Kharif Season : पेरण्या लांबल्या, चिंता नाही, तीन बाबींचे नियोजन करा अन् भरघोस उत्पादन मिळवा
पावसाने ओढ दिल्याने पेरणीचे चित्र यंदा बदलले आहे. अन्यथा हंगामाच्या सुरवातीला कडधान्यांचा पेरा आणि नंतर कापूस, सोयाबीन हे ठरलेले होते. पण आता कडधान्यामध्ये मूग, उडदाची पेरणी केली तरी उत्पादनात वाढ होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी कालावधीनुसार येणारे सोयाबीनचे वाण, बीजप्रक्रिया आणि प्रत्यक्ष पेरणी करताना जमिनीतील ओल याचा अभ्यास करावा लागणार आहे.
औरंगाबाद : जूनच्या अंतिम टप्प्यात जिथे (Kharif Crop) खरिपातील पिके बहरत असतात तिथे आता कुठे चाढ्यावर मूठ ठेवली जात आहे. पेरणी महिनाभर उशिराने होत असल्या तरी (Kharif Production) उत्पादनावर त्याचा काही परिणा होणार नाही. याकरिता शेतकऱ्यांना योग्य ते नियोजन करावे लागणार आहे. (Marathwada) मराठवाड्यातील जालना, बीड आणि परभणीच्या काही भागात शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ ठेवली आहे. पण आता कमी कालावधी आणि उपलब्ध पाणीसाठा यावरच उत्पादन अवलंबून राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वाणाची निवड, बीजप्रक्रिया आणि जमिनीतील ओलावा या बाबी लक्षात घेऊनच पेरणी केली तर फायद्याचे ठरणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. जूनच्या अंतिम टप्प्यात 75 मिमी पाऊस झालेल्या क्षेत्रावर कापूस आणि सोयाबीनचा पेरा होऊ लागला आहे. कडधान्य पेरणीसाठी काही दिवसच शिल्लक राहिल्याने शेतकरी आता कापूस आणि सोयाबीनचेच नियोजन करीत असल्याचे चित्र मराठवाड्यात आहे.
कोणत्या आहेत त्या 3 गोष्टी?
पावसाने ओढ दिल्याने पेरणीचे चित्र यंदा बदलले आहे. अन्यथा हंगामाच्या सुरवातीला कडधान्यांचा पेरा आणि नंतर कापूस, सोयाबीन हे ठरलेले होते. पण आता कडधान्यामध्ये मूग, उडदाची पेरणी केली तरी उत्पादनात वाढ होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी कालावधीनुसार येणारे सोयाबीनचे वाण, बीजप्रक्रिया आणि प्रत्यक्ष पेरणी करताना जमिनीतील ओल याचा अभ्यास करावा लागणार आहे. शिवाय पावसाचा लहरीपणा कायम असल्याने भविष्यात पाण्याचेही नियोजन करावे लागणार आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात परिश्रमाबरोबर योग्य नियोजन केले तरच अपेक्षित उत्पादन पदरी पडरणार आहे.
काय आहे कृषी विद्यापाठीचा सल्ला?
खरीप हंगामाची सुरवातच कडधान्याच्या पेऱ्याने होते. पण यंदा पाऊस लांबणीवर पडला आहे शिवाय आता जुलैमध्ये कडधान्याच्या पेरा झाला तर अपेक्षित उतार पडत नाही त्यामुळे अधिकच्या क्षेत्रावर कडधान्य न घेता सोयाबीन आणि कापसाचे पीक घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सोयाबीन, कापसासह बाजरी, तूर, एरंडी, धने, एरंडी तीळ या पिकांची पेरणी 31 जुलैपर्यंत शेतकऱ्यांना करता येणार आहे. त्यामुळे योग्य वातावरण आणि पाऊस झाल्यास या पिकांच्या उत्पादनात घट होणार नसल्याचे कृषी विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.याकरिता सर्वात महत्वाचे म्हणजे 75 मिमी पाऊस आणि जमिनीत ओलावा हे महत्वाचे आहे.
शेतशिवारात नेमकं काय सुरुयं?
गेल्या 8 दिवसांपासून मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि बीड जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने पेरणीला सुरवात झाली आहे. उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजूनही अपेक्षित पावसाची प्रतिक्षा कायम आहे. आता पेरणीला उशिर झाल्याने शेतकरी कडधान्याला बाजूला ठेऊन थेट कापूस आणि सोयाबीनवर भर देतोय. कापसाच्या दरामुळे यंदा क्षेत्र वाढेल असा अंदाज होता पण पावसाने पेरणीचे गणित बिघडल्याने मराठवाड्यात सोयाबीनचेच क्षेत्र वाढणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. मात्र, रखडलेल्या पेरण्यांना सुरवात झाल्याने आशादायी चित्र आहे.