BLOG: तथ्यप्रियता – भाग 1 : वाढती दरी

“श्रीमंत लोक वरचेवर श्रीमंतच होत आहेत आणि गरीब लोक अजूनच गरीब होत आहेत.” खरंच असं आहे का? संपत्तीच्या आधारे जगाचे  “श्रीमंत” आणि “गरीब” असे दोनच भाग पडतात का?

BLOG: तथ्यप्रियता - भाग 1 : वाढती दरी
Follow us
| Updated on: Feb 04, 2020 | 9:32 AM

दरवर्षी “The Forbes World’s Billionaires list” जाहीर होत असते. जगातील अतिश्रीमंत व्यक्तींची नावं पाहून कुणालाही आश्चर्यच वाटावं. कारण पहिली दोन-तीन नावं बऱ्याच वर्षांपासून तीच आहेत, फक्त त्यांच्याकडील मायाजळी (पैसे/संपत्ती) मात्र दरवर्षी वाढतच आहे. जेफ बेजोस, बिल गेट्स, वॉरेन बफ्फे यांच्यातच पहिल्या स्थानाची स्पर्धा असते. तर भारतीय कोट्याधीश “मुकेश अंबानी” हे एकमेव उद्योगपती पहिल्या वीसमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत आहेत. 2018 रोजी मुकेश अंबानी 18 व्या स्थानावार होते. 2019 रोजी 13 व्या स्थानावर आहेत. कुणाही सामान्य माणसाला संभ्रमित करुन टाकण्याचं काम ही यादी करते; कारण ही नावं पुन्हा-पुन्हा वाचून कुणालाही सहज वाटू शकतं की, “श्रीमंत लोक वरचेवर श्रीमंतच होत आहेत आणि गरीब लोक अजूनच गरीब होत आहेत.” खरंच असं आहे का? संपत्तीच्या आधारे जगाचे  “श्रीमंत” आणि “गरीब” असे दोनच भाग पडतात का?

रविवारी सकाळी बातम्या पाहाव्या म्हणून मी टी.व्ही. चालू केला. एका वाहिनीवर आफ्रिकेतल्या दुर्गम भागात राहत असलेल्या आदिवासी लोकांचं जीवनमान आणि आरोग्याचे प्रश्न याबद्दलचा माहितीपट चालू होता. माझं लगेच लक्ष वेधलं गेलं आणि मी तो माहितीपट पाहू लागले. आज इतक्या प्रगत काळातही आपल्यातलीच माणसं इतकं हलाखीचं जीवन जगत आहेत, हे पाहून नकळतच माझ्या मनात सहानुभूती निर्माण झाली अन् मला उगीच वाईट वाटू लागलं. तान्ह्या बाळांचा जन्म होताना आई व बाळ यांचा पुरेशा सुविधेअभावी होणारा मृत्यू , स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे होणारे रोग आणि मलेरियाने घातलेलं थैमान… त्या काळ्या  कुळकुळीत, किडकिडीत कुपोषित मुलांकडे पाहून मन हेलावून जात होतं. बालमृत्यूदर आटोक्यात यावा म्हणून इतकी वर्षं तिथलं सरकार प्रयत्न करत आहे. मग तरीही हे चित्र अजूनही वाईटच का आहे, असा प्रश्न मला पडला.

माझं अस्वस्थ मन काही केल्या शांत होईना, म्हणून मी जरा गुगलवर बोटं फिरवली आणि खूपच उपयुक्त अशी माहिती मला मिळाली. ज्या देशाबद्दल मी बोलतेय तो देश आहे ‘सोमालिया’ आणि गुगलवर अधिकृत स्त्रोतांच्या माहितीआधारे असं दिसतंय, कि बालमृत्यू रोखण्यात या देशाला बरचसं यश मिळालंय. 1950-55 च्या दरम्यान बालमृत्यूदर (दर एक हजार जन्मामागे बालमृत्यूचे प्रमाण) 287 होता जो 2010-15 रोजी 132 पर्यंत खाली आलाय. 2015-20 ची आकडेवारी अजून येणे बाकी आहे.

बालमृत्यूदर (Child mortality) 

म्हणजेच माझ्या मनात इतका वेळ जे चित्र पिंगा घालत होतं, ते जरा चुकीचं होतं तर! जरी सोमालियाची स्थिती वाईट असली तरी ती खालावतच आहे, हे साफ चुकीचं होतं! एकंदरीत, हातात पुरेशी माहिती असताना आपल्याला स्पष्ट चित्र दिसायला मदत होते! वरील आकृतीमध्ये तुम्ही ते प्रत्यक्ष पाहू शकता.

मग टी.व्ही. वर मात्र आपल्याला असं कारुण्यमय चित्र का दाखवलं जात असावं बरं?

बहुतांश पत्रकार कथाकथनकार असतात. ते आपल्याला गोष्टी रंजक बनवून सांगू पाहतात. त्यांनी एखादी गोष्ट जशास तशी सांगितली तर ती किती कंटाळवाणी वाटेल? म्हणूनच त्यांच्या गोष्टींमध्ये रंजकता यावी, यासाठी ते नाट्यमय चित्र आपल्यासमोर उभं करतात. तेच काम चित्रपट निर्माते करतात. गरीब विरुद्ध श्रीमंत, नायक विरुद्ध खलनायक, चांगले विरुद्ध वाईट या गोष्टी चित्रपटातूनही आपण सर्रास पाहतो. विशेष म्हणजे हे सिनेमे प्रचंड चालतातही, डोक्यावरही घेतले जातात.

जेव्हा जगाचं चित्र आपल्या डोळ्यांसमोर येतं, तेव्हाही नकळत आपण जगाला दोन भागात विभागून टाकतो – “श्रीमंत आणि गरीब” किंवा “विकसित आणि विकसनशील/अविकसित”. हे खरंच असं आहे का? सगळ्या गोष्टी खरंच इतक्या सहजासहजी दोन“च” भागांत/गटांत कशा काय विभाजित होतात?

याला कारण आहे- कुठल्याही गोष्टीला अगदी दोन भागात वाटून मोकळं होण्याची आपली वृत्ती (Binary thinking). आपल्या मेंदूला हो/नाही (Yes/No) प्रकारातले प्रश्नोत्तरं आवडतात, तसंच आहे हे! फार विचार न करता आपल्याला गोष्टी दोन गटात विभागून टाकायला आवडतं. आश्चर्य म्हणजे या दोन गोष्टीच्या मध्ये फक्त मोकळी जागा असते, असंच नकळत गृहीत धरलेलं असतं!  अशाप्रकरची वाटणी करणं एक तर सोप्पं आहे आणि दुसरं म्हणजे यातून विसंगती अधोरेखीत होत असते, जे आपल्याला आवडतं! (याला “Contrast Effect” म्हणतात.)

मध्यंतरी बऱ्याच ठिकाणी “The West” vs. “The Rest” असं वाचण्यात आलं. पाश्चात्य देशांना असं वाटतं, की बाकी सगळ्यांपेक्षा त्याचं जीवन सुखवस्तू आहे, आरामदायी आहे. तिसऱ्या जगाबद्दल सर्वांनाच असं वाटतं, की “ते” खूप “गरीब” आहेत आणि “आपण” खूप “श्रीमंत” आहोत आणि ही दरी वाढतेच आहे व हे अंतर कधीच भरून निघणार नाही इत्यादी. यालाच ‘Gap instinct’ असे म्हणतात. थोडक्यात काय तर दोन वेगवेगळे गट आणि त्यांच्यातली वाढती दरी असं चित्र आपल्या डोक्यात घट्ट बसलेलं आहे!  पण खरंच असं आहे का? हे तपासूनच पाहायला हवं.

Help! Majority is missing!

हांस रोस्लिंग नावाच्या स्वीडिश प्राध्यापकाने वर्ल्ड बँकेच्या व्याख्येतून “विकसित देश” (उच्च उत्पन्न गट) आणि “ विकसनशील देश” (अल्प उत्पन्न गट) ही शब्दावली काढून टाकायला भाग पाडलं. प्रा. रोस्लिंग यांच्या मते जगाचे फक्त दोन भाग करणं चुकीचं आहे. वर्ल्ड बँकेने देखील आता मान्य केलंय की जगाचे दोन ऐवजी किमान चार भाग पडतात. जगाच्या एकूण लोकसंख्येला उत्पन्नाच्या आधारे जर आपण चार भागांमध्ये विभागले तर खालील प्रमाणे आकृती मिळेल.

वरील आकृतीतून असे लक्षात येईल, की जो बहुसंख्य लोकांचा गट “उच्च” आणि “कमी” यांच्यामध्ये आहे (लेवल २ आणि ३ – म्हणजेच मध्यम उत्पन्न गट) तोच गाळला जात होता. जवळपास 5 बिलियन लोक आपण आपल्या विभागणीत मोजतच नव्हतो; म्हणजेच जे मधल्या मोकळ्या जागेत मोडत आहेत अशा जवळपास 75 % लोकांना गहाळ करुन आपण जगाचं चित्र पाहत होतो. याचाच अर्थ असा की, मध्ये मोकळी जागा नव्हती/नाहीये.

उच्च आणि कमी उत्पन्न गट यामध्ये जी दरी आहे ती आभासी आहे किंवा आपण असं म्हणू की जर ही दरी असेलच, तर ती आता भरुन निघत आहे. Forbes च्या यादीत दरवर्षी नवीन कोट्याधीश झळकत आहेत. सर्वच देश हळूहळू विकासाकडे सरकत आहेत. हे वैश्विक सत्य आहे. याची पडताळणी करण्यासाठी आरोग्य, प्राथमिक शिक्षण, बालमृत्युदर या आणि अशा अनेक परिमाणांवर देशाच्या प्रगतीची मोजणी होत असते. यात असंच दिसून येतंय, की उत्तरोत्तर सर्वच देश विकसित होत आहेत आणि दरवर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेत त्यांचा आलेख उंचावतच आहे. ही बाब खुपच सकारात्मक असून आपण नाट्यमयदृष्ट्या विभागणी करुन जगाला दोनच भागात पाहण्याची चूक करतोय. कुठलाही विकसित देश आज जिथे आहे, त्या प्रवासात कधी तरी विकसनशील होता, ही गोष्ट आपण सोयीस्कररीत्या विसरुन जातो. संदर्भासाठी अपेक्षित जीवनमानाचे काही देशांचे खालील ग्राफ पहा. जवळपास सर्व देशांमधील नागरिकांचे अपेक्षित जीवनमान वाढतच आहे.

Life Expectancy 1925 to 2015 (अपेक्षित जीवनमान 1925 ते 2015)

1950 साली भारताची बहुतांश लोकसंख्या निम्न उत्पन्न गटामध्ये होती, आता बहुतांश लोकसंख्या मध्यम उत्पन्न गटामध्ये मोडते. मुख्यत्वे 1980 ते 2014 या काळामध्ये निम्न उत्पन्न गटातील लोक मोठ्या संख्येने (दारिद्र्यरेषा पार करुन) मध्यम उत्पन्न गटामध्ये स्थलांतरित झाले आहेत. संदर्भासाठी खालील आकृती पहा.

Look For the Majority! It always lies in the gap, in the middle!

आज संध्याकाळी जेव्हा घरी जाल आणि बातम्यांमध्ये दोन गटातील संघर्ष वा “वाढती दरी” असे शब्द ऐकाल, तेव्हा लक्षात घ्या की पत्रकार तुम्हाला खिळवून ठेवण्यासाठी अधिकच्या माहितीला डावलून तुमच्या मेंदूशी खेळतायेत. आपण फक्त दोरीची दोन टोकं पाहतो पण त्या टोकांच्या मध्ये दोरी तर असतेच ना! तसेच दोन टोकांच्या गोष्टींची जेव्हा तुलना आपल्याला दाखवली जाते तेव्हा त्या टोकांच्या मध्येही गोष्टी आहेत हे लक्षात घ्या. वास्तवाचे नेहमीच ध्रुवीकरण केले जाते, पण बहुसंख्य/बहुमत हे नेहमीच दोन टोकांच्या मधल्या अंतरात असते. आपल्याला नेहमी रंगवून सांगण्यात येणाऱ्या “वाढत्या दरीच्या” गोष्टींमध्ये खरंच तथ्य आहे का हे डोळे उघडून पाहायला हवे, कारण माणूस स्वतः काळा किंवा पांढरा (Black or White) नसून करडा (Grey) आहे.

आपली तथ्य-प्रियता जपण्यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवा:

सरासरीची तुलना: जगभरातल्या देशांच्या दरडोई उत्पन्नाच्या सरासरीची तुलना केली तर फार काही जास्त फरक आपल्याला या चार्टमध्ये कळून येणार नाही. पण म्हणून सरासरी काढू नये असं नाही. बहुतांश वेळा तुलनात्मक बाबींमध्ये सरासरी मूल्य वापरलं जातं, जी एक केवळ संख्या असते पण त्यातून आलेख किंवा माहितीचा spread कळत नाही.

टोकांची तुलना: अत्युच्च उत्पन्न vs. अत्यल्प उत्पन्न गटांची तुलना जर केली तर आपण बहुतांश लोकसंख्येला गाळून टाकतोय. कारण शीर्षकाप्रमाणे Look For the Majority! It always lies in the gap, in the middle! लेखामध्ये आपण वाचलेल्या पहिल्या मुद्द्याचे ते उत्तर आहे. मूठभर कोट्याधीश उद्योगपती आणि अत्यल्प उत्पन्न गटातले लोक यांच्यामध्ये तुलना केली तर यांच्यात टोकाची तफावत दिसणे अगदी अटळ आहे; परंतु या दोघांमध्ये 75% लोक आहेत जे मध्यम उत्पन्न गटात मोडतात.

हेलिकॉप्टर व्यू: जसं हेलिकॉप्टरमधून पाहिल्यावर जमिनीवरील माणसं, गुरं मुंग्यांसारखी वाटतात तसेच वरच्या स्तरातून खालच्या स्तराकडे पाहिले तर सर्वच खालचे स्तर अप्रगत वाटतात. उदा. जर तुम्ही कोट्याधीश व्यक्तीच्या नजरेने लक्षाधीश माणसाला पाहिले तर त्याच्या जागेवरुन लक्षाधीश सुद्धा त्याला निम्नस्तरीय वाटेल.

हे समजण्यासाठी एक सोपे उदाहरण पाहूया: एका वर्गात 100 मुलं आहेत. त्यात हुशार मुलं आहेत 20 आणि नापास होणारी मुलं आहेत 10 तर पास होणाऱ्या मुलांची सरासरी आहे 90% ( यात मधला गट आणि हुशार मुलं आहेत. यांच्या मार्कांमध्ये खूप तफावत असू शकते. ती नेमकी किती आहे हे सरासरीतून कळू शकत नाही). तसेच फक्त हुशार आणि नापास मुलांची तुलना केली तर 70% मुलं जी मधल्या गटात आहेत ती आपण सोडून देतोय. याचाच अर्थ “Majority lies in the middle!” असा आहे.

जर फक्त हुशार मुलांच्या नजरेतून वर्गाकडे पाहिलं तर मधल्या गटातल्या मुलाला देखील ते निम्न स्तरात वर्गीकृत करतात. त्यांच्या दृष्टीने वरच्या 20% नंतर सगळेच मुलं बौद्धिक पातळीवर निम्न दर्जाचे असतात.

जग वाईटच होत चाललं आहे, बहुतांश लोक टोकाची श्रीमंत, गरीब, वेडी आहेत असं  बऱ्याचदा वाटून जातं व आपण दु:खी होतो. सामाजिक क्षेत्रात काम करणारे लोक निराश होऊ शकतात. तेव्हा जगाकडे असं झूम आउट करून पाहिल्याने लक्षात येणारे हे मोठे बदल जरूर लक्षात घ्या. अर्थात याचा निष्कर्ष असा नाही, की जगात सर्व आलबेल आहे, कुणी कुणाचे शोषण करत नाही, भ्रूणहत्या होत नाही, कुपोषण होत नाही, इ. माध्यमांनी या गोष्टी नेहमीच पुढे आणल्या पाहिजेत, अगदी शेवटच्या माणसाला न्याय मिळेपर्यंत.. आपण व आपले सरकार नेहमीच त्यासाठी उत्तरदायी असायला हवेत; पण गोष्टी सकारात्मकतेने बदलत आहेत, बदलू शकतात हे मात्र नक्की! म्हणून प्रयत्न सोडायला नकोत!

PS:

बऱ्याचदा उजव्या विचारसरणीची मंडळी अगदी टोकाची बतावणी करतात की मोदीजी सत्तेत आल्यापासूनच भारत सुधारलाय. मोदी काय किंवा कॉंग्रेस काय, कुणा एका माणसाच्या सत्तेत आल्यानेच गोष्टी बदलतील किंवा बदलत आहेत असे नाही. विकास आणि सकारात्मक बदल मोदी/काँग्रेस सत्तेत येण्याच्या खूप खूप आधीपासून होत आलेले आहेत. अशा वेळी सुज्ञ आणि तथ्य-प्रिय नागरिकाने वर सांगितल्याप्रमाणे पडताळणी करुन घ्यावी.

Factfulness या प्रा. हांस रोज्लिंग यांच्या पुस्तकावर आधारित.

(लेखातील मतं लेखकाची वैयक्तिक मतं आहेत.)

संबंधित ब्लॉग:

BLOG: तथ्यप्रियता – भाग 1 : वाढती दरी

BLOG: तथ्यप्रियता – भाग 2 : गौरवशाली भूतकाळाचा भांडाफोड

BLOG: तथ्यप्रियता – भाग 3 : आपल्या गैरसमजांमागचं सत्य

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.