Solapur : हंगामी पिके सोडा फळबागेतूनही नुकसानच, 10 एकरवरील द्राक्षबाग शेतकऱ्याने उखडली
फळबागातून चार पैसे मिळतील ही प्रत्येक शेतकऱ्याची अपेक्षा असते, त्याअनुशंगानेच पीक पद्धतीमध्ये बदल करुन वाकी शिवणी येथील शेतकरी सुरेश गायकवाड यांनी तब्बत 10 एकरामध्ये द्राक्षाची लागवड केली होती. त्यानंतर त्यांनी सलग दोन वर्ष उत्पादनही घेतले मात्र, गेल्या काही वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट आणि औषध उपचारावरच अधिकचा खर्च अशी स्थिती निर्माण झाली आहे.
सोलापूर : फळबागायतदार म्हणजे (Affluent farmers) सधन शेतकरी असा समज कायम राहिलेला आहे. (Seasonable Crop) हंगामी पिकापेक्षा बागायतीमधून उत्पादन अधिकचे निघते. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या तो शेतकरी सक्षम समजला जात होता. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे जिरायती शेतकऱ्यापेक्षा बागायतदारांचीच स्थिती अधिकची बिकट झाली आहे. याचा प्रत्यय सोलापुरातील वाकी शिवणी या शिवारात आला आहे. एका शेतकऱ्याने तब्बल 10 एकरावरील (Vineyard) द्राक्षाची बाग मोडली आहे. दरवर्षी घटत असलेले उत्पादन आणि वाढत असलेला खर्च याला त्रासून सुरेश गायकवाड या शेतकऱ्याने ट्रक्टरद्वारेच बाग उखडून टाकली आहे.
उत्पादन खर्चाचीही मारामार
फळबागातून चार पैसे मिळतील ही प्रत्येक शेतकऱ्याची अपेक्षा असते, त्याअनुशंगानेच पीक पद्धतीमध्ये बदल करुन वाकी शिवणी येथील शेतकरी सुरेश गायकवाड यांनी तब्बत 10 एकरामध्ये द्राक्षाची लागवड केली होती. त्यानंतर त्यांनी सलग दोन वर्ष उत्पादनही घेतले मात्र, गेल्या काही वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट आणि औषध उपचारावरच अधिकचा खर्च अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे 10 एकरात द्राक्ष बाग असतानाही कर्जाचा डोंगर हा वाढत असल्याने त्यांनी हे पाऊल उचलले आहे.
ट्रक्टरद्वारेच उखडली बाग
गेल्या दोन वर्षापासून तर अवकाळी पावसामुळे ऐन द्राक्ष तोडणीच्या गळती आणि रोगराईचा प्रादुर्भाव ठरलेलाच होता. त्यामुळे फळबागेपेक्षा हंगामी पिकांचे उत्पादन परवडले अशी धारणा गायकवाड यांची झाली. शिवाय यंदाही अतिरीक्त पावसामुळे उत्पादनाबाबत शाश्वती नव्हती म्हणून हंगाम सुरु होण्यापूर्वीच द्राक्ष बाग मोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. अखेर ट्रक्टरच्या सहाय्याने बाग वावराबाहेर टाकली आहे. शिवाय आता हंगामी पिकावरच भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मार्केटविना अधिकचे नुकसान
सुरेश गायकवाड यांनी द्राक्ष बाग लागवड करुन उत्पादनवाढीचा निर्धार केला खरा मात्र, निसर्गाचा लहरीपणा आणि बाजारपेठेतील घसरलेले दर या दोन्हीचाही फटका त्यांना सहन करावा लागला होता. वर्षाकाठी 12 लाखाचा खर्च आणि पदरी 3 लाखाचे उत्पादन यामुळे हा खर्च भरुन काढावा कसा असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. शिवाय त्याचा इतर पिकांवरही परिणाम होत असल्याने तीन वर्ष जोपासलेली बाग त्यांनी ट्रक्टरच्या सहाय्याने एका दिवसामध्ये वावराच्या बाजूला केली आहे.