यशोगाथा : उसापेक्षा सोयाबीन बिजोत्पदनात अधिकचा गोडवा, कंधारच्या शेतकऱ्याने करुन दाखविले
शेती व्यवसायात मोठे धाडस म्हणून त्यांनी 30 गुंठ्यात उस लागवड करण्याचा निर्णय घेतला. ऐवढेच नाही तर जमिनीची मशागत करुन उस लागवड करण्याचा दिवसही ठरला मात्र, ऐन वेळी तयार केलेल्या या शेतावर सोयाबीन बिजोत्पादनाचा सल्ला त्यांना कृषी अधिकाऱ्यांनी दिला तोच उत्पादन वाढीचा टर्निंग पॅाईंट ठरला.
लातूर : शेती व्यवसायात मोठे धाडस म्हणून त्यांनी 30 गुंठ्यात उस लागवड करण्याचा निर्णय घेतला. ऐवढेच नाही तर जमिनीची मशागत करुन उस लागवड करण्याचा दिवसही ठरला मात्र, ऐन वेळी तयार केलेल्या या शेतावर (Seed production process) सोयाबीन बिजोत्पादनाचा सल्ला त्यांना कृषी अधिकाऱ्यांनी दिला तोच उत्पादन वाढीचा टर्निंग पॅाईंट ठरला. शेती व्यवसयात नियोजन महत्वाचे असते मात्र, एकदा घेतलेला निर्णय यशस्वी करुन दाखवला आहे तो (Nanded) नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील येलूर येथील तरुण शेतकरी मोतीराम शिंदे यांनी.
बिजोत्पादनातून उत्पादन ही संकल्पनाच अजूनही शेतकऱ्यांना मान्य नाही. पेरणीच्या चार दिवस आगोदर विकतेचे बियाणे घ्यायचे आणि जमिनीत गाढायचे एवढेच काय ते शेतकऱ्यांना माहिती. पण 30 गुंठ्यावर सोयाबीन बिजोत्पादनाचा कार्यक्रम करुन शिंदे यांनी हजारो रुपये कमावले आहेत.
उसापेक्षा कष्ट कमी अन् उत्पादन अधिक
उस लागवडीपासून काढणी पर्यंत केवळ कष्टच नशिबी असते. शिवाय औषध फवारणी आणि पाण्याचे योग्य नियोजन केले तरच उत्पादन पदरी पडते. पण शिंदे यांनी सोयाबीन बिजोत्पादन करुन शारिरीक कष्टातून तर सुटका करुन घेतलीच पण कमी खर्च करुन ऊसापेक्षा त्यांना सोयाबीन बियाणातून अधिकचे उत्पन्न मिळाले आहे. कृषी विभागातील विनोद पुलंकुडवार यांनी केलेले मार्गदर्शन शिंदे यांना उपयोगी पडले आहे. यातूनच त्यांनी ही क्रांती घडवेलेली आहे.
दर्जेदार सोयाबीन बियाणाची उत्पादकता
30 गुंठे जमिनीमध्ये शिंदे यांनी पेरणीसाठी फुले संगम (KDS 726) या वाणाचे तामसा येथील शेतकऱ्यांकडून 25 किलो बियाणे प्रति ६० रुपये किलो दराने खरेदी केले. या बियाण्याची पेरणी ऊस लागवडीसाठी तयार केलेल्या क्षेत्रात डिसेंबर महिन्यात केली. या पिकाला पेरणीपूर्व बीजप्रक्रिया केली. कुठल्याही प्रकारचे रासायनिक खत वापरले नाही. सिंचनाचे योग्य नियोजन करून पिकांच्या संवेदनशील अवस्थेत सिंचन केले. मार्च मध्ये हे पिक काढणीस तयार झाले या सोयाबीन पासून त्यांना 9.50 क्विटल बियाणे उपलब्ध झाले. मळणी यंत्रामधून सोयाबीन करताना बियाणे फुटून बियाण्याला इजा होते म्हणून त्यांनी ट्रॅक्टरद्वारे सोयाबीनची मळणी केली आणि उफणणी करून दर्जेदार बियाणे तयार केले.
बियाणाची उगवण क्षमताही 99 टक्के
30 गुंठ्यामध्ये तयार करण्यात आलेल्या बियाणाची उगवणक्षमता चाचणी कृषी विभागाच्या सल्ल्याने शिंदे यांनी घरच्या घरी केली. यासाठी तरटाचे पोते घेऊन ते पाण्यात बुडवुन काढले त्यावर प्रत्येक पोत्यातील थोडे थोडे बियाणे घेऊन दहा ओळीत दहा दाणे याप्रमाणे एकूण शंभर दाणे टाकले. त्यानंतर या पोत्याची गुंडाळी करून त्यावर प्लॅस्टिक गुंडाळून सुतळीच्या सहाय्याने गुंडाळीला बांधून हवेशीर जागी ठेवले. गरजेनुसार पाणी टाकले अवघ्या तिसऱ्या दिवशी या बियाणाची उगवण झाल्याचे दिसून आले. उत्पादित बियाणांपैकी घरी पेरणीसाठी 4 क्विंटल बियाणे ठेवले तर 5.50 क्विंटल बियाणाची त्यांनी गावातील शेतकऱ्यांना प्रति किलो 120 रुपये याप्रमाणे विक्री केली .
उसापेक्षा फायदेशीर
या अनोख्या प्रयोगामुळे शिंदे यांना ऊस पिकापेक्षा अधिकचे उत्पादन मिळाले आहे. पुढील वर्षी बिगर हंगामी सोयाबीन लागवडीमध्ये वाढ करून गावातील शेतकऱ्यांनाच बियाणे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे. सोयाबीनचे नवनवीन वाणाचे दर्जेदार बियाणे घरच्या घरी निर्मिती करून बाजारातील बियाणे वरील अवलंबित्व कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कंधार तालुक्यात यावर्षी पहिल्यांदाच बिगर हंगामी बिजोत्पादनाचा खूप मोठा कार्यक्रम शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. चार महिन्यात उसाच्या तुलनेत कमी श्रमात कमी वेळेत बिजोत्पादनातून चांगले उत्पादन मिळते हे आता शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने शेतकरी आता हा प्रयोग करु लागले आहेत.