Weather Forecast: नवीन वर्षाची सुरुवात पावसाने, महाराष्ट्रातील या भागांत वादळीवारे अन् गारपीटचे संकट
Weather Forecast: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात पाऊस आणि गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच नवीन वर्षाच्या सुरुवातीला देशात पाऊस पडणार आहे.
Weather Forecast: महाराष्ट्रातील वातावरणात गेल्या तीन, चार दिवसांपासून बदल झाला आहे. मागील आठवड्यात पडलेली कडाक्याची थंडी गेली आहे. आता राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरण आहे. त्यातच शुक्रवारी धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर भागांत गारपीट आणि वादळी वाऱ्यांचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात पाऊस आणि गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच नवीन वर्षाच्या सुरुवातीला देशात पाऊस पडणार आहे.
नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी ढगाळ वातावरण होते. त्यामुळे निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांना धडकी भरली आहे. सकाळपासूनच आकाशामध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे द्राक्ष उत्पादकांवर आता नवे संकट आले आहे. विदर्भातील वातावरणातही बदल झाला आहे. अकोल्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अकोला, तेल्हारा, अकोट, बाळापुर आणि पातुर तालुक्यात तूरळक हलका पाऊस पडला आहे. तसेच 27 आणि 28 डिसेंबर रोजी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस अन् गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
मराठवाड्यातील वातावरण ढगाळ आहे. जालना जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून ढगाळ वातावरण असल्यामुळे रब्बी हंगामातील तूर हरभरा आणि गहू या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. बदलत्या वातावरणामुळे ही पिके धोक्यात आली आहे. जालना जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केला असून गारपीट आणि वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
🟠 ऑरेंज अलर्ट: भारतीय हवामान विभागाने दि. २७ डिसेंबर रोजी:✦ धुळे ✦ जळगाव ✦ नाशिक ✦ अहिल्यानगर जिल्ह्यांच्या काही भागात गारपीट आणि वादळी वारे व विजांच्या कडकडाटाचा इशारा दिला आहे. अधिक माहिती: https://t.co/FwpiTSoP1n#Dhule #Nashik #Jalgaon #Ahilyanagar pic.twitter.com/n8rgTxh5M8
— राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण महाराष्ट्र राज्य (@SDMAMaharashtra) December 26, 2024
प्रशासनाकडून शेतकऱ्यांना सूचना
राज्यातील बदललेल्या वातावरणामुळे शेतकऱ्यांनी शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा, बाजार समितीतही शेतमाल विक्रीला आणल्यास काळजी घ्यावी, वीज व गारांपासून वाचण्यासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, विजा चमकताना झाडाखाली थांबू नये, मोबाईल बंद ठेवावा, अशा सूचना जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आल्या आहेत.
नवी दिल्लीत धुके असणार
हवामान खात्याच्या अंदाजानुसार नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला नवी दिल्लीत धुके असणार आहे. त्यामुळे मैदानी कार्यक्रम आयोजित करणे कठीण होऊ शकते. नवी दिल्लीत गेल्या सहा वर्षांपासून नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला तापमानाचा पारा ५ अंश सेल्सिअस किंवा त्याहून कमी आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने उत्तर भारतात थंडी वाढणार आहे. हवामानशास्त्र विभागाने 26 डिसेंबर 2023 ते 8 जानेवारी 2024 असा दोन आठवड्यांचा हवामान अंदाज जारी केला आहे. या कालावधीत पाऊस आणि थंडी असणार आहे.