Parbhani : महावितरणचा ‘शॉक’, कृषीपंपाच्या जोडणीशिवाय शेतकऱ्यास 32 हजाराचे वीजबिल
पालम तालुक्यातील नागनाथ खेडकर यांनी चार वर्षापूर्वी कृषी पंपाची जोड व्हावी म्हणून महावितरणकडे कोटेशन भरले होते. अनामत रक्कम म्हणून त्यांनी 7 हजार 948 रुपये अदा केले होते. त्यामुळे आता कृषीपंपाच्या माध्यमातून शेत शिवार हिरवागार करायचा आणि उत्पादनात वाढ करायची हे स्वप्न खेडकर यांचे होते.मात्र, गेल्या 4 वर्षापासून त्यांना वीजजोडणीची प्रतिक्षा लागलेली आहे.
परभणी : (MSEB) महावितरणचा मनमानी कारभार हा काही नवीन राहिलेला नाही. वाढीव बील, अनियमित विद्युत पुरवठा, रोहित्रांमध्ये बिघाड हे प्रकार तर नित्याचेच झाले आहेत. पण परभणीत अजबच प्रकार समोर आला आहे. (Agricultural Pump) कृषीपंपासाठी वीज कनेक्शन न देता वीजबिल मात्र, शेतकऱ्याच्या माथी मारण्यात आले आहे. पालम तालुक्यातील शेखराजूर येथील शेतकरी नागनाथ खेडकर यांच्या बाबतीत हा प्रकार घडलेला आहे. चार वर्षापासून ते कृषीपंपासाठी (Electricity connection) वीज जोडणी करण्याची मागणी करीत आहेत. वीज जोडणी दूरच त्यापूर्वीच त्यांना 32 हजाराचे बील देऊन महावितरणने शॉक दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोई-सुविधा सोडाच पण किमान लूट तरी करुन नये अशी मागणी होत आहे.
शेतकऱ्याच्या बाबतीत काय झाले?
पालम तालुक्यातील नागनाथ खेडकर यांनी चार वर्षापूर्वी कृषी पंपाची जोड व्हावी म्हणून महावितरणकडे कोटेशन भरले होते. अनामत रक्कम म्हणून त्यांनी 7 हजार 948 रुपये अदा केले होते. त्यामुळे आता कृषीपंपाच्या माध्यमातून शेत शिवार हिरवागार करायचा आणि उत्पादनात वाढ करायची हे स्वप्न खेडकर यांचे होते.मात्र, गेल्या 4 वर्षापासून त्यांना वीजजोडणीची प्रतिक्षा लागलेली आहे. कृषीपंपाची जोडणी तर अद्यापपर्यंत झालीच नाही पण त्यांना 32 हजाराचे बील आकारण्यात आले आहे. हे बील नेमके कशाचे याचे कोडे खेडकर यांना पडले आहे.
कशाचा आधारावर बिलाचा आकडा
नागनाथ खेडकर हे अल्पभूधारक आहेत. मात्र, हंगामी पिके घेण्यासाठी कृषीपंपाची गरज भासते. कृषीपंपाची जोडणी व्हावी म्हणून त्यांनी तब्बल 7 हजार 948 रुपये महावितरणकडे अदा केले आहेत. त्याची पावतीदेखील त्यांच्याकडे आहे. असे असतानाही कृषीपंपाची जोडणी तर झालेलीच नाही पण त्यांना 32 एवढे वीजबील आले आहे. रोहित्र मंजूर होऊनही जोडणी दिलीच नाही, मात्र आता महावितरण कडून अव्वाच्या सव्वा वीज बील खेडकर यांच्या माथी मारले आहे.हे बील रद्द करण्यासाठी आता खेडकर महावितरणचे उंबरठे झिजवत आहे. मात्र या शेतकऱ्याच्या कैफियतेस महावितरण कडून दाद दिली जात नाही.
चार वर्षापासून खेटे
कृषीपंपासाठी अनामत रक्कम अदा करुनही खेडकर यांना कृषीपंपाची जोडणी करुन देण्यात आलेली नाही. शिवाय 7 हजारहून अधिक अनामत रक्कम असूनही 32 हजाराचे बील दिलेच कसे असा सवाल उपस्थित होत आहे. महावितरणने दिलेले बील रद्द करावे अशी मागणी त्यांनी मुख्य कार्यालयात केली आहे. मात्र, त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. गेल्या चार वर्षापासून ते खेटे मारत आहेत. त्यामुळे त्यांचा प्रश्न मार्गी लागणार की नाही अशी शंका उपस्थित होत आहे. अभियंता आणि कर्मचारी यांच्या दुर्लक्षामुळेच शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.