नवी दिल्ली : बहुचर्चित ‘टेस्ला’च्या भारतातील एंट्री विषयी अनेक वर्षांपासून चर्चा आहे. अब्जाधीश एलन मस्क भारतात व्यवसायाचा विस्तार केव्हा करणार यावरुन तर्कवितर्क लढविले जात आहेत. दरम्यान, एलन मस्क यांनी भारतातील टेस्लाच्या लाँचिंग (Tesla Launching) विषयी ट्विटद्वारे माहिती दिली आहे. टेस्लाचे प्रत्यक्ष उत्पादन सुरू झाल्याशिवाय भारतात विक्रीला परवानगी दिली जात नाही. त्यामुळे भारतात चीन किंवा अन्य देशांत उत्पादित टेस्लाची वाहनं विक्री करण्यास बंदी असल्याचं सांगत एलन मस्क (Elon Musk) यांनी चेंडू केंद्राच्या कोर्टात भिरकावला आहे. महाराष्ट्र, तेलंगणा सहित पाच राज्यांनी टेस्लाला आमंत्रण दिलं होतं.
आघाडीची इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्लाला केंद्र सरकारच्या भूमिकेमुळं सेटबॅक बसला होता. टेस्लाने केंद्राकडं इलेक्ट्रिक वाहनं आणि सुट्या भागांवर आयात शुल्क कपातीची मागणी केली होती. मात्र, केंद्रानं नियमांवर बोट ठेवत करकपातीचा प्रस्तान फेटाळला होता. अन्य इलेक्ट्रिक वाहन कंपन्या समान कर संरचनेत भारतात व्यवसाय सुरू ठेवण्यास सहमत असताना टेस्लाचा पर्याय प्रस्तावित नसल्याचं अप्रत्यक्ष कर मंडळानं म्हटलं होतं.
एलन मस्क यांनी जगात अन्यत्र निर्मित वाहने स्पर्धात्मक दरात भारतात विक्री करण्यासाठी आयात कर कपातीचा प्रस्ताव सरकारकडे दिला होता. मात्र, चीन बनावटीची वाहने भारतात विक्री करण्यावर केंद्रानं स्पष्ट शब्दात नकार दर्शविला होता. केंद्रानं अद्याप टेस्लाकडं स्थानिक उत्पादन निर्मिती व विक्री योजना सादर केलेली नाही. केंद्रानं संपूर्ण निर्मित वाहनाऐवजी अर्धनिर्मित किंवा सुट्टे भाग आयात करुन करुन भारतात संपूर्ण वाहनाची बांधणी करावी असा पर्याय टेस्लाला दिला होता. आयात कर व देशांतर्गत उत्पादनाच्या मागणीमुळं टेस्लाचे भारतातील आगमन लांबणीवर पडले आहे.
· Y लाँग रेंज AWD आणि परफॉर्मन्स ही दोन टेस्लाची मॉडेल लाँच करण्यात आली आहेत.
· टेस्लाची वाहने इलेक्ट्रिक मोटर्सवर संचलित आहेत.
· टेस्लाच्या कारची बाजारात अंदाजित किंमत 60 लाख रुपये आहे.
· टेस्ला कार 0-97 किमी प्रतितास वेगाने धावते असा प्राथमिक दावा आहे.
· इलेक्ट्रिक कारची रेंज 480 किलोमीटर असून टेस्लानं 525 किलोमीटर कमाल रेंजचा दावा केला आहे.