सोलापूर : शेंगासह सोयाबीन पाण्यात, सांगा शेती करायची कशी?
काढणी कामे रखडलेली असून खरीपातील उत्पादनात यंदा मोठी घट होणार असल्याने शेतकरी चिंतातूर झालेला आहे. एकरी 20 हजार रुपये खर्च सोयाबीन आला असून शेतकऱ्यांची मेहनत ही वेगळीच. आता गुडघ्याभर पाण्यात सोयाबीन आहे आणि त्याच्या शेंगा सडून जात आहे. त्यामुळे शेती करावी कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
रोहीत पाटील सोलापूर : मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात (Solapur) पावसाने थैमान घातलेले आहे. गेल्या चार दिवसांपासून पावसामध्ये सातत्य राहिल्याने खरीपातील पीक ही पाण्यात आहेत. त्यामुळे काढणी कामे रखडलेली असून खरीपातील (Kharif Hangam) उत्पादनात यंदा मोठी घट होणार असल्याने शेतकरी चिंतातूर झालेला आहे. एकरी 20 हजार रुपये खर्च सोयाबीन आला असून शेतकऱ्यांची मेहनत ही वेगळीच. आता गुडघ्याभर पाण्यात सोयाबीन (Soyabean) आहे आणि त्याच्या शेंगा सडून जात आहे. त्यामुळे शेती करावी कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मराठवाड्याला लागून असलेल्या बार्शी, माढा, मोहोळ या भागात सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र, यंदा पेरणीपासूनच खरीपातील पिकांवर संकट हे कायम आहे. सोयाबीन ऐन जोमात असताना पावसाने उघडीप दिली होती तर आता काढणीच्या प्रसंगी पावसाने थैमान घातल्याने शेती कामे रखडलेली आहेत.
सोयाबीन बरोबरच कांदा पीकाचेही अतोनात नुकसान झाले आहे. आर्थिक नुकसान तर झालेच आहे शिवाय शेतकऱ्यांची मेहनतही वाया गेली आहे. सध्या सोयाबीन हे पूर्णपणे पाण्यात असून उभ्या पिकालाच कोंब फुटू लागले आहेत. बार्शी तालुक्यातील पानगाव येथील बालाजी पवार यांनी तीन एकरामध्ये सोयाबीनची पेरणी केली होती. पेरणीपासून पिक शेंग अवस्थेत येईपर्यंत योग्य वेळी मशागत, औषध फवारणी करून त्यांनी पीक बहरात आणले होते. मात्र, काढणीला 15 दिवसाचाच आवधी असताना सुरु झालेला पाऊस आजही कायम आहे.
पिक डोळ्यासमोर असतानाही काढणी करता येत नाही. शेती कामे सोडाच शेतामध्ये पायी चालत जाणेही मुश्किल होत आहे. त्यामुळे तीन एकरावर 60 हजार रुपये झालेल्या खर्चावरही यंदा पवार यांना पाणीच सोडावे लागणार आहे. या परीसरातील सर्वच शेतकऱ्यांची अवस्था अशी झालेली आहे. त्यामुळे त्वरीर पंचनामे करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
अधिकचे उत्पन्न तर नाहीच खर्चही पदरुन
सोयाबीनला एकरी 8 ते 10 क्विंटलचा उतार हा पडतो. त्यामुळे 4 एकरामध्ये 35 क्विंटल सोयाबीन होईल असा अंदाज शेतकरी पवार यांनी व्यक्त केला होता. मात्र, पावसाने अशी काय अवकृपा केलेली आहे की, अधिकचे उत्पन्न तर सोडाच पण पीकावर केलेला खर्चही यातून काढणे मुश्किल झाल्याचे बालाजी पवार यांनी सांगितले आहे.
कांद्याचाही वांदाच
नगदी पिक म्हणून सोलापूर जिल्ह्यात कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. शिवाय सोलापूर बाजारपेठ ही जवळ असल्याने बार्शी, माढा तालुक्यातील शेतकरी कांदा लागवडीवर भर देतात. मात्र, सततच्या पावसामुळे कांद्याची वाढ खुंटली आहे तर किडीचाही प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे सोयाबीन प्रमाणेच कांदा पिकही धोक्यात आहे. नुकसानीचे पंचनामे करुन त्वरी मदत देण्याची मागणी शेतकरी हे करीत आहेत.
अशा प्रकारे ठरली जाते मदतीची रक्कम
पिकाच्या नोंदणीनुसार जर 33 टक्के पेक्षा अधिकचे नुकसान झाले असले तर त्या पिकाची नुकसानभरपाई ही शेतकरी हे पात्र होतात. कोरडवाहू आणि बागायत या करीता वेगवेगळे निकष लावण्यात आले आहेत. कोरडवाहू क्षेत्रावरील नुकसान असेल तर हेक्टरी 9 हजार रुपये हे दिले जातात. ही रक्कम केंद्र सरकार देऊ करते तर यामध्ये राज्य सरकारही मदत करते. बागायत क्षेत्रासाठी 18 हजार रुपये हेक्टरी मदत असे निकष लावण्यात आले आहेत. नैसर्गिक आपत्ती विभागाकडे पीक नुकसानीचे अहवाल हे पाठविले जातात. पण हे सर्व नुकसान जर 33 टक्के पेक्षा अधिकचे असेल तरच मदत शेतकऱ्यांने मिळणार आहे. (Water stored in soyabean fields, farmers in Solapur helpless, )
संबंधित बातम्या :
कोल्हापूरातही ‘लातूर पॅटर्न’, ‘केडीसी’ देणार 5 लाखापर्यंत बिनव्याजी पीककर्ज
…अखेर त्या 44 साखर कारखान्यांची यादी जाहीर, शेतकऱ्यांनो आता ‘ही’ यादी पाहूनच ऊस घाला
‘जलयुक्त’ चे पाणी कुठे मुरले ? ‘एसीबी’कडून खुल्या चौकशीला सुरवात