पंचनाम्यानंतर पुढची प्रक्रीया काय? शेतकऱ्यांना प्रतिक्षा मदतीची
सरसकट पंचनामे करण्याचे आदेश राज्यसरकारने दिले असून आता शेतशिवारात पंचनामे केले जात आहेत. मात्र, ही प्रक्रीया ही वेळखाऊ असल्याने शेतकऱ्यांना प्रत्यक्षात मदत मिळणार कधी हा प्रश्न कायम आहे
लातूर : राज्यात चार दिवसापुर्वी झालेल्या पावसामुळे (Heavy Rain) खरीपातील पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. पाचव्या दिवशीही पिके ही पाण्यातच आहेत. त्यामुळे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश (State Government) राज्यसरकारने दिले असून आता शेतशिवारात पंचनामे केले जात आहेत. मात्र, ही प्रक्रीया ही वेळखाऊ असल्याने शेतकऱ्यांना प्रत्यक्षात मदत मिळणार कधी हा प्रश्न कायम आहे एकीकडे पंचनामे हे सुरु आहेत तर दुसरीकडे विरोधी पक्ष हा ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करीत आहे. पंचनाम्यांचा अहवाल हा सादर होताच पुढची प्रक्रीया प्रत्यक्ष मदतीची असते पण त्या दरम्यान पंचनामा प्रक्रीयेचा प्रवास कसा असतो हे शेतकऱ्यांनी जाणून घेणे आवश्यक असते.
पावसामुळे खरीप हंगाम अजूनही पाण्यातच आहे. विशेष: मराठवाडा, विदर्भ या भागातील पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. सरासरीपेक्षा दीडपट पाऊस या भागात झालेला आहे. त्यामुळे राज्य कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी सरसकट पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाला दिले आहेत.
त्यानुसार प्रशासकीय यंत्रणा ही कामाला लागली असून खरच पंचनामे झाले की अहवाल आणि लागलीच शेतकऱ्यांना मदत हे कितपत शक्य आहे पाहणे गरजेचे आहे. त्यापुर्वी पंचनाम्याची प्रक्रीया आणि नुकसान मोजायचे एकक काय हे समजावून घेणे आवश्यक आहे. घोषणा देऊन शेतकऱ्यांना शांत केले जात आहे. पण या घोषणांच्या मागे काय प्रक्रीया असते हे जाणून घेऊ…
अशी आहे पंचनाम्याची प्रक्रीया
1) जास्तीचे नुकसान झाले असल्यास कृषी विभाग तसेच महसूल विभागाला पंचनामे करण्याचे आदेश शासनाकडून दिले जातात 2) पिकाची पेरणी झाली की, त्या पिकाची विमा रक्कम अदा करणे आवश्यक आहे. पिकानिहाय ही रक्कम विमा कंपनीने ठरवून दिलेली असते. 3) पिकाचे नुकसान झाले असल्यास त्या संबंधिची माहिती ही कृषी सहाय्यक, ग्रामसेवक किंवा तलाठी यांना देणे आवश्यक आहे. यानंतर पिक पाहणीसाठी कृषी विभागाचे किंवा महसूल विभागाचे अधिकारी हे शेतकऱ्यांच्या बांधावर येतात. आता मात्र, सरसकट नुकसान झाल्याने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 4) या दरम्यान शेतकऱ्याजवळ सातबारा उतारा, रेशन कार्डची झेरॉक्स, आधार कार्ड आणि बॅंक पासबुकची झेरॉक्स आवश्यक आहे. 5) पिक पेऱ्याचे क्षेत्र, बाधित क्षेत्र तसेच तुलनेने किती क्षेत्रावरील नुकसान झाले आहे याचा अहवाल या कर्मचाऱ्यांकडून तयार केला जातो. 6) पिक पंचनाम्याचा अहवाल हा महसूल विभागाकडे पाठविला जातो. 7) महसूल विभागाकडून नुकसानीच्या पंचनाम्याचा अहवाल हा संबंधित कंपनीकडे पाठविला जातो. मात्र, नुकसान भरपाईसाठी लागवडीच्या क्षेत्रापैकी किमान 25 टक्के क्षेत्र बाधित असल्याचा अहवाल येणे आवश्यक आहे. 8) नुकसान अहवालाची पाहणी केल्यानंतरच शेतकऱ्याकडून घेण्यात आलेल्या बॅंक पासबुकच्या खात्यावर ही भरपाईची रक्कम वर्ग केली जाते.
अशा प्रकारे ठरली जाते मदतीची रक्कम
पिकाच्या नोंदणीनुसार जर 33 टक्के पेक्षा अधिकचे नुकसान झाले असले तर त्या पिकाची नुकसानभरपाई ही शेतकरी हे पात्र होतात. कोरडवाहू आणि बागायत या करीता वेगवेगळे निकष लावण्यात आले आहेत. कोरडवाहू क्षेत्रावरील नुकसान असेल तर हेक्टरी 9 हजार रुपये हे दिले जातात. ही रक्कम केंद्र सरकार देऊ करते तर यामध्ये राज्य सरकारही मदत करते. बागायत क्षेत्रासाठी 18 हजार रुपये हेक्टरी मदत असे निकष लावण्यात आले आहेत. नैसर्गिक आपत्ती विभागाकडे पीक नुकसानीचे अहवाल हे पाठविले जातात. पण हे सर्व नुकसान जर 33 टक्के पेक्षा अधिकचे असेल तरच मदत शेतकऱ्यांने मिळणार आहे. (What is the process after panchnama, waiting for financial assistance to farmers)
संबंधित बातम्या ;
कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव, असे करा नियंत्रण म्हणजे होईल उत्पादनात वाढ
सोयाबीनच्या दराला उतरती कळा, शेतकऱ्यांनो ‘या’ गोष्टींची अंमलबजावणी हाच पर्याय
कथा साखर कारखान्याची, व्यथा शेतकऱ्यांच्या थकीत ‘एफआरपी’ रकमेची