Kharif Season : पावसाचा धोका टळला अन् किडीचा प्रादुर्भाव वाढला, खरीप पीके धोक्यातच..!
अनेक क्षेत्रात पाणी साचल्याने कापसावर बुरशी जन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत होता त्यात आता कापसावर रस शोषणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या अळीमुळे कापसाची पाने लाल होऊन गळून पडत आहेत. मे महिन्यात लागवड करण्यात आलेला कापूस फुल फुगडी वर आला आहे. मात्र, प्रादुर्भावामुळे कापसाचे फुलं गळून जात आहे.
नंदुरबार : सलग दीड महिना (Monsoon Rain) पावसामध्ये सातत्य राहिल्यानंतर आता उघडीप दिली आहे. त्यामुळे रखडलेल्या शेती कामांनी वेग घेतला आहे. खुरपणी, कुळपणी आदी मशागतीची कामे आटोपून पीक वाढीसाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. असे असतानाच पावसाचा धोका टळला तरी मात्र, (Climate Change) वातावरणातील बदलामुळे कापसावर किडीचा प्रादु्र्भाव हा वाढत आहे. (Kharif Crop) खरिपातील या पिकावर रस शोषणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे एका संकटातून खरीप पिकांना दिलासा मिळाला असला तरी उत्पादनवाढीचा धोका हा कायम आहे. गतवर्षी विक्रमी दर मिळाल्यामुळे यंदा नंदुरबार जिल्ह्यात तब्बल 1 लाख 30 हजार हेक्टरावर कापसाची लागवड झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाढीव उत्पादनाची अपेक्षा होती मात्र, संकटाची मालिका ही सुरुच असल्याने यंदाही काय होते हे पहावे लागणार आहे.
पाणी साचलेल्या क्षेत्रात बुरशीजन्य रोग
1 जुलैपासून राज्यात पाऊस हा सक्रीय झाला होता. तेव्हापासून 15 ऑगस्टपर्यंत पावसामध्ये सातत्य राहिल्याने शेत शिवारात पाणी साचले होते. पीक असलेल्या क्षेत्रात पाणी साचून राहिल्यास बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. परिणामी पिकांची वाढ ही खुंटते. निपळीच्या शेतामधून पाणी हे वाहत जाते त्यामुळे या क्षेत्रावरील पिके जोमात असतात. त्यामुळे पावसाचा परिणाम तर पिकांवर होणारच आहे पण आता बदलत्या वातावरणाचा परिणामही जाणवू लागला आहे. सध्या खरिपातील पिके मध्यअवस्थेत आहेत. यातच रोगराईचा प्रादुर्भाव झाला तर उत्पादनाचे काय असा सवाल उपस्थित होत आहे. एकंदरीत हंगामाच्या सुरवातीपासून सुरु असलेली संकटाची मालिका अजूनही कायम आहे.
रस शोषणाऱ्या अळीचा धोका
अनेक क्षेत्रात पाणी साचल्याने कापसावर बुरशी जन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत होता त्यात आता कापसावर रस शोषणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या अळीमुळे कापसाची पाने लाल होऊन गळून पडत आहेत. मे महिन्यात लागवड करण्यात आलेला कापूस फुल फुगडी वर आला आहे. मात्र, प्रादुर्भावामुळे कापसाचे फुलं गळून जात आहे. रस शोषणाऱ्या आळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकरी रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर करत असून फवारणी केली जात आहे.
कृषी विभागाचे मार्गदर्शन ठरेल दिशादर्शक
हंगामाच्या सुरवातीपासून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यातच आता रस शोषणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने बळीराजा हतबल झाला आहे. त्यामुळे अशा परस्थितीमध्ये जर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावोगावी किंवा शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन मार्गदर्शन केले तर फायद्याचे ठरणार आहे. शिवाय खरिपातील पिके ही पाच महिन्याची असतात. या दरम्यानच्या काळातच योग्य सल्ला मिळाला तरच फायद्याचे ठरणार आहे. त्यामुळे अभ्यास करून योग्य ते मार्गदर्शन करावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.