बीडमध्ये पावसामुळे सोयाबीनचा दर्जाही ढासळला अन् दरही घसरला
उडीद, मूगाची काही प्रमाणात काढणी झाली असली तरी मुख्य पीक सोयाबीन हे पाण्यातच होते. त्यामुळे उत्पादनात तर घट होणारच आहे पण पदरी पडलेलं सोयाबीन अतिरीक्त पावसामुळे डागाळलेले आहे. याचा परिणाम आता सोयाबीनच्या दरावर होऊ लागला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरुवातीला आवक झालेल्या सोयाबीनला तब्बल 11 हजाराचा दर मिळाला होता. मात्र, आता सोयाबीनची विक्री केवळ 5 हजार रुपये प्रमाणे होत आहे.
महेंद्रकुमार मुधोळकर बीड : खरिप हंगामातील पिके अंतिम टप्यात असताना झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उडीद, मूगाची काही प्रमाणात काढणी झाली असली तरी मुख्य पीक सोयाबीन हे पाण्यातच होते. त्यामुळे उत्पादनात तर घट होणारच आहे पण पदरी पडलेलं सोयाबीन अतिरीक्त पावसामुळे डागाळलेले आहे. याचा परिणाम आता सोयाबीनच्या दरावर होऊ लागला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरुवातीला आवक झालेल्या सोयाबीनला तब्बल 11 हजाराचा दर मिळाला होता. मात्र, आता सोयाबीनची विक्री केवळ 5 हजार रुपये प्रमाणे होत आहे.
बीड जिल्ह्यात खरीपाचे क्षेत्र 7 लाख 50 हजार हेक्टर एवढे आहे तर सोयाबीन हे मुख्य पीक असून यंदा 2 लाख 83 हजार हेक्टरावर सोयाबीनचा पेरा झाला होता. जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र हे दिवसेंदिवस घटत असून पोषक वातावरणामुळे सोयाबीनचे क्षेत्र वाढत आहे. यंदाही सोयाबीनचे विक्रमी उत्पादन होईल असा अंदाज बांधला जात होता. मात्र, गतआठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या अर्थकारणाचे गणितच बिघडले आहे.
नगदी पीक म्हणून सोयबीनला महत्व आहे. शिवाय जिल्ह्याच्या लगतच बाजारपेठही असल्याने उत्पादन घेतले जाते. यंदा मात्र सर्वकाही सुरळीत असताना पावसाने न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. सोयाबीनचे दर थेट निम्म्यावरच आल्याने आता सोयाबीनची विक्री करावी की साठवणूक हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
मात्र, हे दर स्थिर राहणार नाहीत शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीची गडबड न करता योग्य दराची वाट पाहणे फायदेशीर राहणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत. सध्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक सुरु आहे. परंतू, पावसामुळे डागाळलेले सोयाबीन बाजारात येत आहे.
कापसाला फाटा देत सोयाबीनचा पेरा
बीड जिल्ह्यात सोयाबीन हे खरीपातील मुख्य पिक आहे पण कापसाचीही लागवड मोठ्या प्रमाणात होती. गेवराई, माजलगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पन्न घेतले जात होते. मात्र, काढणीसाठी मजूरांची टंचाई आणि कापसाचा परिणाम हा इतर पिकावरही होत असल्याने शेतकरी आता सोयाबीनवरच भर देत आहेत. त्यामुळेच यंदा 2 लाख 83 हजार हेक्टरावर सोयाबीनची पेरणी झालेली आहे.
लातूरच्या बाजार समितीमध्येही घटली सोयाबीनची आवक
सोयाबीनची आवक ही झपाट्याने वाढत होती मात्र, दर घटत असल्याने आवक ही कमी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून 40 ते 45 हजार कट्टे सोयाबीन हे लातूर, उस्मानाबाद, बीड, कर्नाटक, सोलापूर या भागातून दाखल होत होते. कमी होत असलेल्या दराची धास्ती शेतकऱ्यांनी घेतली असून सध्या सोयाबीनची साठवणूक केल्याचे फायद्याचे म्हणत बाजारपेठेकडे पाठ फिरवली आहे. शनिवारपर्यंत सोयाबीनची आवक ही वाढलेली होती. मात्र, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दरात घसरण झाल्याने आता कमी झाली आहे. बुधवारी केवळ 5 हजार कट्टे लातूरच्या बाजार समितीमध्ये दाखल झाले होते. त्यामुळे काही प्रमाणात दर वाढले होते. बुधवारी सोयाबीनला सरासरी 6200 क्विंटल प्रमाणे दर मिळालेला होता. (Soyabean damage in Beed due to rain, quality also deteriorated and rates fell)
संबंधित बातम्या :
उभारणीपासून 14 वेळा भरले मांजरा धरण, काय होता उद्देश आणि सध्याचे वास्तव
….म्हणून राज्य सरकारला ई-पीक पाहणीची गरज भासली, पडद्यामागची गोष्ट
पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटली, शेतकऱ्यांचा माल, व्यापाऱ्यांना फायदा