पिटुकली बुलेटवर मारायची का रपेट, नाव माहिती आहे का?
Mini Bullet | बुलेट म्हणजे एक जानदार, शानदार सवारी. बुलेटची रपेट म्हणजे दिमाखदार सवारीच जणू. पण या मिनी बुलेटने अनेकांना धक्का दिला आहे. ही बुलेट रस्त्यावर धावत असताना अनेकांनी तिचा व्हिडिओ काढला तर काहींनी तिला कॅमेऱ्यात कैद केले. या बुलेटने सर्वांचेच लक्ष वेधले. काय नाव आहे या मिनी बुलेटचे?
नवी दिल्ली | 2 नोव्हेंबर 2023 : बुलेटची (Bullet) धडधड अनेकांची जीव की प्राण असते. एका खास वर्ग बुलेटवर मनापासून प्रेम करतो. बुलेटची ऐटदार सवारी अनेकांना सुखावणारी असते. कंपनीच्या विविध दुचाकी ग्राहकांच्या गळ्यातील ताईत आहे. ग्राहक स्टेटस सिंबॉल म्हणूनही कंपनीच्या मोटरसायकली खरेदी करीत असतात. त्यामुळे कंपनीदेखील ग्राहकांच्या पसंतीला पडतील अशा दुचाकींची निर्मिती करते. पण दिल्लीच्या रस्त्यावर मिनी बुलेटने ( Mini Bullet) अनेकांना धक्का दिला. या बुलेटने सर्वांचेच लक्ष वेधले. या इटुकल्या-पिटुकल्या बुलेटने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. तिचा व्हिडिओ पण व्हायरल झाला आहे.
काय आहे नाव
बुलेट म्हणजे मस्क्युलर बाईक, अशी छबी तयार झाली आहे. उंचपुऱ्या लोकांसाठी ही बाईक तर जणू ऐटदार सवारीच आहे. पण या लिटिल, मिनी बुलेटने सर्वांनाच धक्का दिला. पण हे छोटे व्हर्जन Royal Enfield ने तयार केले नाही तर एका व्यक्तीने ही मिनी बुलेट तयार केली आहे. या Mini Bullet चे नाव Pinky असे ठेवण्यात आले आहे. दिल्लीच्या रस्त्यावरुन ही पिंकी धावली. त्यावेळी अनेकांच्या नजरा खिळल्या, वळल्या आणि अनेकांनी उत्स्फुर्त प्रतिक्रिया नोंदवल्या. या बाईकने कमाल केली. मिनी व्हर्जनची चर्चा रंगली.
Instagram वर व्हिडिओ
View this post on Instagram
Instagram युझर Rammy Ryder ने या मिनी बुलेटचा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओला त्याने पिंकी असे कॅप्शन दिले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या बाईकला Rammy ने एका स्कूटरपासून तयार केले आहे. स्कूटरमध्ये अनेक बदल करत तिला एका मिनी बुलेटचे रुप देण्यात आले आहे. या व्हिडिओनुसार ही पिटुकली बुलेट सिंगल सीटर आहे. या बुलेटला रिअर मोनोशॉक आणि फ्रंट टेलिस्कोपिक फॉर्क्स देण्यात आले आहे. या बुलेटची बॉडची पिंक नाही तर तिची अलॉय व्हिल्स पण पिंक रंगाने रंगलेली आहेत.
व्हिडिओ झाला व्हायरल
या मिनी बुलेटचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. अनेक युझर्संनी त्यांच्या मुलांसाठी ही बाईक हवी असल्याची प्रतिक्रिया नोंदवली आहे. काही युझर्सनी त्यांच्या उंचीची माहिती देत, अशा बुलेटवर रपेट मारण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ही बाईक सायकलपेक्षा पण कमी उंचीची दिसत आहे. पण अनेकांना या बाईकने सुखद धक्का दिल्याचे दिसून येते.