द्राक्ष बाग जोपासण्यासाठी सोनं गहाण ठेवलं, पण अवकाळीमुळं सर्वकाही पाण्यात गेलं
सोलापूर जिल्ह्यातील बीबीदारफळच्या एका महिलेने तर द्राक्षाची बाग जोपासण्यासाठी पतीच्या निधनानंतर सोने गहाण ठेवले आणि मुलाला हाताशी घेऊन परिश्रम केले. मात्र, द्राक्षे तोडणी अवघ्या 10 दिवसावर असताना अवकाळीची अवकृपा झाली आणि सर्वकाही होत्याचे नव्हते झाले आहे.
सोलापूर : अवकाळी पावसाने शेतकऱ्याचं कंबरडेच मोडले आहे. केवळ हंगामी पिकांचेच नाही तर फळबागायत (Farmer) शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरवातीला झालेल्या अवकाळीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बीबीदारफळच्या एका महिलेने तर द्राक्षाची बाग जोपासण्यासाठी पतीच्या निधनानंतर सोनं गहाण ठेवले आणि मुलाला हाताशी घेऊन परिश्रम केले. मात्र, (damage to vineyards) द्राक्षे तोडणी अवघ्या 10 दिवसावर असताना अवकाळीची अवकृपा झाली आणि सर्वकाही होत्याचे नव्हते झाले आहे. या पावसामुळे घडामध्ये कुजगळ झाली असून उभ्या देठांनाच मुळ्या आल्याचे चित्र बागांमध्ये पाहवयास मिळत आहे.
बीबीदारफळच्या शेतकरी महिलेची व्यथा
पतीच्या निधनानंतर द्राक्ष बाग मोडायची नाही तर जोपासायची असा निर्धार करुन बीबीदारफळच्या प्रतिभा चिकणे यांनी मुलाला हाताशी घेऊन बाग जोपासण्याचे काम केले. औषध फवारणीसाठी पैसाची गरज असताना त्यांनी सोनं गहाण ठेवलं पण निर्धार सोडला नाही. पण त्यांचे हे अथक परिश्रम नियतीलाही मान्य नव्हते. अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागेचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्षाच्या घडातच पाणी गेल्याने घडकुज झाली आहे. आता न भरुन निघणारे नुकसान झाले. उत्पादन तर सोडाच पण आता गहाण ठेवलेलं सोनं सोडवायचे कसे असा सवाल त्यांच्या समोर आहे.
2 लाख एकरांवरील बागांचे नुकसान
राज्यात 5 लाख एकरावर द्राक्षे बागांची लागवड केली जाते. गेल्या काही दिवसांपासून अधिकच्या उत्पादनामुळे शेतकऱ्यांचा कल याकडे वाढत आहे. मात्र, निसर्गाची साथ मिळत नाही. त्यामुळे उत्पादनावर झालेला खर्चही निघणे मुश्किल होत आहे. गेल्या 3 वर्षात अवकाळी पावसामुळे तब्बल 26 लाख हेक्टरावरील पिकांचे नुकसान झालेले आहे. तर मध्यंतरी झालेल्या अवकाळीमुळे तब्बल 2 लाख एकरावरील बागांचे नुकसान झाले असल्याचे द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार यांनी सांगितले आहे. त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष बागांची पाहणी केली होती.
शासन दरबारी मदतीची मागणी
अवकाळीचा फटका सर्वच पिकांना बसलेला आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे ते द्राक्ष आणि आंबा पिकाचे. द्राक्ष तोडणी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली होती. याच दरम्यान, सबंध राज्यभर झालेल्या अवकाळी पावसामुळे घडकुज झाली आहे. त्यामुळे बागायत शेतकऱ्यांना येणारा खर्च व त्या तुलनेत न मिळणाऱ्या उत्पादनाची सांगड घालून शासनाकडे मदतीची मागणी केली जाणार असल्याचे शिवाजी पवार यांनी सांगितले आहे.