भारतात या किंमतीला टेस्ला इलेक्ट्रीक कार मिळणार ? काय आहे इलोन मस्क यांची योजना
टेस्ला कंपनी आपल्या सेटअपद्वारे भारतात दरवर्षी पाच लाख इलेक्ट्रीक कार युनिटचे प्रोडक्शन करणार असल्याचे म्हटले जात आहे.
नवी दिल्ली : अब्जाधीश इलोन मस्क ( Elon Musk ) यांची बहुचर्चित टेस्ला कंपनीची ( Tesla Electric Car ) इलेक्ट्रीक कार भारतात लॉंच होणार आहे. लवकरच त्यासंबंधीचे सोपस्कार पूर्ण केले जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यात टेस्ला कंपनीचे सर्वेसर्वा इलोन मस्क यांनी त्यांची भेट घेतली होती. भारतात टेस्लाच्या उत्पादनासाठी लवकरच करार होण्याची शक्यता आहे. भारतीयांना इलेक्ट्रीक कारची विक्री करण्यासाठी ती भारतीय वातावरणासाठी उपयुक्त असण्याची गरज आहे. भारतात तिची किंमत किती असावी याविषयी अनेक शक्यता वर्तविण्यात येत होत्या आता नेमकी ती किती रुपयांना मिळेल याची माहीती पुढे आली आहे.
इलेक्ट्रीक कार निर्माता इलोन मस्क यांची बहुप्रतिक्षित टेस्ला कार अखेर भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतात ही कार निर्माण झाल्यास त्याची किंमत कमी होणार आहे. त्यामुळे लवकरच भारतात टेस्लाची निर्मिती होण्याची तयारी सुरु होणार आहे. चीननंतर भारत कारचे सर्वात उत्पादन होत आहे.
टेस्ला कंपनी आपल्या सेटअपद्वारे भारतात दरवर्षी पाच लाख इलेक्ट्रीक कार युनिटचे प्रोडक्शन करणार असल्याचे म्हटले जात आहे. या कारची किमान किंमत 20 लाखांपासून सुरु होण्याची शक्यता असल्याचे टाईम्सने म्हटले आहे. भारतीय व्यापार आणि वाणिज्य मंत्रालयाने दिलेल्या माहीतीनूसार देशात प्रोडक्शन सुरु करण्याच्या अटीवर टेस्लाशी करार करण्यात येणार आहे.
चीननंतर टेस्ला कंपनीला इंडो पॅसिफिक रिजनमधील भारतीय मार्केट खुणावत आहे. टेस्ला कंपनी एक चांगला प्लान घेऊन आमच्याकडे आली आहे आणि आम्हाला खात्री आहे की यावेळी बोलणी सकारात्मक होतील, विशेषत: स्थानिक उत्पादन आणि निर्यात दोन्हींचा समावेश करारात असल्याने मोठी आशा निर्माण झाली असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
भारताचा चौथा क्रमांक
मारुती, एमजी, टाटा, महिंद्र अशा अनेक भारतीय आणि परदेशी कंपन्यांची मदतीने भारतातही इलेक्ट्रीक कार भारतात तयार होऊ लागल्या आहेत. या स्पर्धेत आता टेस्ला देखील उतरणार असल्याने मोठी स्पर्धा निर्माण होणार आहे. भारतात सध्या इलेक्ट्रीक कार प्रचंड महाग असताना 20 लाखांत जर टेस्ला कार मिळणार असेल तर भारतीय ग्राहकांसाठी ही मोठी आनंदाची गोष्ट ठरेल असे म्हटले जात आहे. भारतीय कार मार्केटने जोरदार मुसंडी मारली असून संपलेल्या आर्थिक वर्षांत 3.9 दशलक्ष युनिट्सच्या विक्रीसह भारत जगातला चौथा देश बनला असून भारताच्या पुढे केवळ चीन, अमेरिका आणि जपान आहे असे एका अहवालात म्हटले आहे.