BLOG: तथ्यप्रियता – भाग 4 : भित्यापाठी ब्रम्हराक्षस

भीती आपल्याला सावध करते, आपले रक्षण करते; म्हणून भीतीतून मुक्ती शोधू नका, भीतीचा फायदा कसा करुन घ्यायचा हे मात्र शिकायला हवं.

BLOG: तथ्यप्रियता - भाग 4 : भित्यापाठी ब्रम्हराक्षस
Follow us
| Updated on: Feb 20, 2020 | 4:43 PM

जगभरात दरवर्षी कमी-अधिक बजेटचे शेकडो भयपट तयार व प्रदर्शित होतात कारण ते फ्लॉप होण्याची शक्यता खूप कमी असते. मध्यंतरी “स्त्री” नावाचा सिनेमा चांगलाच चालला. त्याचे कथानक साधारणतः भारतातल्या कुठल्याही गावाला आपल्या इथेच घडले असे वाटावे असे! थोड्याफार फरकाने आपण सर्वांनीच तशी गोष्ट ऐकलेलीच असते. तरीसुद्धा या सिनेमाने थोडाथोडका नव्हे, चक्क 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त गल्ला जमवला. हे सिनेमावाले नेमकी नस पकडून पैसे कमावतात. आपल्या भीतीचं भांडवलात रुपांतर होताना पाहून मजा वाटते. हॉलीवूडमध्ये सुद्धा भीतीचं भांडवल करणारे कितीतरी सिनेमे आहेत – Final Destination, Annabelle, IT वगैरे! (Fear instinct and factfulness)

का बरं दरवर्षी भयपटांची घसघशीत कमाई होत असेल?

प्रा. हांस रोस्लिंग यांच्या पुस्तकावर आधारित लेखमालेतील हा चौथा लेख. आपल्यामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या वृत्ती व भावनांमध्ये “भित्री वृत्ती” ही आपल्या मेंदूवर जास्त प्रबळ ठरते. असे का होते व त्यामुळे काय धोके संभवतात हे या लेखात समजून घेऊयात.

का बरं घाबरतो आपण? तर आपल्या जगण्याची शक्यता वाढावी म्हणून! 

“घाबरणे” हे दुबळ्या माणसाचे लक्षण नाही. निसर्गानेच त्याची व्यवस्था आपल्या मेंदूमध्ये करुन ठेवली आहे. आपले घाबरणे हे नैसर्गिक, आपल्या अनुभवातून आलेले किंवा इतरांकडून शिकवलेले या तीन कारणांचे मिश्रण असू शकते. 

उदा. वेदनेची भीती नैसर्गिक आहे, कधीतरी कुत्रा चावला असेल तर इतर कुत्र्यांचीही भीती वाटणे हे आपल्या अनुभवातून आलेले घाबरणे; तर संस्कृती-समाजाने काही गोष्टींना घाबरायचं असतं असे आपल्यावर संस्कार केलेले असतात ही शिकवलेली भीती. माणसाला भीती वाटण्यासाठी काही घडावेच असं जरुरी नाही. आपल्या कल्पनेला बळी पडून काहीही झालेलं नसतानाही मनुष्य प्राणी घाबरु शकतो. केवळ याच कारणामुळे पृथ्वीतलावर सर्वात घाबरट प्राणी मनुष्य हाच असावा. त्यातूनच स्ट्रेस, डिप्रेशन, एन्क्सायटी असे मानसिक त्रासही तयार होतात.

भीती आपले निर्णय, आपल्या कृतीही नियंत्रित करते, त्या कृती साधारण तीन प्रकारच्या असू शकतात.

  1. घाबरुन थिजून जाणे (Freeze) 
  2. पलटवार करणे किंवा लढणे (Fight) 
  3. पळ काढणे (Flight)

एक मजेची गोष्ट अशी की बऱ्याचदा आपण लहान मुलांवर चिडून, रागवून त्यांना मारुन त्यांच्याकडून पाढे पाठ करुन घेत असतो. मुलांच्या मनात भीती निर्माण झाली की खरंतर त्यांची विचारशक्ती कुंठीत होते आणि ते नैसर्गिकपणे वरील तीनपैकी एका मार्गाच्या प्रतिसादासाठी तयार होतात. आपण मात्र तेव्हा धमकावल्याने त्यांची बुद्धी जास्त चालेल अशी अपेक्षा करत असतो. हा प्रचंड मोठा विरोधाभास आहे.

एका सर्वेक्षणातून असे समोर आले की जगभरात लोक ज्या गोष्टींना घाबरतात त्या अशा: साप (Snakes), उंची (Heights), छोट्या/बंदिस्त जागेत अडकून पडणे (Being trapped in small places) या प्रमुख गोष्टींनंतर स्टेजवर बोलणे, विमानप्रवास, कुत्रा, अंधार, रक्त अशा बऱ्याच गोष्टींची यादीच निघाली. आधुनिक जगात कुठल्या गोष्टींची आपल्याला जास्त भीती वाटते इथे वाचा.

मानवी उत्क्रांतीच्या काळात जगण्याचे बचाव तंत्र म्हणून आपल्या मेंदूमध्ये शारीरिक इजा, बंदिस्त जागा, विषबाधा या गोष्टींची भीती पक्की बसलेली आहे. त्याकाळी ती गरजेची देखील होती. आधुनिक काळात देखील या धोक्यांमुळे आपली घाबरट वृत्ती ‘ट्रिगर’ होते. त्यानंतर घाबरुन घेतलेले निर्णय बऱ्याचदा चुकू शकतात. 

उदा. विमान दुर्घटनेची बातमी ऐकली की आपण काही दिवस थोडं घाबरुन जातो, विमानप्रवास करायचं टाळतो, उंचीची व बंदिस्त जागेची भीती इथे कार्यान्वित होते. काही गोष्टींची भीती वाटणे हे नैसर्गिक आहे पण भीती वाटल्यानंतर तिच्या कारणांची जाणीव होऊन अनाठायी भीती ओळखणे, त्यातील खरी जोखीम ओळखणे हे महत्वाचं ठरतं. 2016 मध्ये 4 कोटी विमानांनी सुरक्षित प्रवास केला. फक्त 10 विमानांचा अपघात झाला. बातम्यांमध्ये आपण याच 10 (0.000025%) विमानांबद्दल ऐकलं/वाचलं असेल. 2016 हे विमान प्रवासाचं दुसरं “सर्वात सुरक्षित वर्ष” ठरलंय. याची मात्र बातमी झाली नाही. 1930 पासून आज 2100 पटीने आपला प्रवास अधिक सुरक्षित झाल्याचं दिसतंय. याच्या तुलनेत इतर प्रवास माध्यमांतून जास्त जीवितहानी झाली असेल पण या माहितीअभावी विमान दुर्घटनांची भीती आपल्या मनात जास्त असते.

भितीद्वारे निर्णय चुकण्याचे धोके कसे टाळता येतील हे आपण पाहूया:

  1. आपली नाटकी माहितीची भूक:

आपली मानसिक क्षमता मर्यादित असल्यामुळे जगभरात उपलब्ध असणारी सगळीच माहिती, डेटा (विदा) आपण  लक्षात ठेवू शकत नाही. प्रचंड माहितीच्या जाळ्यातून काही निवडकच गोष्टी आपलं लक्ष खिळवून ठेवू शकतात. ही निवडक माहिती, जी आपलं ध्यान आकर्षित करते ती गोष्टी/कथा, नाट्यमय स्वरुपाची  असते. कल्पना करा, की आपल्या मेंदूमध्ये आणि बाहेरच्या जगामध्ये एक प्रकारचा अदृश्य असा पडदा आहे. हा पडदा चाळणी सारखं काम करतो. हे एका अर्थी बरंच आहे; कारण त्यामुळेच आपण एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करु शकतो. या पडद्याला काही छिद्र आहेत जे वेगवेगळ्या स्वरुपाची, नाटकीय वाटणारी, आपल्याला आवडणारी माहितीच आपल्या मेंदूपर्यंत पोचवतात. आपसूकच बाकीची माहिती आपल्यापर्यंत पोचत नाही. कारण ती नाट्यमय स्वरुपाची नसते. तर आता कळाले ना, की आपण भूत-खेताच्या गोष्टी कान टवकारुन का ऐकतो!

2015 च्या नेपाळमधील भूकंपाची बित्तंबातमी 10 दिवस आपण टीव्हीवर पाहत होतो. 9000 लोक मारले गेले म्हणून जग हळहळत होतं. गरीब (लेवल-1) देशांमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे आर्थिक नुकसान आणि जीवितहानी प्रचंड आहे. तरीही, 1990 पासून पुढच्या काळात ही हानी कमी होण्यामध्ये बरीच प्रगती झाल्याचं दिसून येतं.

एकूणच, जगभरात नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी झाले आहे. आजच्या जगाचा विरोधाभास असा आहे की, जगात हिंसा कमी झालीय आणि जास्त सुरक्षितता आहे परंतु माध्यमांचं प्रसारण (broadcasting) ही तुलनेने जास्त सक्रिय असल्यामुळे वाईट गोष्टीच जास्त रंगवून सांगितल्या जातात.

मजेशीर गोष्ट अशी की, ज्यावेळी नेपाळातील 10 दिवसांचे चित्र टीव्हीवर पाहून आपण हादरुन गेलो होतो; त्याचं दिवसात जगभरात 9000 मुलं अतिसाराने मेली होती आणि त्याची साधी दखल सुद्धा माध्यमांनी घेतली नव्हती. कारण; भूकंप हा अतिसारापेक्षा जास्त भीतीदायक, नाट्यपूर्ण आहे आणि म्हणूनच भूकंपाच्या बातम्या आपल्याला जास्त खिळवून ठेवतात. 

  1. अनाठायी वाढीव भीती:

पुढची गोष्ट समजून घ्यायची आहे ती अशी की, माध्यमांना हे माहित आहे की आपलं लक्ष खिळवून ठेवणाऱ्या गोष्टी कुठल्या आहेत आणि अशा गोष्टीच आपल्यापर्यंत पोचल्या पाहिजेत. याची ते पुरेपूर काळजी घेतात. “वेधशाळेचा अंदाज अचूक ठरला असून शहरात आज मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला”, “मलेरियाचे प्रमाण ह्ळूहळू कमी होत आहे” पेपरमध्ये असं कधी आपण वाचलंय का? याउलट भूकंप, पूर, युद्ध, आग, दहशतवादी हल्ले, रोगराई या बातम्यांवर आपलं चटकन लक्ष जातं. हो ना? रोजच्या घडामोडींपेक्षा काहीतरी वेगळं घडतं जे बातम्यांमध्ये दाखवलं जातं. अशा असामान्य गोष्टीच पेपरातून आपण वाचत असतो आणि जर आपण पुरेशी जागरुकता बाळगली नाही तर आपल्याला या असामान्य  गोष्टीच रोजच्या घडामोडी वाटू शकतात, जे चुकीचं आहे!

उदा. दृकश्राव्य माध्यमांतून आपल्यापर्यंत येणाऱ्या बातम्या या एकापेक्षा अधिक प्रकारच्या भीतीला ट्रिगर करणाऱ्या असतात जसं की: अपहरण, विमान दुर्घटना. इथे बंदीची आणि शारीरिक इजेची भीती सक्रिय होते. परंतु प्रत्यक्षात या घटनांचे प्रमाण इतर जोखिमीच्या घटनांच्या तुलनेत फारच कमी असते. माणसाच्या घाबरट वृत्तीचा अतिशय उत्कृष्टपणे फायदा जर कुणी घेत असेल तर ते पत्रकार नसून दहशतवादी आहेत. त्यांना बरोबर कळून चुकलंय की आपण शारीरिक इजेला, अपहरणाला, विषबाधेला किंवा भेसळीला घाबरतो ते! म्हणूनच या सगळ्या गोष्टी हल्लेखोर शस्त्र म्हणून आपल्यावर वापरतात. दहशतवाद हा एकमेव अपवाद आहे जो वरचेवर वाईटरीत्या वाढतच चाललाय. असं असले तरी 2016 मध्ये जगभरातले फक्त 0.05% मृत्यू दहशतवादी हल्ल्यांमुळे झाले आहेत. 

भारतात दहशतवादामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या

वरील ग्राफ्स पाहून लक्षात येईल की, जगभरात दहशतवादाचे जे बळी गेले आहेत, ते आपल्या लोकसंख्येच्या 1% सुद्धा भरत नाहीत; परंतु सर्वात जास्त फुटेज मात्र याच घटनांना मिळते. दहशतवादाचा धसका घेऊन वेळोवेळी दुसऱ्या देशांवर सशस्त्र सैन्य हल्ले करणाऱ्या शंकेखोर अमेरिकेची बळींची संख्या तर 100-150 च्या घरात आहे. तुलनेने आशिया आणि आफ्रिका खंडात दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण जास्त आहे. 

भारताच्या बाबतीत पाहिलं तर दहशतवादाच्या बळींची संख्या 2010 नंतर खुपच कमी झाली आहे. माध्यमांतून मात्र असे चित्र उभे केले जाते की दहशतवाद हीच एकमेव मोठी समस्या आपल्यासमोर आहे. माध्यमांच्या prime time topics वर मध्यंतरी एक विश्लेषण प्रसिद्ध झालं. ज्यामध्ये सर्वात जास्त चर्चिला गेलेला विषय “पाकिस्तानी दहशतवाद” हा होता. अधिक माहितीसाठी इथे वाचा. 

याउलट, विविध आजार, दारुच्या सेवनामुळे होणारे मृत्यू मात्र खुपच जास्त आहेत, पण बातम्यांमध्ये आपल्याला दहशतवादाचे चित्र अधिक ठळक, भेसूर करुन दाखवले जाते. त्याचा राजकीय फायदा उठवला जातो. 11 सप्टेंबर 2001 च्या दहशतवादी हल्ल्यांनंतर Gallup च्या सर्वेत असं दिसून आलं की, 51% अमेरिकन जनतेला भीती होती की त्यांच्या कुटुंबातली व्यक्ती येत्या काळात दहशतवादी हल्ल्याची बळी ठरु शकते. 14 वर्षानंतरही आकडा तोच आहे: 51%! डोक्यात बसलेली भीती आपली पाठ सोडत नाही!

  1. जोखीम आणि भीती:

एखाद्या गोष्टीत आपल्याला किती जोखीम आहे हे आपण त्या गोष्टीला किती घाबरतो यावरुन ठरत नसून त्या गोष्टीपासून आपल्याला किती धोका आहे आणि त्या गोष्टीपासून आपण किती जवळ आहोत यावर ठरते. (Risk=Danger*Exposure) उदा. सापाला तुम्ही कितीही घाबरत असाल तरी जोवर  तुम्ही सापाजवळ जात नाही आणि तो साप विषारी नाही तोपर्यंत तुम्ही सेफ आहात.

  1. शांत व्हा, मगच निर्णय घ्या:

मे महिना. कडकडीत उन्हाळा. असह्य उन्हाच्या झळा. अंगाची लाही लाही होत असताना 16-16 तास चालणारी वीजकपात उरला सुरला जीव घेते. पाण्याचा प्रश्न तर आमच्या गावी पाचवीलाच पुजलेला. नदी, नाले, आड, विहिरी सगळं ठक्क कोरडं. आठवड्यातून एकदाच नळाला पिण्याचे पाणी यायचे, ते ही अर्धा तास. पाण्यासाठी लोक जीवावर उठायचे इतका प्रचंड तीव्रतेचा हा प्रश्न होता. पाण्याचा वार असला की शाळा, कॉलेज, दुकानं सगळं बाजूला ठेवून लोक पाणी भरायला घरात थांबायचे. एकदा असंच पाणी भरुन ठेवलं आणि अफवा उठली की पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीमध्ये बेपत्ता असणाऱ्या माणसाचं प्रेत सापडलंय. त्याने आत्महत्या केली होती. झालं! खरं-खोटं कळायच्या आत लोकांनी भरुन ठेवलेलं सगळं पाणी ओतून द्यायला सुरुवात केली.

अक्षरशः डोळ्यातून आसवांच्या धारा लागलेल्या कारण आता अजून आठवडाभर पाण्याशिवाय राहावं लागणार होतं. मनाला इतक्या यातना होत असताना सुद्धा दुषित पाणी प्यायला नको म्हणून लोक भराभर पाणी फेकून देत होते. अशा गोष्टी गावभर व्हायला वेळ लागत नाही. उभ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी लोकांना इतकं मुबलकपणे पाणी फेकून देताना पाहिलं होतं! तशातच दवंडी पिटली गेली की या अफवा आहेत, विश्वास ठेवू नका, पाणी अमूल्य आहे, असं वाया घालू नका पण ऐकतो कोण! शहानिशा केल्यावर कळालं, की खरोखरच ती अफवा होती. मग काय, नुसती हळहळ!

आपण घाबरलेले असतो तेव्हा जग जसं आहे तसं ते भासत नाही. भीतीदायक वातावरणात/ घाबरलेलं असताना कमीत कमी निर्णय घ्यावेत. 

टिकून राहण्यासाठी, जगण्याची शक्यता वाढण्यासाठी प्रत्येक युगात वेगवेगळ्या गोष्टींना मनुष्य घाबरत आलेला आहे, गोष्टी बदलल्या तरी भीती मात्र अजूनही खूप गरजेची गोष्ट आहे आणि तिचं कार्यही तेच आहे. भीती आपल्याला सावध करते, आपले रक्षण करते; म्हणून भीतीतून मुक्ती शोधू नका, भीतीचा फायदा कसा करुन घ्यायचा हे मात्र शिकायला हवं.

तळटीप:

‘द डार्क नाईट राईझेस’ या चित्रपटात बॅटमॅन एका खोल विहिरीतील तुरुंगातून कसा सुटतो याची गोष्ट आहे. सगळीकडून पराजित झालेल्या बॅटमॅनला ‘भीती’ कसा विजय मिळवून देते हे जरूर पहा, अर्थात हांस झिमरच्या प्रभावी संगीताने हा प्रसंग अंगावर काटे आणल्याशिवाय रहात नाही.

(फॅक्ट्फुलनेस या हांस रोज्लिंग यांच्या पुस्तकावर आधारित. Read here.)

टीप : लेखातील मतं लेखकाची वैयक्तिक आहेत.

संबंधित ब्लॉग:

BLOG: तथ्यप्रियता – भाग 1 : वाढती दरी

BLOG: तथ्यप्रियता – भाग 2 : गौरवशाली भूतकाळाचा भांडाफोड

BLOG: तथ्यप्रियता – भाग 3 : लोकसंख्येचा विस्फोट टाळायला गरीब लोक जगवावेत की नाही?

Fear instinct and factfulness

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.