अवकाळी, गारपिटीने सर्वाधिक नुकसान विदर्भाचे, भरपाईच्या अनुशंगाने प्रशासनाचे काय आहे नियोजन?
दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी आणि गारपिटीमुळे विदर्भातील तब्बल 50 हजार हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये रब्बी हंगामासह फळबागा आणि खरीपातील अंतिम टप्प्यात असलेल्या तुरीचाही समावेश आहे. आता कुठे अतिवृष्टीची नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा झाली होती. लागलीच कृषी विभागाकडून पीक पाहणीला सुरवात झाली आहे.
नागपूर : दोन दिवसांपूर्वी झालेल्या (Untimely rains) अवकाळी आणि (Hailstorms) गारपिटीमुळे विदर्भातील तब्बल 50 हजार हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये रब्बी हंगामासह फळबागा आणि खरीपातील अंतिम टप्प्यात असलेल्या तुरीचाही समावेश आहे. आता कुठे अतिवृष्टीची नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा झाली होती. लागलीच (agriculture department) कृषी विभागाकडून पीक पाहणीला सुरवात झाली आहे. कृषी विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले असून या विभागातील 50 हजार हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज शासनाकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष मदतीच्या स्वरुपात तरी पदरी काय पडते का असा सवाल शेतकऱ्यांसमोर आहे.
विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये झाले सर्वेक्षण
गेल्या वर्षभरापासून शेतकरी एक ना अनेक समस्यांना सामोरे जात आहे. यापूर्वी अतिवृष्टी आणि त्यानंतर 15 दिवासाला अवकाळी पाऊस यामुळे शेती व्यवसाय करावाच कसा असा सवाल शेतकऱ्यांसमोर आहे. पेरणी, बी-बियाणे, मशागत या सर्व बाबींवर खर्च करुन अखेर उत्पादनच मिळत नाही. शेतकऱ्यांची स्थिती लक्षात घेता अवकाळी आणि गारपिट होताच अमरावती, यवतमाळ, वर्धा, अकोला हे त्यामधील सर्वाधिक प्रभावित जिल्हे होते. शासनाने या जिल्ह्यांमधील नुकसानीची दखल घेत सर्वेक्षणाअंती प्राथमिक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अहवाल सादर करण्यात आला आहे.
रब्बी पिकांसह फळबागाचे नुकसान
मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसानंतर शेतकऱ्यांनी फळबागा फवारण्याठी हजारो रुपये खर्ची केले होते. शिवाय पोषक वातावरणामुळे रब्बीमध्ये गहू, हरभरा, ज्वारी या पिकांचा पेरा केला होता. मात्र, अवकाळी आणि गारपिटीमुळे कापूस, तूर, गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला या पिकांचे नुकसान झाल्याचे अहवालात नमूद आहे. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये सुमारे 49 हजार 435 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल शासनास सादर करण्यात आला आहे.
या प्रक्रियेनंतरच प्रत्यक्ष मदत
प्रशासनाच्या सुचने प्रमाणे कृषी विभागाने नुकसानीचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाकडे सादर केला आहे. त्यानुसार नुकसानीचे क्षेत्र पाहून आता पंचनामे करण्याचे आदेश कृषी आणि महसूल विभागाला देण्यात येतील. त्यानुसार तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली पीक नुकसानीचे पंचनामे केले जातील. शेतकऱ्यांनी नुकसानीचे दावे केला असल्यास पंचनामे दरम्यान विमा कंपनीचेही प्रतिनिधी असणार आहेत. आता केवळ प्राथमिक अहवालाचे सादरीकरण झाले असून वरिष्ठांच्या सूचनांनुसारच प्रक्रिया होणार असल्याचे कृषी अधिकारी यांनी सांगितले आहे.