Summer Crop : उन्हाळी सोयाबीन विक्री की साठवणूक..! दरातील चढ-उतरानंतर शेतकरी संभ्रमात,काय आहे सल्ला?
खरीप हंगामात सोयाबीनला जेवढा उतारा आला तेवढा उतारा उन्हाळी सोयाबीनला मिळत नसल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, पोषक वातावरण आणि पाण्याची उपलब्धता यामुळे उत्पादकतेमध्ये वाढ झाली आहे. शिवाय शेतकऱ्यांनी गतवर्षी झालेली चूक यंदा होऊ नये यासाठी विशेष प्रय़त्न केले. त्यामुळेच उत्पादकता तर वाढली पण आता दरामुळे शेतकऱ्यांची द्विधा मनस्थिती झाली आहे.
औरंगाबाद : खरिपात साधले नाही म्हणून शेतकऱ्यांनी (Summer Season) उन्हाळी हंगामातील पोषक वातावरण आणि मुबलक पाणी यावर पीक पध्दतीमध्ये बदल केला. कधी नव्हे ते विक्रमी क्षेत्रावर (Soybean Crop) सोयाबीनचा पेरा झाला होता. खरिपात ज्याप्रमाणे निसर्गाचा लहरीपणा होता तो उन्हाळ्यात कमी झाला. तरी वाढत्या उन्हामुळे (Soybean Productivity) सोयाबीन उत्पादकतेवर परिणाम झालाच होता. सध्या उन्हाळी हंगामातील काढणी अंतिम टप्प्यात असताना बाजारपेठेत सोयाबीनच्या दरात चढ-उतार सुरु झाला आहे. 7 हजार 200 वर असणारे सोयाबीन थेट 6 हजार 600 रुपये क्विंटल असे झाले आहे. त्यामुळे उन्हाळी सोयाबीन विक्री करावी की नाही हा मोठा प्रश्न आहे. सध्या बाजारपेठेत खरिपातील सोयाबीन आणि तूर तर रब्बीतील हरभरा पिकाची आवक सुरु आहे. असे असले तरी शेतीमालाचे दर काही दिवसांपासून स्थिर किंवा घसरण एवढेच काय ते होत आहे. गेल्या 2 महिन्यात शेतीमालाचे दर वाढलेच नाही.
उन्हाळी हंगामातही उतारा चांगलाच
खरीप हंगामात सोयाबीनला जेवढा उतारा आला तेवढा उतारा उन्हाळी सोयाबीनला मिळत नसल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, पोषक वातावरण आणि पाण्याची उपलब्धता यामुळे उत्पादकतेमध्ये वाढ झाली आहे. शिवाय शेतकऱ्यांनी गतवर्षी झालेली चूक यंदा होऊ नये यासाठी विशेष प्रय़त्न केले. त्यामुळेच उत्पादकता तर वाढली पण आता दरामुळे शेतकऱ्यांची द्विधा मनस्थिती झाली आहे. सध्या सोयबीनचे दर हे कमी तर आहेतच पण उन्हाळी हंगामातील उत्पादनातही वाढ झाली आहे. त्यामुळे भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही. मात्र, प्रतिकूल परस्थितीमध्ये सोयाबीनचे उत्पादन तर वाढले आहे पण आता वाढीव दर मिळाला तरच शेतकऱ्यांचा उद्देश साध्य होणार आहे.
शेतकऱ्यांनी साठवणूक केली पण टायमिंग चुकलेच
अधिकच्या दरासाठी शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील सोयाबीनचा साठा केला होता पण वाढीव दराच्या नादात शेतकऱ्यांनी योग्य टायमिंग साधलेच नाही.यंदाच्या हंगामात अनेकवेळा सोयाबीनच्या दरात चढ-उतार झाला आहे. 4 हजार 600 पासून झालेली सुरवात 7 हजार 600 पर्यंत येऊन ठेपली होती. त्याचवेळी योग्य टाममिंग साधून सोयाबीन विक्री केली असती तर शेतकरी हे फायद्यात राहिले असते.
शेतकऱ्यांना सल्ला काय ?
सध्या उन्हाळी हंगामातील सोयाबीनची काढणी कामे सुरु आहेत. असे असले तरी बाजारपेठेत सोयाबीनला अधिकचा दरही नाही. गेल्या महिन्याभरापसून तर सोयाबीनचे दर हे स्थिरच आहेत. 7 हजारपर्यंत दर हा योग्य होता. त्याच दरम्यान शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री केली असती तरी ते फायद्याचे झाले असते. पण शेतकऱ्यांनी साठवलेले सोयाबीन आणि आता काढणी सुरु असलेल्या उन्हाळी सोयाबीनची एकाच वेळी आवक होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वाढीव दर मिळेपर्यत सोयाबीनच साठवणूकच महत्वाचे असल्याचे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी सांगतले आहे.