महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केंद्रीय कृषीमंत्र्यांनी दिली Good News, या योजनेसाठी मुदत वाढवली
Soybean Procurement : १३ लाख ६८ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी आतापर्यंत झाली आहे. ही खरेदी अजून सुरु राहणार आहे. महाराष्ट्र सरकारने सोयाबीन खरेदीची मुदत ३१ जानेवारीपर्यंत वाढण्याची मागणी केली आहे.
Soybean Procurement : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी केंद्र सरकारकडून आली आहे. राज्यातील सोयाबीन खरेदी सुरूच ठेवण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी परवानगी दिली आहे. सोयाबीन खरेदीची मुदत १३ जानेवारी रोजी संपली होती. ती वाढवण्यास मोदी सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
सोयाबीन खरेदीसाठी १३ जानेवारीपर्यंत मुदत असल्यामुळे अनेक खरेदी केंद्रावर तीन-चार दिवसांपासून रात्रंदिवस शेतकरी रांगा लावून थांबले होते. त्यानंतर सर्वच शेतकऱ्यांचा सोयाबीन नाफेडला घेता आला नाही. त्यामुळे आता मुदतवाढ देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सोयाबीन खरेदी ३१ जानेवारीपर्यंत वाढवण्याचे निर्देश केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिले आहे.
महाराष्ट्र सरकारची विनंती मान्य
राज्यात ऑक्टोबरपासून सोयाबीन, मूग, उडदाला हमी दर मिळावा यासाठी नाफेडकडून हमी केंद्रे सुरू करण्यात आली होती. १५ ऑक्टोबरपासून राज्यात सोयाबीन खरेदी सुरू झाली. त्याची मुदत १३ जानेवारी रोजी संपणार होती. परंतु महाराष्ट्र सरकारने सोयाबीन खरेदीची मुदत वाढवून ३१ जानेवारी करण्याची मागणी केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे केली. ही मागणी मान्य करण्यात आली.
याबद्दल बोलताना केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले की, १३ लाख ६८ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी आतापर्यंत झाली आहे. ही खरेदी अजून सुरु राहणार आहे. महाराष्ट्र सरकारने सोयाबीन खरेदीची मुदत ३१ जानेवारीपर्यंत वाढण्याची मागणी केली आहे. त्यानुसार सोयाबीन खरेदीस ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले.
नाफेडकडे बारदान नव्हते…
नाफेड केंद्रावर नियोजन नसल्याने राज्यातील अनेक केंद्रावर सोयाबीन घेऊन आलेल्या वाहनांच्या केंद्राबाहेर लांब-लचक रांगा दिसत होत्या. चार दिवसांपासून शेतकऱ्यांना नाफेड केंद्रावर रात्र जागत मुक्काम करावा लागत होता. अनेक केंद्रावर बारदान नसल्याने शेतकऱ्यांना स्वतः बारदाना विकत घेऊन सोयाबीन विकण्याची वेळ आली होती. बाजारात सोयाबीनला भाव नसल्यामुळे नाफेडकडून खरेदी केली जात होती. खासगी व्यापारी कवडी मोल भावात सोयाबीन खरेदी करून शेतकऱ्यांची लूट करीत होते.