Kharif Season: अतिवृष्टीतून बचावलेल्या सोयाबीनवर या रोगाचा प्रादुर्भाव, काय आहे उपाययोजना?
पावसाच्या उघडीपीनंतर खरीप हंगामातील पिकांची वाढ जोमात झाली आहे. शिवाय सोयबीन हे पीक आता फुलोऱ्यात आले आहे. मात्र, पावसाने दिलेली ओढ आणि आता केवडा रोगाचा प्रादुर्भाव यामुळे शेतकऱ्यांसमोर नवे संकट निर्माण झाले आहे. फुलोऱ्यात असताना वातावरण पोषक राहिल्यास उत्पादनात वाढ होते पण आता पाण्याची आवश्यकता आणि त्यातच केवड्याचा प्रादुर्भाव यामुळे थेट उत्पादनावर परिणाम होईल असे बोलले जात आहे.
नांदेड : (Kharif Season) खरीप हंगाम मध्यावर आला तरी संकटाची मालिका ही सुरुच आहे. लांबलेल्या पावसामुळे पेरण्या महिनाभर उशीराने झाल्या होत्या. शिवाय पेरणी होताच तब्बल 45 दिवस (Heavy rain) पावसामध्ये सातत्य होते. त्यामुळे खरीप पिके जोपासली जाणार की नाही याबाबत साशंका उपस्थित केली जात होती. मात्र, गेल्या 10 दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने पिके जोमात वाढत होती. पण नैसर्गिक संकटे कमी म्हणून की काय आता सोयाबीनवर किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. खरीप हंगमातील मुख्य पीक असलेल्या (Soybean Crop) सोयाबीनवर केवडा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सध्याचे ढगाळ आणि दमट वातावरणामुळे या रोगाच्या विळख्यात सोयाबीन सापडले आहे. त्यामुळे जोमात असलेले पीक पुन्हा कोमात जाऊ नये म्हणून शेतकरी अधिकचे पैसे खर्ची करुन फवारणी कामावर भर देत आहे. कृषी विभागाकडूनही योग्य मार्गदर्शन मिळावे अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
सोयाबीन फुलोऱ्यात, उत्पादनावर परिणाम
पावसाच्या उघडीपीनंतर खरीप हंगामातील पिकांची वाढ जोमात झाली आहे. शिवाय सोयबीन हे पीक आता फुलोऱ्यात आले आहे. मात्र, पावसाने दिलेली ओढ आणि आता केवडा रोगाचा प्रादुर्भाव यामुळे शेतकऱ्यांसमोर नवे संकट निर्माण झाले आहे. फुलोऱ्यात असताना वातावरण पोषक राहिल्यास उत्पादनात वाढ होते पण आता पाण्याची आवश्यकता आणि त्यातच केवड्याचा प्रादुर्भाव यामुळे थेट उत्पादनावर परिणाम होईल असे बोलले जात आहे. तर दुसरीकडे उन्हामध्येही वाढ होत असल्याने आता पाण्याचे नियोजनाबरोबर या रोगराईचा बंदोबस्त करावा लागणार आहे.
काय आहे उपाययोजना?
केवड्याचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी लागवडीसाठी उपलब्ध असलेले प्रमाणित प्रतिकारक बियाणे गरजेचे आहे. दाट लागवड किंवा जास्त खते देणे टाळावे लागणार आहे. किमान एक वर्षासाठी तरी सोयाबीनचा इतर पिकांची फेरपालट केल्यास केवडा रोगाची घटना कमी होऊ शकतात. पुढील वर्षात हे रोग होण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी संक्रमित पिकाचे अवशेष गाडून टाकावे लागणार आहे.
अतिवृष्टीनंतरही पावसाची प्रतिक्षा
यंदा जुलै ते 15 ऑगस्टच्या दरम्यान, राज्यात सर्वाधिक पाऊस नांदेड जिल्ह्यात झाला होता. पावसामुळे पिकांचेच नाहीतर शेतजमिनीचे देखील नुकसान झाले होते. शिवाय खरीप हंगामातील पिकांसाठी पावसाची आवश्यकताच भासणार नाही असे चित्र होते. पण आता वाढत्या उन्हामुळे खरिपातील सर्वच पिकांनी माना टाकल्या आहेत. आता दोन दिवसांमध्ये पावसाने हजेरी लावली नाहीतर पाण्याविना पिकांचे नुकसान अटळ आहे. त्यामुळे 15 दिवसांपूर्वी अधिकच्या पावसामुळे पिके पाण्यात होती तर आता तीच पिके पाण्याविना करपणार अशी अवस्था निर्माण झाली आहे.