मावा अळी
ही कीड हरभऱ्यासोबतच मूग, उडीद, तूर, भुईमूग, चवळी व वाटाणा इत्यादी पिकांवर आढळते. मावा अळी बहुसंख्येने राहून झाडावरील शेंडे, फांद्या, फुले व घाटे यातील रस शोषण करते. रोप अवस्थेत माव्याचा प्रादुर्भाव झाल्यास पाने आकसतात. त्यामुळे झाडाच्या वाढीचा जोम कमी होतो व झाडाची वाढ खुंटते. मावा शरीरातून मधासारखा चिकट पदार्थ बाहेर सोडतात. त्यामुळे पांनांवर काळ्या बुरशीची वाढ होऊन प्रकाश संश्लेशन क्रिया मंदावते.
उपाय : प्रतिकारक्षमता असलेल्या वाणांची निवड करावी. किडीचा प्रादुर्भाव जास्त आढळून आल्यास डायमेथोएट 10 मि.लि. किंवा ॲक्सिडीमेटॉन मिथाईल 30 मि.लि. प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे. अशाप्रकारे हरभऱ्यावरील नुकसानकारक किडींचे नियंत्रण करावे लागणार आहे. जेणेकरून उत्पादनात वाढ करता येईल.