Banana : केळीला विक्रमी दर, दोन वर्ष नुकसानीचे यंदा कशामुळे बदलले दराचे चित्र?
गेल्या दोन वर्षात केळीमधून उत्पन्न तर सोडाच पण झालेला खर्चही शेतकऱ्यांच्या पदरी पडलेला नव्हता. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागणीत घट झाल्याने उत्पादकांना कवडीमोल दरात केळी विकावी लागली तर कोरोनाबरोबर केळींच्या बागांवर करप्याचा प्रादुर्भाव होता. त्यामुळे उत्पादनात घट आणि दरही कवडीमोल अशा दुहेरी संकटात केळी उत्पादक होते. केळीला बारामाही मागणी असते पण कोरोना आणि बाजारपेठेतील चित्र यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी केवळ निराशा पडली होती.
नांदेड : एकीकडे पावसाने (Kharif Season) खरीप हंगामातील सर्वाधिक नुकसान हे नांदेड जिल्ह्यामध्ये झाले आहे तर दुसरीकडे याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे चित्र आहे. कारण जिल्ह्यात उत्पादित होत असलेल्या (Banana Production) केळी यंदा प्रथमच विक्रमी दर मिळत आहे. आतापर्यंत दरात वाढ झाली तरी 2 हजार ते 2 हजार 100 पेक्षा अधिकचा दर मिळालेला नव्हता. मात्र, उत्तर भारतामध्ये मागणी वाढल्याने प्रति क्विंटल 2 हजार 500 रुपये असे दर मिळत आहेत. लागवडीपासून असे दर प्रथमच मिळाला असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे श्रावण महिन्यामध्ये दरात आणखी वाढ होईल अशी शक्यताही वर्तवली जात आहे. हंगामाच्या सुरवातीपासूनच (Banana Rate) केळीला चांगला दर मिळालेला आहे. उत्पादन घटल्याने मागणीत वाढ होत आहे. त्यामुळेच हा बदल होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.
दोन वर्षातील नुकसान निघणार का भरुन?
गेल्या दोन वर्षात केळीमधून उत्पन्न तर सोडाच पण झालेला खर्चही शेतकऱ्यांच्या पदरी पडलेला नव्हता. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागणीत घट झाल्याने उत्पादकांना कवडीमोल दरात केळी विकावी लागली तर कोरोनाबरोबर केळींच्या बागांवर करप्याचा प्रादुर्भाव होता. त्यामुळे उत्पादनात घट आणि दरही कवडीमोल अशा दुहेरी संकटात केळी उत्पादक होते. केळीला बारामाही मागणी असते पण कोरोना आणि बाजारपेठेतील चित्र यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी केवळ निराशा पडली होती. अनेकांनी तर केळी बागा मोडीतही काढल्या होत्या.
उत्पादनात घट, दरात वाढ
सध्या बाजारपेठेत मागणी कायम असली तरी दरम्यानच्या काळात निसर्गाच्या लहरीपणाचा फटका देखील बागांना बसलेला आहे. घटत्या उत्पादनाबरोबर लागवडीचे क्षेत्रही नांदेड जिल्ह्यामध्ये कमीच झाले आहे. याचा थेट परिणाम उत्पादनावर झाला असून आता मागणीत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील अर्धापूरी, मुदखेड, नांदेड, हदगाव या तालुक्यामध्ये केळीचे उत्पादन घेतले जाते. वाढत्या मागणीमुळे या भागातील केळीला 2 हजार 500 रुपये क्विंटल दर मिळत आहे. पहिल्यांदाच अशाप्रकारे दर मिळाला आहे. मागणीत वाढ कायम राहिली तर दरात आणखी वाढ होणार आहे. यातच आता श्रावण महिना सुरु होत असल्याने मागणी वाढणार आहे.
अशी झाली दरात सुधारणा
यंदा केळीचा हंगाम हा मे महिन्यापासून सुरु झाला आहे. हंगामाच्या सुरवातीलाच केळीला 1 हजार 600 ते 1 हजार 700 रुपये क्विंटल असा दर मिळाला होता. त्यामुळे दरात वाढ होणार याबाबत शेतकरी हे आशादायी होते. शिवाय व्यापाऱ्यांकडून मागणी ही वाढ होती. जूनमध्ये 1 हजार 800 ते 2 हजार असा भाव मिळाला तर जुलैमध्ये आता हाच भाव थेट 2 हजार ते 2 हजार 500 पर्यंत येऊन ठेपला आहे. त्यामुळे दोन वर्षाच्या संघर्षानंतर आता कुठे केळी उत्पादकांमध्ये समाधान आहे.