शेतकऱ्याची कमाल, लाल नव्हे पांढऱ्या स्ट्रॉबेरेची शेती केली, पाहा काय आहे यात खास
स्ट्रॉबेरीचे फळ नेहमीच सर्वांना त्याच्या लालचुटूक रंगामुळे आणि स्वादामुळे आवडते. स्ट्रॉबेरी म्हटले की त्याचा रंग लालच असणार हे गृहीतक ठरलेले. परंतू आता आपल्याला लवकरच पांढऱ्या रंगाच्या स्ट्रॉबेरीचे दर्शन होणार आहे. एका शेतकऱ्यांना पांढऱ्या रंगाच्या स्ट्रॉबेरीचे पिक घेतले आहे. तर पाहूयात पांढरी स्ट्रॉबेरी कशी आहे ते....
मुंबई | 3 फेब्रुवारी 2024 : चवीला गोड किंचित आबंट असणारी स्ट्रॉबेरी तुम्हाला आवडत असेल तर आता नवीन स्ट्रॉबेरी बाजारात येणार आहे. स्ट्रॉबेरी नेहमी लालच असते असे आपण पाहीले असेल. परंतू महाराष्ट्रातील एका शेतात अनोखी पांढऱ्या रंगाच्या स्ट्रॉबेरीची शेती केली जात आहे. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, भिलार आणि वाई परिसरात स्ट्रॉबेरीची शेती केली जाते. आता सातारा येथील वाईच्या फुले नगरात राहणाऱ्या शेतकऱ्याने पांढऱ्या रंगाच्या स्ट्रॉबेरीची शेती केली आहे.
सातारा येथील वाईच्या फुलेनगरातील शेतकरी उमेश खामकर यांनी अर्ध्या एकरात पांढऱ्या स्ट्रॉबेरीचा प्रयोग केला आहे. या स्ट्रॉबेरीची त्यांनी बाजारात विक्री देखील सुरु केली आहे. लवकरच या अनोख्या पांढऱ्या स्ट्रॉबेरीची लवकरच ऑनलाईन विक्री देखील केली जाणार आहे. या स्ट्रॉबेरीचे खास वैशिष्ट्ये म्हणजे याची किंमत 1000 पासून 1500 रुपये किलोपर्यंत आहे. या स्ट्रॉबेरीची उत्पन्न सहा पट जास्त असल्याने शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे.
अमेरिका आणि ब्रिटनचा प्रयोग
या पांढऱ्या रंगाच्या स्ट्रॉबेरीचा पहिला प्रयोग अमेरिका आणि इंग्लंडमध्ये झाला होता. या स्ट्रॉबेरीचे नाव फ्लोरिडा पर्ल असे आहे. भारतात या जातीची स्ट्रॉबेरी पहिल्यांदाच लावण्यात आली आहे. या पांढऱ्या शुभ्र रंगाच्या स्ट्रॉबेरीची शेती प्रथमच करण्यात आली आहे. पांढऱ्या रंगाच्या स्ट्रॉबेरीच्या शेतीचा प्रयोग इतरत्र देखील करण्यात येणार आहे. भारतात पांढरी स्ट्रॉबेरी उगविण्याचा पहिला मान सातारा वाईच्या शेतकरी उमेश खामकर यांच्या नावावर जमा झाला आहे. यासाठी त्यांनी फ्लोरीडा युनिव्हर्सिटीतून रॉयल्टी राईट्स विकत घेतले आहे. आता भारतात कोणाला याची शेती करायची असेल तर उमेश खामकर यांच्याकडून हक्क विकत घ्यावे लागतील.
पांढऱ्या स्ट्रॉबेरीचे वैशिष्ट्ये काय ?
लाल स्ट्रॉबेरीच्या तुलनेत पांढरी स्ट्रॉबेरी थोडी जास्त गोड असते. स्ट्रॉबेरी पोषक तत्वांमुळे शरीराला चांगली असते. कमी नैसर्गित आम्लतेमुळे स्ट्रॉबेरी लोकप्रिय आहे. परदेशातही स्ट्रॉबेरीला खूप पसंत केले जाते. भारतात देखील स्ट्रॉबेरीला चांगले मार्केट आहे.