सर्जा-राजा : ‘सर्जा’मुळे घरात समृध्दी, शेतकऱ्याने जाणीव ठेऊन केला दशक्रिया विधी
शेतकरी आणि बैलजोडीचं नातं महाराष्ट्राला नव्याने सांगण्याची गरज नाही. शेतकरी पीक हे तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळतो तर बैलजोडी पोटच्या मुलाप्रमाणे. आतापर्यंत गाईच्या डोहाळे केल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या असतील पण जिल्ह्यातील सिरसाळा येथील शेतकऱ्याने बैलाचा दशक्रिया विधी केला आहे.
बीड : शेतकरी आणि बैलजोडीचं नातं महाराष्ट्राला नव्याने सांगण्याची गरज नाही. शेतकरी पीक हे तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळतो तर बैलजोडी पोटच्या मुलाप्रमाणे. आतापर्यंत गाईच्या डोहाळे केल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या असतील पण जिल्ह्यातील सिरसाळा येथील शेतकऱ्याने बैलाचा दशक्रिया विधी केला आहे. ज्याच्यामुळे घराला समृध्दी मिळाले त्याचा विसर कसा पडेल या भावनेतून बाळासाहेब काळे या शेतकऱ्याने हा विधी करुन गाव जेवण दिले होते. 25 वर्ष काळ्या आईची सेवा करुन सर्जाचे 25 डिसेंबर रोजी वृध्दापकाळाने निधन झाले होते. त्यानुसार 4 जानेवारी त्यांनी हा विधी केला आहे.
बैलजोडीमुळेच घराला समृध्दी
काळाच्या ओघात शेतीला यांत्रिकिकरणाची जोड मिळाल्याने सर्वकाही सोईस्कर झाले आहे. पण 25 वर्षापूर्वी शेती मशागतीसाठी आणि अन्य कामासाठी बैलजोडीशिवाय पर्यायच नव्हता. सर्जा-राजा शेतात राबल्यामुळे घरात समृध्दी आली असल्याचे बैलमालक बाळासाहेब काळे यांनी सांगितले आहे. सर्जा कायम मनात घर करुन राहिल. पोटच्या मुलाप्रमाणेच त्याचा सांभाळ केला होता. पण दुर्देवाने गत महिन्यात त्याचे निधन झाले म्हणूनच हा दशक्रिया विधी केल्याचे काळे यांनी सांगितले आहे.
गाव जेवण अन् चौकाचौकात बॅनर
सर्जाच्या दशक्रिया दिवशी सर्वकाही विधी करुन बाळासाहेब काळे यांनी गावाला जेवण दिले होते. याच दिवशी सिरसाळा गावातील चौकाचौकात सर्जाचे भावपूर्ण श्रध्दांजलीचे बॅनर झळकत होते. त्यामुळे गावातच नाही पंचक्रोशीत बैल आणि शेतकरी यांच्यातील नात्याची चर्चा झाली होती. शिवाय सिरसाळा हे गाव महामार्गावरच असल्याने सर्जाचे बॅनर येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते. सर्वकाही विधीवत करुन सर्जाच्या आत्म्याला शांती लाभो आणि हा बैल आमच्या कायम आठवणीत राहणार असल्याचे काळे यांनी सांगितले आहे.
25 बैलाचे संगोपन
बैलजोडी सांभाळण्याची एक हौस शेतकऱ्याला असते. पण एकच बैलजोडी 25 वर्ष सांभाळण्याचे काम काळे यांनी केले आहे. कुटूंबाची परस्थिती बेताची असताना दावणीला असलेल्या या सर्जा-राजाच्या जोडीमुळे घराच समृध्दी आल्याची त्यांची भावना होती. काळ बदलत गेला पण कधी बैल विक्रीचा विचारही मनात आला नाही. 25 सांभाळ करुन त्याच सर्जाचा अंत्यविधी करण्याची नामुष्की काले कुटूंबियावर ओढावली होती. त्यामुळेच त्यांनी हा कार्यक्रम केला शिवाय सर्जा कायम आठवणीत राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.