टोमॅटोचे उत्पादन घटले, फायदा मात्र किरकोळ विक्रेत्यांचा, शेतकरी चार हात लांबच
टोमॅटोच्या दरात प्रचंड वाढ झालेली आहे. शहरानुसार याचे दर वेगवेगळे असले तरी मात्र, सरासरी 110 ते 160 रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे. आता दरात वाढ म्हणजे शेतकऱ्यांनाच फायदा असा विचार तुम्ही करीत असताल तो साफ चुकीचा आहे. कारण ग्राहक आणि शेतकरी यांच्यातला दुवा म्हणून ओळखला जाणारा किरकोळ विक्रेत्याच अधिकचा फायदा घेत आहे.
लातूर : टोमॅटोच्या दरात प्रचंड वाढ झालेली आहे. शहरानुसार याचे दर वेगवेगळे असले तरी मात्र, सरासरी 110 ते 160 रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे. आता दरात वाढ म्हणजे शेतकऱ्यांनाच फायदा असा विचार तुम्ही करीत असताल तो साफ चुकीचा आहे. कारण ग्राहक आणि शेतकरी यांच्यातला दुवा म्हणून ओळखला जाणारा किरकोळ विक्रेत्याच अधिकचा फायदा घेत आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या टोमॅटोला 20 ते 25 रुपये किलोप्रमाणे दर मिळत आहे. तर बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण करुन टोमॅटोचे दर हे वाढवले जात आहेत. पावसामुळे नुकसान झाले शेतकऱ्यांचे अन् फायदा किरकोळ विक्रेत्यांचा असे म्हणण्याची वेळ आली आहे.
सप्टेंबर महिन्यात टोमॅटो तोडणीच्या दरम्यान महाराष्ट्रासह राज्यभर पावसाने थैमान घातले होते. यामध्ये तोडणीला आलेल्या टोमॅटोचा वावरातच लाल चिखल झाला होता. त्यामुळे आता उत्पादनात घट झाली आहे आणि मागणीत वाढ यामुळेच टोमॅटोचे दर वाढत आहेत. पण ते किरकोळ विक्रेत्यांपर्यंतच मर्यादीत आहेत. कारण शेतकऱ्यांना कमी दरानेच विक्री करावी लागत आहे तर मध्यस्ती असलेले विक्रेते हे अधिकच्या दराने विक्री करीत आहेत.
आंध्रप्रदेशात सर्वाधिक उत्पादन
देशात सर्वाधिक टोमॅटोचे उत्पादन हे आंध्रप्रदेश राज्यात घेतले जाते. येथेही यंदा पावसामुळे टोमॅटो पिकाचे नुकसान झाले आहे. यामुळे मागणी आणि पुरवठ्यात मोठी तफावत निर्माण झाल्याने किंमतीमध्ये वाढ होत आहे. देशात टोमॅटोचा सर्वाधिक दर 160 रुपये प्रति किलो आहे. टोमॅटो उत्पादक क्षेत्रामध्ये दर हे नियंत्रणात असले तरी येथील कोयंबेडू, मंडवली आणि नंदनम या किरकोळ बाजारात ही किंमत या उच्चांकावर पोहोचली होती.
टोमॅटोच्या किंमती वाढण्या मागचे सत्य
आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेशात देशात टोमॅटोचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. आंध्र प्रदेशात 58000 हेक्टर जमिनीवर सुमारे 27 लाख मेट्रिक टन टोमॅटोचे उत्पादन होते. आंध्र प्रदेशात चित्तूर आणि अनंतपूर जिल्ह्यांचे सर्वाधिक उत्पादन आहे. दुर्दैवाने या दोन जिल्ह्यांनाच पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. चित्तूरमधील मदनपालले ही सर्वात मोठी टोमॅटो बाजारपेठ आहे. केंद्र सरकारच्या ऑनलाइन मंडी ई-नामनुसार येथे टोमॅटोचा किमान दर 1600 रुपये आणि जास्तीत जास्त 9500 रुपये प्रति क्विंटल आहे. महाराष्ट्रात सोलापूरमध्ये टोमॅटोची मोठी बाजारपेठ आहे. पुणे देखील याचे महत्त्वाचे ठिकाण आहे. या ठिकाणी मात्र, शेतकऱ्यांना 40-50 रुपये किलो दर मिळत आहे.
यामुळे झाली दरात वाढ
ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकाचे नुकसान झाले असल्याचे असे अखिल भारतीय भाजीपाला उत्पादक संघटनेचे अध्यक्ष श्रीराम गाडगीळ यांनी सांगितले. त्यामुळेच आता किंमतीमध्ये वाढ होत आहे. सध्या महाराष्ट्रातील शेतकरी 10 ते 20 रुपये किलोने टोमॅटोची विक्री करत आहेत. तर किरकोळ विक्रेत्ये 60 ते 70 रुपयांनी विक्री करीत आहेत. हाच फरक आणि शेतकरी आणि विक्रेत्यांमध्ये असल्याने शेती व्यवसयापेक्षा विक्रेता होणे अधिक फायद्याचे राहत आहे. त्यामुळे टोमॅटोचे दर वाढले आहेत ते फक्त ग्राहकांसाठी आणि किरकोळ विक्रेत्यासाठी शेतकऱ्यांचे मात्र नुकसान ठरलेलेच आहे.