‘महाबीज’मुळे रखडला उन्हाळी सोयाबीनचा पेरा, अगोदर प्रोत्साहन आता अडवणूक, काय आहे नेमका प्रकार?
उन्हाळी हंगामातील क्षेत्र वाढताच महाबीजकडून शेतकऱ्यांची अडवणूक करण्यास सुरवात झाली आहे. महाबीजच्या माध्यमातून पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी बियाणांची मागणी केली असता बियाणे देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे तयारीनिशी असलेल्या 2 हजार शेतकऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे.
सांगली : (Kharif Season) खरीप हंगामात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे आगामी हंगामात बियाणांची कमतरता भासू नये म्हणून महाबीजने बियाणे उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी (Soybean) उन्हाळी हंगामात सोयाबीनचा पेरा करुन बियाणे उपलब्ध करुन द्यावे असे अवाहनही वेळोवेळी करण्यात आले आहे. मात्र, आता उन्हाळी हंगामातील क्षेत्र वाढताच महाबीजकडून शेतकऱ्यांची अडवणूक करण्यास सुरवात झाली आहे. महाबीजच्या माध्यमातून पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी (Sowing) बियाणांची मागणी केली असता बियाणे देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे तयारीनिशी असलेल्या 2 हजार शेतकऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. विशेष म्हणजे या शेतकऱ्यांनी नोंदणी शुल्कही अदा केले होते. असे असतानाही आता अडवणूक केली जात असल्याने दाद कुणाकडे मागावी हा प्रश्न कायम आहे.
नेमकी महाबीजची अडचण काय?
खरीप हंगामात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात पावसामुळे नुकसान झाले होते. त्यामुळे आगामी खरिपात बियाणे कमी पडणार होते. त्यामुळे महाबीजने मंडळानिहाय शेतकऱ्यांचे मेळावे घेऊन त्यांना सोयाबीनचे बीजोत्पादनासाठी तयार केले. त्यानुसार सोयाबीनच्या पेऱ्यात वाढही झाली. आता अधिकच्या क्षेत्रावर पेरा झाला असला असल्याने महाबीजने आपले उद्दीष्ट साधले आहे. पण सांगली जिल्ह्यातील 2 हजार शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीन पेरण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, महाबीजकडून त्यांना बियाणांसाठी आवश्यक असलेले बियाणे देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे शेत मशागत करुन पेरणीच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.
नोंदणी शुल्क आकारुनही गैरसोय
महाबीजच्या बिजोत्पादन कार्यक्रमात सहभाग घ्यायचा आणि प्रमाणित बियाणे कंपनीला द्यायचे असा निर्णय काही दिवसांपूर्वीच झाला होता. यामध्ये शेतकऱ्यांचाही फायदा आहे. असे असताना शेतकऱ्यांना या उपक्रमात सहभागी होण्यासाठी 100 नोंदणी फी भरावी लागत होती. त्यानुसार आता 2 हजार शेतकऱ्यांनी ही नोंदणी फी अदा करुनही त्यांना बियाणे दिले जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान तर होतच आहे पण आता मशागत करुन ठेवलेल्या शेतामध्ये काय करावे हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिलेला आहे.
संबंधित बातम्या :
तरुणांसाठी प्रेरणादायी : शेतकरी उत्पादक कंपनीची घोडदौड, शेतीमालाच्या निर्यातीमधून उद्योग उभारणी
ऊस उत्पादकांचा प्रश्न निकाली, 6 ऊसतोड टोळ्या नव्याने दाखल, कन्नड कारखान्यात कसे झाले परिवर्तन?
Drip Irrigation : ठिबकसाठी वाढीव अनुदानाची घोषणा मात्र, बांधावरची स्थिती चक्रावून टाकणारी