खुरकूताचा प्रादुर्भाव वाढला अन् लसीचा तुटवडा भासला, काय आहे उपाययोजना?
लसीकरण मोहिमही राबवली जाते. मात्र, गेल्या वर्षीपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॅाकडाऊन यामुळे खंड पडला होता. यंदा ही मोहिम अधिक प्रभावीपणे राबवण्याची आवश्यकता होती. पण पशुसंवर्धन विभागाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
परभणी : ऐन हिवाळ्यात जनावरांना लाळ्या खुरकूताचा धोका निर्माण होत असतो. त्याअनुशंगाने (immunization important) लसीकरण मोहिमही राबवली जाते. मात्र, गेल्या वर्षीपासून (Corona) कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॅाकडाऊन यामुळे खंड पडला होता. यंदा ही मोहिम अधिक प्रभावीपणे राबवण्याची आवश्यकता होती. पण पशुसंवर्धन विभागाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. कारण लाळ्या खुरकूताचा प्रादुर्भाव वाढत असतानाच लस उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे.
परभणी जिल्ह्यात 3 लाख 98 हजार पशुधनास लस देण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, त्या प्रमाणात लसीचा पुरवठाच झाला नाही. त्यामुळे हिवाळा निम्म्यावर आला असतानाही मोहिमेला गतीच मिळालेली नाही. लाळ्या खुरकूत हा संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे त्याचा प्रतिबंध वेळीच करणे गरजेचे आहे. मात्र, यंदाही विलंब होणार असल्याने धोका हा वाढलेलाच आहे.
हे आहेत प्रतिबंधात्मक उपाय
* आजही ग्रामीण भागात जनावराने अधिकची लाळ गाळली तर चप्पल जीभेवर घासली जाते. मात्र, असे न करता जर या आजाराची साथच सुरु असेल तर जनावरांना चरण्यासाठी बाहेर सोडू नये. किंवा ज्या जनावराला आजार झाला आहे त्याच्या शेजारी निरोगी जनावर हे बांधू नये किंवा त्याचा चाराही त्याला देऊ नये कारण लाळ्या आजार हा लाळेपासूनच पसरतो. * लाळ्या खुरकत झालेल्या जनावरांपासून निरोगी जनावरे ही वेगळी बांधणे आवश्यक आहे. शिवाय सार्वजनिक ठिकाणी पाणी न पाजता त्याची स्वतंत्र सोय करावी * ज्या ठिकाणी या आजाराने प्रादुर्भाव झालेली जनावरे बांधलेली असतात ती जागा दिवसातून किमान एकदा जंतुनाशकाने स्वच्छ धुवावी. * जनावरांचे दूध काढण्याचे भांडी धुण्याच्या सोड्याने व गरम पाण्याने धुऊन घ्यावीत. भांड्यांचे निर्जंतुकीकरण होईल व रोगप्रसार टळेल. * जनावरांना लसीकरण केल्यास हा रोग शक्यता होत नाही. * लाळ्या खुरकूत आजाराचे नियंत्रणासाठी लसीकरण हे सप्टेंबर आणि मार्चमध्ये करावे.
कोरोना त्यात प्रशासनाची उदासिनता
मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने गतवर्षीची लसीकरण मोहिमच झाली नव्हती. त्यामुळे यंदा तरी हिवाळा सुरु होण्यापूर्वी लसीकरण झाले तर संकट टळणार आहे. म्हणून महिन्याभरापूर्वीच अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्यात लसीकरणाला सुरवात झाली होती. मात्र, मराठवाड्याती परभणी, औरंगाबाद जिल्ह्यात लसीकरण झाले नसल्याने हा संसर्गजन्य आजार वाढत आहे. शासनाकडून लसीचा पुरवठाच झालेला नाही. लसीची मागणी करण्यात आली असून पुढच्या आठवड्यापासून लसीकरणाला सुरवात होणार असल्याचे पशुसंदर्धन विभागाचे डॅा. पी.पी. नेमाडे यांनी सांगितले आहे.
कसे असणार आहे नियोजन?
लसीचा पुरवठा होण्यास विलंब झाला आहे. पण पुढील आठवड्यात पुरवठा होणार असून 78 पशुचिकित्सालयाच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये लसीकरण केले जाणार आहे. स्थानिक पातळीवर यंत्रणा सज्ज आहे. पुरवठा होता लसीकरण मोहिम राबवली जाणार असल्याचे डॅा. नेमाडे यांनी सांगितले आहे.