शेतकरी दुहेरी संकटात, शेळीपालनाचा जोडव्यवसायही अडचणीत
जोडव्यवसाय म्हणून असलेल्या शेळीपालनातही शेतकरी अडचणीत आला आहे. व्यवसयात खर्च अधिक आणि उत्पादन कमी अशी अवस्था झाली आहे. यातच बोकडाला मागणी नसल्याने दर हे निम्म्यावर आले आहेत. इतर वेळी 20 हजार रुपयांना विक्री होणारे बोकड दर आता थेट 8 हजारावर येऊन ठेपले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा जोडव्यवसायही अडचणीत येत आहे.
बीड : शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका गेल्या वर्षभरापासून सुरु आहे. कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. शेती मुख्य व्यवसायाचे अतिवृष्टीमुळे न भरुन निघणारे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे जोडव्यवसाय म्हणून असलेल्या शेळीपालनातही शेतकरी अडचणीत आला आहे. व्यवसयात खर्च अधिक आणि उत्पादन कमी अशी अवस्था झाली आहे. यातच बोकडाला मागणी नसल्याने दर हे निम्म्यावर आले आहेत. इतर वेळी 20 हजार रुपयांना विक्री होणारे बोकड दर आता थेट 8 हजारावर येऊन ठेपले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा जोडव्यवसायही अडचणीत येत आहे.
शेतीला जोडव्यवसाय म्हणून शेळीपालनाकडे पाहिले जाते. विशेष: तरुण शेतकऱ्यांचा कल हा शेळीपालनाकडे आहे. शिवाय व्यवसाय सुरु करण्यासाठी उस्मानाबादी शेळीचे जवळच बाजारपेठ असल्याने बीड जिल्ह्यात शेळीपालनाचा व्यवसाय वाढत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शेळी आणि बोकडाच्या मागणीत घट झाली आहे. बोकडाचे दर हे निम्म्यावरच आले आहेत. त्यामुळे व्यवसायिक अडचणीत आहेत. शिवाय निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती उत्पादनातही मोठी घट झाली आहे.
मराठवाड्यात सर्वाधिक नुकसान बीडमध्ये
अतिवृष्टीचा फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बसलेला आहे. सोयाबीन हे मुख्य पिक असून ऐन काढणीच्या दरम्यानच अतिवृष्टीमुळे सोयाबीन हे मातीमोल झाले होते. त्यामुळे उत्पादनात कमालीची घट झाली आहे. एकरी 10 क्विंटलची अपेक्षा असताना केवळ 3 ते 4 क्विंटलचा उतारा सोयाबीनला मिळाला आहे. शिवाय पावसामुळे सोयाबीन हे डागाळलेले आहे. त्यामुळे याचा परिणाम दरावरही झालेला आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, तूर या मुख्य पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जोड व्यवसयावर भर दिला होता. मात्र, येथेही उठाव नसल्याने पदरी निराशाच पडत आहे.
नुकसानभरपाईच्या प्रतिक्षेत शेतकरी
आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्याला केवळ पिकविमा आणि अनुदान या दोन्हीचाच आधार आहे. मात्र, दिवाळीपूर्वीच ही नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल असे सांगण्यात आले होते. मात्र, दिवाळी होऊन 10 दिवस उलटले तरी शेतकरी मदतीच्याच प्रतिक्षेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी होत आहे. अनुदानाची रक्कम राज्य सरकारने वर्ग करुनही अद्यापपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहचलेली नाही. त्यामुळे आस्मानी संकटाचा सामना तर शेतकऱ्यांना करावाच लागत आहे पण सुलतानी संकटही कमी होत नसल्याने शेतकरी अडचणीत आहे.
शेळी पालनासमोरील अव्हाने
शेतीला जोडव्यवसाय म्हणलं की डोळ्यासमोर येतो तो शेळीपालन. मात्र, आता शेतीपेक्षा या शेळीपालनाकडेच सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. परिणामी बोकडाची मागणी घटली आहे. शिवाय कोरोनामुळे मध्यंतरी जनावरांचे आठवडी बाजार बंद होते. आता बाजार सुरु झाले असून बोकड विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. त्यामुळेच दर हे निम्म्यावर आले आहेत.
संबंधित बातम्या :
आवक असतानाही नंदुरबारमध्ये मिरचीचे लिलाव बंद, काय आहे कारण ?
शेतकऱ्यांसाठी महत्वाचे : वीज कंपनीकडून ऊस जळालाय, मग अशी मिळवा नुकसानभरपाई..!
‘एफआरपी’ रकमेचे भिजत घोंगडे, कारखानदारांना केवळ कारवाईचा इशारा