आता तुरीच्या विम्याचा प्रश्न ऐरणीवर, विमा कंपन्यांची टाळाटाळ, प्रशासनाचा मात्र पाठपुरावा
खरीप हंगामातील अंतिम पिक असलेल्या तुरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने तुरीचा जागीच खराटा झाला आहे. मराठवाड्यातील तूर पिकाचे 50 टक्के पेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानभरपाईची मागणी होऊ लागली आहे. मात्र, अगोदरच उदासिन असलेल्या पीक विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे.
नांदेड : (Kharif season) खरीप हंगामातील अंतिम पिक असलेल्या तुरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने (loss of toor crop) तुरीचा जागीच खराटा झाला आहे. (Marathwada) मराठवाड्यातील तूर पिकाचे 50 टक्के पेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानभरपाईची मागणी होऊ लागली आहे. मात्र, अगोदरच उदासिन असलेल्या पीक विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. शिवाय काही जिल्ह्यांमध्ये प्रशासनही कारवाई करीत नसल्याने शेतकऱ्यांनी काय भूमिका घ्यावी असा प्रश्न उपस्थित झाला आहे. परभणींच्या जिल्हाधिकारी यांनी मात्र, पंतप्रधान पीकविमा योजनेतील मध्यम हंगाम प्रतिकूल परिस्थिती तरतुदीनुसार विमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यांवर 25 टक्के अग्रिम नुकसान भरपाई जमा करावी, असे आदेश दिले आहेत.
तूर पिकाचे असे झाले नुकसान
खरीप हंगाम बहरात असताना सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा परिणाम तूर वगळता इतर पिकांवर मोठ्या प्रमाणात झाला होता. मात्र, या अतिवृष्टीनंतर तुरीचे पीक हे शेंगांनी लगडले होते. त्यानंतरही शेतरऱ्यांनी बुरशीनाशकाच्या फवारण्या केल्या. आता शेंगापोसून तूर काढणीची तयारी सुरु असतनाच झालेल्या अवकाळी पावसामुळे व वातावरणातील बदलामुळे हे पीक जागीच वाळत आहे. ऐन काढणीच्या प्रसंगीच मर रोगाचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे आता काढणीही परवडणार नाही. 50 टक्केपेक्षा अधिकचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रतिकूल परिस्थिती तरतुदीनुसार विमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यांवर 25 टक्के रक्कम अदा करण्याची मागणी केली जात आहे.
नांदेड जिल्ह्यात 71 हजार हेक्टरावर तुरीचा पेरा
तूर हे खरिपातील आंतरपिक आहे. मात्र, काढणीसाठी अधिकचा काळ लागत असल्याने याचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे. नांदेड जिल्ह्यात 71 हजारावर पेरा झाला होता. मात्र, मध्यंतरीच्या अवकाळी पाऊस व वातावरणातील बदलामुळे खरिपातील या शेवटच्या पिकाचेही नुकासान झाले आहे. मात्र, नुकसानभरपाईच्या अनुशंगाने ना विमा कंपनीने कोणती कारवाई केलेली नाही ना प्रशासनाने. याशिवाय परभणी येथील जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी रिलायन्स विमा कंपनीला नुकसानभरपाईचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नुकासनीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असतानाच आता तुरीच्या पंचनाम्यांची मागणी होत आहे.
शेतकऱ्यांनी काय करावे?
संभाव्य नुकसान भरपाई ठरविण्यासाठी तूर पिकांच्या एकूण विमा संरक्षित क्षेत्राच्या 5 टक्के क्षेत्राचे सर्वेक्षण येत्या 3 दिवसांच्या आत विमा कंपनी तसेच कृषी विभागाच्यावतीने केले जाणार आहे. त्यानुसार पात्र ठरणाऱ्या अधिसूचित महसूल मंडलांसाठी अशी प्रक्रिया ही करावीच लागणार आहे. तर शेतकऱ्यांना क्रॉप इंशुरन्स अॅप डाउनलोड करून त्यामध्ये विमा संरक्षित तूर पिकाच्या नुकसानीची माहिती फोटोसह अपलोड करावी लागणार आहे. शिवाय काही अडचण आल्यास 18001024088 वर तक्रार नोंद करायची आहे. एवढेच नाही तर विमा कंपनीच्या जिल्हा, तालुका कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह तक्रारही नोंदवता येणार आहे.