Elon Musk Tesla | प्रतिक्षा लवकरच संपणार, टेस्लाच नाही तर अन्य आलिशान कार रस्त्यावर धावणार
Elon Musk Tesla | टेस्ला कंपनी लवकरच भारतात मांडव टाकणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकन दौऱ्यावर गेले असता सीईओ एलॉन मस्क यांनी भेट घेतली होती. त्यावेळी भारतात इलेक्ट्रिक कार आणण्यावर चर्चा झाली होती. कंपनीला भारत सरकारकडून काही सवलती हव्या होत्या. त्यावर सकारात्मक चर्चा झाल्याचे समोर येत आहे.

नवी दिल्ली | 18 ऑक्टोबर 2023 : केंद्र सरकार टेस्ला सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या कार उत्पादकांसाठी खास सवलतींचा पाऊस पाडणार आहे. अशा जागतिक ब्रँडसाठी एक विशेष योजना आणण्याचा विचार सुरु आहे. त्यासाठी एक Framework तयार करण्यात येत आहे. कार उत्पादकांसाठी पायघड्या अंथरणात येणार आहे. अर्थात त्यासाठी या जागतिक ब्रँड्सला काही अटींची पुर्तता करावी लागणार आहे. त्यामुळे टेस्लासह अनेक कंपन्याच्या कार लवकरच भारतीय रस्त्यावर दिसतील. सर्व काही व्यवस्थित झाले तर भारतीय ऑटो सेक्टरला सुगीचे दिवस येतील. अनेक स्टार्टअप्सना चालना मिळेल. अर्थव्यवस्थेला हातभार लागेल.
- आयात शुल्क – भारत सरकार या कार उत्पादकांसाठी मोठ्या सवलती देईल. पण त्यासाठी अटींची पुर्तता करावी लागेल. केंद्र सरकार या कार कंपन्यांसाठी आयात शुल्क 100 टक्क्यांहून थेट 15 टक्के आणण्याच्या विचारात आहे. पण या कंपन्यांना कारची बांधणी, कारच्या काही पार्टसचे भारतात करावे लागणार आहे. स्थानिकांना रोजगार द्यावा लागेल. स्थानिक कंपन्यांना, व्हेंडर्संना सोबत घेऊन उत्पादन करावे लागणार आहे.
- लिखित हमी – केंद्र सरकार कार उत्पादकांसाठी इको सिस्टिम तयार करत आहे. त्यासाठी कंपन्यांना लिखित हमी द्यावी लागेल. सुरुवातीच्या काळात 20 टक्के पार्ट्स स्थानिक बाजारातून तर चार वर्षानंतर 40 टक्क्यांहून अधिक पार्ट्स स्थानिक व्हेंडर्सकडून अथवा त्यांच्या स्थानिक उपकंपन्याकडून खरेदी करावे लागतील. उत्पादन भारतात करावे लागणार आहे. बँक गॅरंटी ड्यूटी ब्रेक मूल्याइतके असेल.
- दादा कंपन्यांना झटका – आयात शुल्कात केंद्र सरकार मोठ्या कपातीची घोषणा करु शकते. त्याचा फटका भारतीय बाजारातील दादा कंपन्यांना बसू शकतो. टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक सेगमेंटमधील दमदार कामगिरीवर त्याचा परिणाम दिसू शकतो. जागतिक ब्रँडशी दोन हात करताना या कंपन्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
- परदेशी ब्रँडला फायदा – टेस्ला, बीएमडब्ल्यू आणि ऑडी सारख्या परदेशी ब्रँडला या धोरणाचा मोठा फायदा होईल. चीन आणि इतर देशातील तोट्यातील प्लँट भारतात सुरु करण्यास त्यांना मदत होईल. आयात शुल्क कपातीमुळे आशियासह इतर खंडात बजेट इलेक्ट्रिक कारची विक्री होऊ शकते. भारतीय ऑटो सेक्टरमध्ये बुमिंग येऊ शकते.