किआ मोटर्सचा नवा प्लॅन; भारतातील निमशहरी आणि ग्रामीण बाजारपेठ काबीज करण्याची तयारी
'किआ'च्या यापूर्वीच्या सोनेट आणि सेल्टोस या एसयुव्ही कारचा भारतीय बाजारपेठेत चांगलाच खप झाला होता. | Kia motors
नवी दिल्ली: गेल्याचवर्षी वाहननिर्मिती क्षेत्रात पदार्पण केलेल्या किआ (Kia motors) कंपनीने आता भारतातील निमशहरी आणि ग्रामीण बाजारपेठेत विस्तार करण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवले आहे. ‘किआ’च्या यापूर्वीच्या सोनेट आणि सेल्टोस या एसयुव्ही कारचा भारतीय बाजारपेठेत चांगलाच खप झाला होता. यानंतर आता ‘किआ’ने भारतातील बाजारपेठ आणखी विस्तारण्याचा निर्णय घेतला आहे. (Kia motors plans to expand further in Indian Market)
किआ मोटर्सचे अधिकारी ताय जिन पार्क यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, आमच्या कंपनीला आता निमशहरी आणि ग्रामीण बाजारपेठ पादाक्रांत करायची आहे. त्यासाठी कंपनीने डीलर्सना विशेष लाभ द्यायचे ठरवले आहे. आम्ही सध्या आमचे नेटवर्क वाढवण्यावर भर देत आहोत. पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत देशभरात 300 टचपॉईंटस उभारण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. याशिवाय, आम्ही टियर ४ शहरांवरही लक्ष केंद्रित करणार आहोत. जेणेकरून आम्ही बाजारपेठेत आणखी खोलवर शिरकाव करू, असे ‘किआ’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘किआ’च्या मागणीत वाढ
किआ कंपनीच्या गाड्यांना बाजारपेठेत सध्या चांगली मागणी आहे. मात्र, इतर कंपन्या ज्या भागांमध्ये जाऊ इच्छित नाहीत त्याठिकाणची बाजारपेठ आम्हाला काबीज करायची आहे. ग्राहक अनेकदा ब्रँड पाहून वाहनाची खरेदी करतात. आम्ही पहिली कार बाजारपेठेत लाँच करतानाच ही गोष्ट ध्यानात ठेवली होती.
आता आमचे पुढील लक्ष्य बाजारपेठेत आणखी खोलवर जाणे हे आहे. भारतात सध्याच्या घडीला हजार लोकांपाठी केवळ 22 जणांकडे कार आहे. त्यामुळे भारतीय बाजारपेठेत विस्तार करण्यास आम्हाला खूप मोठी संधी असल्याचे ‘किआ’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सध्या लहान शहरे आणि गावांमध्ये किआ कंपनीच्या कार लोकप्रिय आहेत. फरीदाबाद, मुंबई आणि बंगळुरूत किआ कंपनीकडून समर्पित कौशल्य वृद्धी आणि प्रशिक्षण केंद्रही सुरु करण्यात आले आहे. जेणेकरून आम्ही आमच्या ग्राहकांना चांगली सेवा प्रदान करु शकतो, असे ‘किआ’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
संबंधित बातम्या:
ऑटो इंडस्ट्रीने दिवाळीत गियर बदलला, नोव्हेंबर महिन्यात वाहनांची रेकॉर्डब्रेक विक्री
Maruti Suzuki चा नवा विक्रम, ऑनलाईन चॅनेलच्या माध्यमातून दोन लाखांहून अधिक गाड्यांची विक्री
(Kia motors plans to expand further in Indian Market)