Rabi Season : सरासरीचा टक्का गाठला पण मुख्य पिकाला बाजूला सारुन, मराठवाड्यातील पिकांची काय आहे स्थिती?
खरीप अंतिम टप्प्यात तर रब्बी हंगामाच्या सुरवातीलाच धोक्यात होती. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका नाही म्हणलं तरी रब्बी हंगामातील पिकांनाही बसलेला आहेच. एकतर महिनाभर उशिराने रब्बी हंगामातील पेरण्या झालेल्या आहेत असे असतानाही डिसेंबर अखेरपर्यंत मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिकच्या क्षेत्रावर पेरा झाला आहे. मात्र, या हंगामातील मुख्य पीक असलेल्या ज्वारीलाच शेतकऱ्यांनी यंदा बाजूला केलेले आहे
औरंगाबाद : खरीप अंतिम टप्प्यात तर रब्बी हंगामाच्या सुरवातीलाच धोक्यात होती. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका नाही म्हणलं तरी रब्बी हंगामातील पिकांनाही बसलेला आहेच. एकतर महिनाभर उशिराने रब्बी हंगामातील पेरण्या झालेल्या आहेत असे असतानाही डिसेंबर अखेरपर्यंत मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिकच्या क्षेत्रावर पेरा झाला आहे. मात्र, या हंगामातील मुख्य पीक असलेल्या ज्वारीलाच शेतकऱ्यांनी यंदा बाजूला केलेले आहे. ज्या पिकांमधून अधिकचे उत्पन्न त्यावरच भर शेतकऱ्यांनी दिला आहे. मराठवाड्यात आतापर्यंत 21 लाख हेक्टरावर रब्बी पिकांचा पेरा झाला असून यामध्ये हरभरा सर्वाधिक क्षेत्रावर आहे.
अशी आहे रब्बी हंगामातील पिकांची स्थिती
यंदा मराठवाड्यातील सर्व शेतकऱ्यांच्या आशा रब्बीवर टिकून आहेत. मराठवाड्यातील सर्व आठ जिल्ह्यांत रब्बीचे सरासरी क्षेत्र 16 लाख 91 हजार हेक्टर आहे. प्रत्यक्षात सरासरीच्यापेक्षा अधिकच्या क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. गहू, मका पिकाचीही अपेक्षित क्षेत्राच्या पुढे जाऊन पेरणी झाली आहे. पेरणी झालेल्या रब्बी ज्वारीवर काही ठिकाणी अमेरिकन लष्करी अळीचा प्रादूर्भाव आहे. गव्हाचे पीक वाढीच्या व बऱ्याच ठिकाणी पोटरीच्या अवस्थेत आहे. गव्हाची स्थिती समाधानकारक आहे. हरभरा घाटे लागण्याच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी घाटे अळीचा प्रादूर्भाव दिसून आला आहे. त्यामुळे आता उर्वरीत काळात योग्य जोपसना केल्यावरच पीक पदरात पडणार आहे.
सर्वकाही रब्बी हंगामावरच अवलंबून
अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा परिणाम रब्बी हंगामातील पिकांवर झालेला असला तरी आता गहू, हरभरा, मका, राजमा बहरात आहेत. खरीप हंगामाचे तर अतिवृष्टीमुळे न भरुन निघणारे नुकसान झाले होते. त्यामुळे अजूनही मराठवाड्यातील शेतकरी हा अडचणीतच आहे. यातच फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे आशा केवळ रब्बी हंगामातील पिकांवरच आहेत. यंदा मुबलक प्रमाणात पाणी आहे. शिवाय शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांना नव्हे तर ज्यामधून अधिकचे उत्पन्न पदरी पडेल अशाच पिकांचा पेरा केला आहे. मध्यंतरीचे अवकाळीचे संकट सोडले तर सध्या सर्वच पिके ही जोमात आहेत. त्यामुळे उत्पादन वाढीची शेतकऱ्यांना आशा आहे.
लातूर कृषी विभागात हरभरा पिकावरच भर
लातूर कृषी विभागातील 5 जिल्ह्यांत रब्बी ज्वारीची 74 टक्के, तर औरंगाबाद कृषी विभागातील तीन जिल्ह्यांत 77 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गव्हाची लातूर कृषी विभागात सरासरीच्या 96 टक्के, तर औरंगाबाद कृषी विभागात सरासरीच्या दीडपटीपेक्षा जास्त 165 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. हरभऱ्याची औरंगाबाद कृषी विभागात सरासरीच्या 182 टक्के, तर लातूर कृषी विभागात सरासरीच्या 183 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. आकडेवारीनुसार शेतकऱ्यांनी ज्वारीला बाजूला सारत गहू आणि हरभरा पिकावरच भर दिला आहे.