Driving Licenses : किती प्रकारचे ड्रायव्हिंग लायसेंस असतात माहितीय का? तुमच्याकडं कोणतं आहे?
ड्रायव्हिंग लायसेंस एक सामान्य व अत्यंत महत्वपूर्ण कागदपत्र आहे, याचा उपयोग आपल्याला अनेक कामांसाठी आपली ओळख म्हणून करता येतो
मुंबई : ड्रायव्हिंग करण्यासाठी आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसेंस (driving licenses) असणे आवश्यक असते. कार आणि दुचाकी चालविण्यासाठी कायमस्वरुपीचे लायसेंस देण्यात येत असते. भारतात कार आणि दुचाकी किंवा इतर विविध गाड्या चालविण्यासाठी आरटीओकडून (RTO) ड्रायव्हिंग लायसेंस देण्यात येत असते. ते मिळविण्यासाठी आरटीओच्या विविध नियमांचे पालन करुन त्यासाठी अर्ज व परीक्षादेखील (Examination) घेतली जात असते. यात ड्रायव्हिंग टेस्टचा समावेश असतो. ती परीक्षा पास झाल्यानंतर आरटीओकडून ड्रायव्हिंग लायसेंस मिळत असते. देशात आरटीओकडून विविध प्रकारचे ड्रायव्हिंग लायसेंस देण्यात येत असतात. त्यातील काहीच आपल्याला माहिती आहे, आज या लेखातून त्यांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
लर्निंग ड्रायव्हिंग लायसेंस
तुम्ही जर पहिल्यांदाच कुठल्याही प्रकारचे लायसेंस बनवत असाल तर, तुम्हाला सर्वात आधी लर्निंग ड्रायव्हिंग लायसेंस काढण्यासाठी अर्ज करावा लागेल. या लायसेंसला ड्रायव्हिंग शिकण्यासाठी देण्यात येत असते. याची मुदत केवळ सहा महिन्यांची असते. लर्निंग ड्रायव्हिंग लायसेंस मिळाल्यानंतर एका महिन्यानंतर पर्मनेंट ड्रायव्हिंग लायसेंस मिळत असते.
पर्मनेंट ड्रायव्हिंग लायसेंस
हे सर्वाधित बनत असलेले ड्रायव्हिंग लायसेंस आहे. लर्निंग ड्रायव्हिंग लायसेंस मिळविल्यानंतर पर्मनेंट ड्रायव्हिंग लायसेंस मिळत असते. यासाठी संबंधित आरटीओला अर्ज करावा लागत असतो. लर्निंग लायसेंसची मुदत संपण्याआधीच पर्मनेंट लायसेंससाठी अर्ज करावा लागत असतो. ड्रायव्हिंग टेस्ट पूर्ण केल्यानंतर आरटीओ ड्रायव्हिंग लायसेंस देत असते.
कमर्शिअल ड्रायव्हिंग लायसेंस
कमर्शिअल ड्रायव्हिंग लायसेंस कमर्शिअल वाहने चालविण्यार्यांसाठी देण्यात येत असते. कमर्शिअल ड्रायव्हिंग लायसेंसचे तीन प्रकार असतात. त्यात अवजड मोटर वाहन, मध्यम मोटर वाहन आणि हलके साहित्य वाहून नेणारे वाहन. या कमर्शिअल ड्रायव्हिंग लायसेंस मिळविण्यासाठी वेगळी पध्दत असते. याची अर्ज प्रक्रिया पर्मनेंट लायसेंस मिळविण्यासाठी असते तशीच असते.
आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसेंस
हे लायसेंस भारतीय नागरिकांना विदेशात गाडी चालविण्यासाठीचे असते. आरटीओ या परमिटला विविध भाषांमध्ये छापण्यात येत असते. त्यामुळे ज्या देशात तुम्ही जाणार असाल त्या ठिकाणच्या अधिकार्यांना ड्रायव्हिंग लायसेंसची पडताळणी करणे अधिक सोपे होत असते.