Maruti, Tata आणि Hyundai लाँच करणार 6 नव्या गाड्या, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
तुम्हीही नवीन गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तरी ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण येत्या काही दिवसात कमी किमतीत कॉम्पॅक्ट एसयूव्ही भारतीय बाजारात लाँच केल्या जाणार आहेत.

मुंबई : भारतीय बाजारात गेल्या काही दिवसात गाड्यांची मागणी झपाट्याने वाढली आहे. कंपन्याही ग्राहकांची गरज ओळखून एकापेक्षा एक सरस गाड्या मार्केटमध्ये लाँच करत आहे. तुम्हीही नवीन गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तरी ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण येत्या काही दिवसात कमी किमतीत कॉम्पॅक्ट एसयूव्ही भारतीय बाजारात लाँच केल्या जाणार आहेत. तसं पाहिलं तर भारतीय बाजारात तीन कंपन्यांचा सर्वाधिक बोलबाला आहे. यामध्ये मारुती सुझुकी, ह्युंदाई आणि टाटा मोटर्सचं नाव आघाडीवर येतं. गेल्या महिन्यातील गाड्यांची विक्रीची आकडेवारी पाहून तुम्हाला याबाबतचा अंदाज येईल. आता मारुती सुझुकीसह ह्युंदाई आणि टाटा मोटर्स कॉम्पॅक्ट एसयुव्ही लाँच करण्याची तयारी करत आहे. खिशाला परवडणारी एसयुव्ही असून त्यात जबरदस्त फीचर्स आणि मायलेजही चांगला असणार आहे. त्यामुळे गाडी खरेदी करण्यासाठी चांगले पर्याय उपलब्ध होणार आहेत. यासोबत बजेट इलेक्ट्रिक कारचाही पर्या असणार आहे. चला जाणून घेऊयात अपकमिंग कॉम्पॅक्ट एसयुव्हीची लाँच आणि अंदाजित किंमत..
Maruti Suzuki : मीडिया रिपोर्टनुसार मारुती कंपनी येत्या दोन ते तीन महिन्यात 3 नव्या एसयुव्ही लाँच करू शकते. यामध्ये फ्रॉन्क्स आणि जिम्नीची बुकिंग यापूर्वीच सुरु झाली आहे. आकर्षक लूक आणि फीचर्ससह या दोन्ही एसयुव्ही ऑटो एक्स्पो 2023 मध्ये सादर केल्या होत्या. लवकरच या दोन्ही गाड्यांच्या किंमतीचा खुलासा केला जाईल.मारुती फ्रॉन्क्स या गाडीची सुरुवातीची किंमत 7 लाख आणि जिम्नीची किंमत 10 रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त मारुती सुझुकी ब्रेझाचं सीएनजी मॉडेलही लवकरच लाँच केलं जाऊ शकतं.
TATA Motors : रिपोर्टनुसार, टाटा कारप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. कारण टाटा मोटर्स लवकरच आपली मायक्रो एसयुव्ही पंच इलेक्ट्रिक आणि सीएनजी व्हेरियंटमध्ये लाँच करण्याची शक्यता आहे. पंचचं सीएनजी मॉडेल नुकतंच ऑटो एक्स्पो 2023 मध्ये सादर करण्यात आलं होतं. पंच सीएनजी आणि पंच इव्ही 10 रुपयांच्या किमतीत बाजारात सादर केली जाईल, अशी शक्यता आहे.पंच इव्हीच्या माध्यमातून टाटा मोटर्स इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये आणखी मजबूत स्थितीत उतरेल.
Hyundai : ह्युंदाई मोटर इंडिया लवकरच कॅस्पर लाँच करण्याची शक्यता आहे. या गाडीची स्पर्धा टाटा पंच सारख्या मायक्रो एसयुव्हीशी असेल. या गाडीचा लूकही बेबी वेन्यूसारखा आहे. अपकमिंग कारमध्ये लेटेस्ट फीचर्स असणार आहेत. या गाडीची किंमत 6 ते 7 लाख रुपये असू शकते.