Volkswagen कंपनी स्वतःचं नाव बदलणार, नव्या नावामागे दूरदृष्टी
जर्मन ऑटोजायंट फोक्सवॅगन (Volkswagen) ग्रुप लवकरच यूएसमध्ये त्यांच्या ग्रुपचे नाव बदलेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई : जर्मन ऑटोजायंट फोक्सवॅगन (Volkswagen) ग्रुप लवकरच यूएसमध्ये त्यांच्या ग्रुपचे नाव बदलेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. कंपनीचं नवीन नाव Voltswagen असे असेल. या नव्या नावामागे कंपनीची दूरदृष्टी लपली आहे. कंपनी आगामी काळात इलेक्ट्रिक वाहनांवर अधिक लक्ष केंद्रित करणार आहे. त्यामुळेच कंपनी स्वतःचं नाव Voltswagen असं ठेवणार असल्याचे बोलले जात आहे. कंपनी आज (30 मार्च) याबाबत घोषणा करु शकते. दरम्यान, कंपनीने हे नाव अद्याप जाहीर केलेलं नाही. (Volkswagen plans to change its name to ‘Voltswagen’ in US. Here is why)
कंपनीने सोमवारी आपल्या संकेतस्थळावर पोस्ट केलेल्या निवेदनात याबाबतची माहिती दिली होती. कंपनीने नंतर सदर निवेदन संकेतस्थळावरुन हटवलं. परंतु तोवर काही माध्यमांनी याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केलं होतं. फोक्सवॅगन कंपनीने सध्या अमेरिकेत ID.4 इलेक्ट्रिक SUV साठी बुकिंगला सुरुवात केली आहे. कंपनीचे हे नवीन इलेक्ट्रिक मॉडेल आहे.
कंपनीने आगामी काळात अनेक इलेक्ट्रिक वाहनं बनवण्याची योजना आखली आहे. परंतु ID.4 सेलसह काही ठराविक गाड्याच अमेरिकेतील रस्त्यांवर फोक्सवॅगन या नावासह धावताना पाहायला मिळतील. गेल्या वर्षी कंपनीने फोक्सवॅगन या ब्रँडअंतर्गत 3 लाख 26 हजार वाहनं विकली होती.
नावाच्या स्पेलिंगमध्ये K ऐवजी T चा वापर
सूत्रांनी दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवला तर फॉक्सवॅगन ग्रुप ऑफ अमेरिकेच्या नावामध्ये इतर ब्रँडसुद्धा समाविष्ट आहेत. यात ऑडी, बेंटली, बुगाटी आणि लॅम्बोर्गिनी ब्रँड आहेत ज्यांची नावे बदलली जाणार नाहीत. कंपनीच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये (Volkswagen) K ऐवजी T चा वापर केला जाणार आहे. त्यामुळे कंपनीचं नवं नाव Voltswagen असं होणार आहे. त्यामुळे कंपनीची सर्व इलेक्ट्रिक वाहनं आता Voltswagen या नावासह लाँच होतील. तर पेट्रोल वाहनं Volkswagen या नावानेच लाँच केली जातील.
भारतातही इलेक्ट्रिक अनुकूल वातावरण?
प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. पूर्वी इलेक्ट्रिक वाहनांच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिले नाही. कार/बाईक कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत.
दरम्यान, ह्युंदाय कंपनी भारतात अनेक इलेक्ट्रिक वाहनं लाँच करण्याच्या तयारीत असल्याने कंपनी भारतात तब्बल 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. टेस्ला ही जगभरात सर्वोत्तम लक्झरी इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनीदेखील भारतात त्यांचा व्यवसाय सुरु करत आहे. इलेक्ट्रिक वाहनांबाबत भारतात एकीकडे अशा प्रकारची सकारात्मकता असताना जागतिक बाजारातील एका आघाडीच्या कार उत्पादक कंपनीने मात्र वेगळा निर्णय घेतला आहे.
इलेक्ट्रिक गाड्यांसाठी भारतातील मार्केट नको बाबा! ‘स्कोडा’ने पाठ फिरवली
चेक रिपब्लीकची वाहन निर्माता कंपनी स्कोडाने खुलासा केला आहे की, ते अद्याप भारतीय बाजारात इलेक्ट्रिक कार लाँच करणार नाहीत. कंपनीला असे वाटते की, सध्या भारतीय बाजार अशा वाहनांसाठी तयार नाही. येथे अशा वाहनांच्या खरेदीचा खर्च खूप जास्त आहे. कंपनी भारतीय बाजारात रॅपिड आणि सुपर्बची विक्री करते. या व्यतिरिक्त कंपनी भारतात जूनमध्ये आपली एसयूव्ही सादर करण्याची तयारी करत आहे. स्कोडाने इलेक्ट्रिक कार्सप्रमाणे डिझेल पॉवरट्रेनपासून स्वतःला दूर ठेवले आहे. कंपनी भारतीय बाजारात केवळ पेट्रोल कार लाँच करणार आहे.
स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक गुरप्रताप बोपाराय म्हणाले की, सध्या भारतात सामान्य लोकांसाठी इलेक्ट्रिक वाहने स्वस्त नाहीत. बॅटरीचे दर कमी झाले आहेत परंतु इंटरनल कम्बशन इंजिन कारशी स्पर्धा करण्याच्या स्थितीत नाहीत. त्याला काही वर्ष लागतील. बोपाराय म्हणाले की सध्या भारतात इलेक्ट्रिक कारचा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाही.
संबंधित बातम्या
बहुप्रतीक्षित Electric Jaguar I-Pace भारतात लाँच, किंमत फक्त…
केवळ 50 मिनिटात फुल चार्ज, देशातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक बाईकची रेकॉर्डब्रेक विक्री
(Volkswagen plans to change its name to ‘Voltswagen’ in US. Here is why)