PM Kisan Scheme : आता उरले चार दिवस, ‘ई-केवायसी’ कडे शेतकऱ्यांची पाठ, नंदुरबार जिल्ह्याची काय स्थिती?
‘ई-केवायसी’ हे ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष सीएससी केंद्रावर जाऊन करावे लागणार आहे. अधिकतर शेतकरी हे सीएससी केंद्रावरच ही प्रक्रिया करीत आहेत. मात्र, या सेंटरवर शेतकऱ्यांना तासंतास बसावे लागत आहे. कधी साईट जाम तर ई-केवीसी ची प्रकिया सुरु असतानाच अचानक साईट बंद होते. शेतकऱ्यांच्या हाताचे ठसे उमटत नसल्याने केवासीला मुकावे लागत आहे.
नंदुरबार : (PM Kisan Scheme) पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना 31 ऑगस्टपर्यंत (e-KYC) ई-केवायसी हे पूर्ण करावे लागणार आहे. यासंदर्भात राज्य आणि केंद्र सरकारने वेळोवेळी आवाहनही केले आहे. शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर मात्र, योजनेचा 12 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार नाही. त्यामुळे ही प्रक्रिया करणे महत्वाचे आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्यासाठी 4 वेळेस मुदतवाढ देण्यात आली आहे. असे असताना (Nandurbar) नंदुरबार जिल्ह्यामध्ये केवळ 52 टक्केच शेतकऱ्यांनी ई-केवायसी करुन घेतले आहे. अद्यापही एकूण शेतकऱ्यांपैकी निम्मे शेतकरी हे या प्रक्रियेपासून वंचित आहेत. 31 ऑगस्ट ही शेवटची मुदत असून शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन केले आहे.
…म्हणून ई-केवायसीची अट
केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरु केलेल्या पीएम किसान योजनेला आता 5 वर्ष पूर्ण होत आहेत. वर्षाकाठी 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जात आहे. चार महिन्यातून एकदा ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जात आहे. मात्र, जे लाभार्थी नाहीत ते देखील योजने कागदपत्रांची जुळवाजुळव करुन निधी खात्यावर जमा करुन घेत होते. ही बाब सरकारच्या निदर्शनास आल्यानंतर ई-केवायसी ची अट घालण्यात आली होती. त्यामुळे अपात्र शेतकरी कोण आहेत त्यांच्याकडून आतापर्यंत जमा केलेली रक्कमही वसूल केली जात आहे. भविष्यात सरकारची फसवणूक होऊ नये म्हणून ही ‘ई-केवायसी’ ची अट घालण्यात आली आहे.
नंदुरबार जिल्ह्याची काय आहे स्थिती?
जिल्ह्यात आतापर्यंत योजनेंतर्गत नोंदणी झालेल्या लाभार्थ्याच्या ई-केवायसीचे काम अन्य जिल्ह्याच्या तुलनेत कमी आहे. केवळ 52 टक्केच शेतकऱ्यांनी ई- केवायसीची प्रक्रिया झाली असून त्यामुळे दोन दिवसांत 59 हजार 223 शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण करण्याचं मोठे आव्हान प्रशासन समोर आहे. याकरिता 31 ऑगस्ट ही अंतिम मुदत असणार आहे. ऐनवेळी शेतकऱ्यांची गडबड होऊ नये म्हणून वेळेपूर्वीच ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने देखील केले आहे.
‘ई-केवायसी’ नेमक्या अडचणी काय?
‘ई-केवायसी’ हे ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष सीएससी केंद्रावर जाऊन करावे लागणार आहे. अधिकतर शेतकरी हे सीएससी केंद्रावरच ही प्रक्रिया करीत आहेत. मात्र, या सेंटरवर शेतकऱ्यांना तासंतास बसावे लागत आहे. कधी साईट जाम तर ई-केवीसी ची प्रकिया सुरु असतानाच अचानक साईट बंद होते. शेतकऱ्यांच्या हाताचे ठसे उमटत नसल्याने केवासीला मुकावे लागत आहे. शिवाय गरजेचे असलेले बायोमेट्रिक हे दोन ते तीन दिवसच सुरळीत सुरु झाले पण आता समस्या निर्माण होत आहेत.