Ambassador : पहिल्या अन्‌ शेवटच्या अ‍ॅम्बेसेडरची किंमत काय होती माहितीयं?… तब्बल 58 वर्षांची सद्दी का संपली?

| Updated on: Jun 05, 2022 | 1:59 PM

भारतातील राजकारणी आणि अधिकार्‍यांमध्ये अ‍ॅम्बेसेडर इतकी लोकप्रिय झाली की सामान्य लोकांमध्ये तिला 'लाल दिव्याची गाडी' म्हटले जाऊ लागले.

Ambassador : पहिल्या अन्‌ शेवटच्या अ‍ॅम्बेसेडरची किंमत काय होती माहितीयं?... तब्बल 58 वर्षांची सद्दी का संपली?
अ‍ॅम्बेसेडर
Image Credit source: social
Follow us on

मुंबई : एक काळ होता ज्या वेळी दारासमोर अ‍ॅम्बेसेडर (Ambassador) कार लावणे म्हणजे स्टाईल आयकॉन मानले जात होते. चांगल्या गोष्टींचे दिवस नसतात तर काळ असतो, असे म्हटले जाते. ते अ‍ॅम्बेसेडरच्या बाबतीत तंतोतंत खरे आहे. तब्बल पाचहून अधिक दशके या गाडीने सर्वसामान्यांपासून ते अगदी गर्भश्रीमंत माणसांच्या मनावर राज्य केले. भारतातील राजकारणी आणि अधिकार्‍यांमध्ये अ‍ॅम्बेसेडर इतकी लोकप्रिय झाली की सामान्य लोकांमध्ये तिला ‘लाल दिव्याची गाडी’ म्हटले जाऊ लागले. एवढेच नाही तर भारतात बनवल्या जाणार्‍या अ‍ॅम्बेसेडरपैकी 16 टक्के अ‍ॅम्बेसेडर सरकार स्वतः विकत घेत असे. हिंदुस्थान मोटर्सच्या (Hindustan Motor) अ‍ॅम्बेसेडर कारने 58 वर्षे बाजारपेठेवर राज्य केले आहे. कंपनीने 1957 मध्ये अ‍ॅम्बेसेडर लाँच केली होती तर 2014 मध्ये याचे प्रोडक्शन (Production) बंद झाले होते. अ‍ॅम्बेसेडरची सुरुवातीची किंमत काय होती आणि प्रोडक्शन बंद होताना या गाडीची किंमत काय होती माहितीयं?


हिंदुस्थान मोटर्सने त्यांच्या उत्तरपारा प्लांटमध्ये अ‍ॅम्बेसेडरची निर्मिती केली. हा भारतातील पहिला कार प्लांट होता, तर आशियातील कार बनवणारा दुसरा कारखाना होता. यापूर्वी जपानमध्ये कार बनवण्याचा आशिया खंडात एकच कारखाना होता, तो टोयोटा कंपनीने उघडला होता. 1957 मध्ये जेव्हा कंपनीने ही कार लाँच केली तेव्हा तिची किंमत फक्त 14,000 रुपये होती. महागाईचा हिशोब केला तर आजच्या तारखेला ती रक्कम सुमारे 12 लाख रुपये म्हणता येईल.

बिर्ला ग्रुपने अ‍ॅम्बेसेडर केली लाँच

अ‍ॅम्बेसेडर कारला भारतातील पहिली कार होण्याचा मान मिळाला आहे. बिर्ला समूहाच्या बीएम बिर्ला यांनी 1942 मध्ये हिंदुस्थान मोटर्सची स्थापना केली आणि त्यानंतर 1948 मध्ये कंपनीचा प्लांट बंगालमधील उत्तरपारा येथे हलवला. 1957 मध्ये या प्लांटमधूनच 58 वर्षे भारताच्या रस्त्यांवर राज्य करणारी अ‍ॅम्बेसेडर कार 1957 मध्ये पहिल्यांदा बनवण्यात आली. भारतात ही कार राजकारण्यांपासून ते अधिकार्‍यांमध्ये इतकी लोकप्रिय झाली की सामान्य लोकांमध्ये तिला ‘लाल दिव्याची गाडी’ असे संबोधले जाऊ लागले.

हे सुद्धा वाचा

नोटाबंदीपूर्वी ही होती किंमत

वाढती स्पर्धा आणि मायलेजमुळे हिंदुस्थान मोटर्सची अ‍ॅम्बेसेडर बाजारात टिकू शकली नाही. 2014 मध्ये कंपनीने त्यांचे उत्पादन बंद केले. प्रोडक्शन बंद होण्यापूर्वी म्हणजेच 2014 मध्ये अ‍ॅम्बेसेडर कारची किंमत 5.22 लाख रुपये होती.1957 ते 2014 दरम्यान, कंपनीने बाजारात आपली एकूण 7 व्हेरिएंट लाँच केले. परंतु आता बदलत्या काळानुसार अ‍ॅम्बेसेडरही बदलणार आहेत. या वेळी अ‍ॅम्बेसेडर इलेक्ट्रिक स्वरुपात परतणार असल्याचे वृत्त आहे.

हिंदुस्थान मोटर्सचे संचालक उत्तम बोस यांनी सांगितले, की नव्या ‘अ‍ॅम्बी’चे डिझाईन, नवा लुक आणि इंजिन यावर काम सुरू आहे. हिंदुस्थान मोटर्सने यासाठी युरोपियन ऑटोमोबाईल कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे.