BLOG: तथ्यप्रियता – भाग 5 : राईच्या पर्वताचे रहस्य
जागतिक हवामान बदलावर नियंत्रण कसे मिळवायचे, या चर्चेत युरोपियन महासंघाच्या उच्चस्तरीय मंत्र्याने येत्या काळातल्या हवामान बदलासाठी भारत,चीन आणि तत्सम उदयोन्मुख अर्थव्यवस्थांना दोषी ठरवून टाकले (Size instinct and factfulness).
2007 साली जागतिक आर्थिक मंचाचे संमेलन दावोसमध्ये भरले होते; त्यात एक भन्नाट गोष्ट घडली होती (Size instinct and factfulness). जागतिक हवामान बदलावर नियंत्रण कसे मिळवायचे, या चर्चेत युरोपियन महासंघाच्या उच्चस्तरीय मंत्र्याने येत्या काळातल्या हवामान बदलासाठी भारत,चीन आणि तत्सम उदयोन्मुख अर्थव्यवस्थांना दोषी ठरवून टाकले. त्यांचे म्हणणे असे होते की, जगभरात सगळ्यात जास्त कार्बन उत्सर्जन वरील देश करत आहेत. याही पुढे जाऊन ते असे बोलले की, आजघडीला चीन अमेरिकेइतकं तर भारत जर्मनीइतकं उत्सर्जन करत आहे. आंतरराष्ट्रीय गटातून विविध देशाचे प्रतिनिधी हे भाषण ऐकताना ‘आ’ वासून एकमेकांकडे पाहत होते. युरोपियन महासंघाच्या मंत्र्याचे आरोप खरे होते की बिनबुडाचे? या लेखाच्या शेवटी पाहू.
“जगभर 42 लाख लहान मुलं मरण पावली”.
2016 मध्ये UNICEF ने ही आकडेवारी जाहीर केली. 0 ते 1 वर्षांपर्यंतच्या मुलांचे जगभर झालेले मृत्यू नोंदवले गेले होते आणि त्यातून ही माहिती समोर आली. 42 लाख मृत बालके! बाप रे! केवढी भयंकर परिस्थिती आहे आपली! त्यातही युनिसेफने जाहीर केले की, जगात सर्वात जास्त बालमृत्यू भारतात झाले आहेत – सुमारे ६.४ लाख. गेल्या दोन दशकांत सर्वच देश बालमृत्यू रोखण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करत असताना, एवढी अवाढव्य संख्या जाहीर होणे खुपच निराशाजनक आहे. कुणाही व्यक्तीला असेच वाटेल. आपल्या कल्पनेपलीकडचं वाटतंय ना हे सगळं; पण थांबा! आपण काही विसरतोय का?
तुलनात्मक पद्धती
माध्यमांतून किंवा काही संस्थांच्या पोर्टलवरून नेहमीच अशा अवाढव्य, एकलकोंड्या आणि भावनांना हात घालणाऱ्या संख्या/आकडेवारी जाहीर होत असतात. यांना अवास्तव महत्व दिलेलं असतं. सुज्ञ नागरिक म्हणून त्या संख्येचा मागोवा घेणं आपलं काम आहे. कुठलाही एकटा आकडा कसलीही स्पष्टता न देता आपला गोंधळ वाढवण्याचंच काम करतो. त्यासाठी त्या आकड्याचा आगापिछा माहीत करून घेणं गरजेचं ठरतं; तरच ही माहिती आपल्या कामी येऊ शकते. उदा. वरच्या माहितीमध्ये 42 लाख हा आकडा पाहून मला भोवळच यायची बाकी होती. तरीही, मी जेव्हा मागच्या काही वर्षांची आकडेवारी तपासली तर तुलनेने हा आकडा खुपच आल्हाददायक वाटला (खरं तर, बालमृत्यूची कुठलीच आकडेवारी आल्हाददायक असू शकत नाही परंतु इथे आपण भावना बाजूला ठेवून फक्त आकड्यांबद्दल बोलू).
2015 मध्ये हाच आकडा 44 लाख एवढा होता. त्याआधीच्या वर्षी म्हणजेच 2014 मध्ये 45लाख! 1950 मध्ये हीच संख्या 1 करोड 44 लाख एवढी प्रचंड होती. या तुलनेत 42लाख हा आकडा खुपच कमी वाटतो आणि म्हणूनच “आल्हाददायक” असा उल्लेख करावासा वाटला. ज्या वेगाने हा आकडा लाखोंच्या पटीने खाली उतरतोय, हे नक्कीच आशाजनक आहे.
बालमृत्यूदर आलेख
हे आपल्याला मात्र बातम्यांमधून जाहीर होणाऱ्या अवाढव्य एकलकोंड्या आकड्यामुळे कळू शकत नाही. आकडेमोड केल्याशिवाय खरी परिस्थिती कळू शकत नाही आणि परिस्थिती हाताळण्यासाठी विश्वासार्ह आकडेवारी पाहिजेच, तरच त्यावर उपाययोजना आखता येतील. भारतातही त्या वर्षी जागतिक दराच्या तुलनेत जास्त दराने बालमृत्यू कमी झाले होते.
एका अभ्यासावरून असे लक्षात येते की, डॉक्टर्स आणि हॉस्पिटलच्या बेड्सची संख्या लेवल 1 आणि 2 वरील देशांतील मुलांना वाचवण्यासाठी खूपच नगण्य भूमिका निभावतात. बेड्स, हॉस्पिटल्स आणि डॉक्टर्स यांची संख्या मोजता येण्यासारखी आहे. राजकारणी लोकांना इमारतींचं उद्घाटन करण्यात जास्त रस असतो; कारण त्याची बातमी होते. इमारत सतत डोळ्यांसमोर राहते. परंतु, जवळपास सगळेच बालमृत्यू रोखण्यामागे हॉस्पिटलच्या बाहेर केलेल्या प्रतिबंधात्मक उपायांचा, आरोग्यदूतांचा आणि पालकांच्या शिक्षणाचा मोठा हात आहे; विशेषतः स्त्रियांचा! या उपाययोजना अदृश्य स्वरुपात काम करत असतात आणि याचा परिणाम जाणवायला बराच काळ जावा लागतो आणि म्हणूनच दिखाव्याची कामगिरी करणाऱ्या राजकीय नेत्यांना यात फार रस नसतो. एक सर्वेक्षण असं सिद्ध करतं, की आईला लिहिता-वाचता येत असल्यामुळे बऱ्याच प्रमाणात बालमृत्यू रोखायला मदत झाली आहे. आपल्या आजारी बाळाला काय औषध द्यायचं आहे, हे आईला कळू शकतं. औषधामध्ये काय घटक आहेत, हे ती तपासू शकते आणि अशा प्रकारे बाळाला योग्य ते उपचार मिळाल्यामुळे बाळ दगावण्याचे प्रमाण कमी झाले आहे. नर्सेस, दायी, सुईणीला यांच्या शिक्षणामुळे देखील ग्रामीण भागातील परिस्थिती सुधारताना दिसत आहे.
आपण गोष्टींना प्रमाणापेक्षा मोठ्या समजतो, आकार ओळखण्यात कशी गफलत करतो ते या भागात पाहू. याला “Size Instinct” असे म्हणतात.
संत तुकाराम महाराजांच्या अभंगातली एक ओळ खुपच सुंदर आहे, ज्यातून मानवी मनाचे तरल दर्शन घडते. “सुख पाहतां जवापाडें, दुःख पर्वताएवढें!” कुणाही माणसाला आयुष्याकडे पाहताना सुखापेक्षा दुःख जास्त प्रकर्षाने जाणवते आणि उठून दिसते. अगदी भरल्या गोकुळातला कृष्ण सुद्धा बऱ्याचदा नाखुश असायचा. तसेच हे! याचाच अर्थ असा, काही गोष्टी आपल्या मनामध्ये इतक्या ठाम बसल्या आहेत की आपण सत्य-असत्याची पडताळणी देखील करत नाही. अगदी जगातला श्रीमंत व्यक्ती सुद्धा या न त्या कारणाने असमाधानी असतोच. थोडक्यात, सर्व मानवजातीने हे गृहीत धरलंय, की सुखाचे प्रमाण नगण्य असून आयुष्य म्हणजे जणू विषादाने भरले आहे! हे सरसकट खरं नाहीय पण आपला दृष्टीकोन मात्र हेच खरं आहे, असं दर्शवतो.
हे फक्त इथेच लागू आहे असं नाही. जवळपास सगळ्याच गोष्टींना आपण हा सिद्धांत लावतो आणि प्रत्येक गोष्ट मोठ्या मापाने मोजतो. यालाच “राईचा पर्वत करणे” (out of proportion) असे म्हणतात.
पर्वतीय भागात एका 40 वर्षीय महिलेचा तिच्या नवऱ्याने डोक्यांत कुऱ्हाड घालून निघृण खून केला. तीन मुलांची आई क्षणार्धात मरण पावली. माध्यमांनी मात्र या गोष्टीची म्हणावी तेवढी दखल घेतली नाही. त्याच दिवशी 38 वर्षांचा 2 मुलांचा बाप पर्वतात फिरताना अस्वलाच्या हल्ल्याला बळी पडला. जवळपास सगळ्याच माध्यमांतून या गोष्टीला बरेच दिवस फुटेज दिलं गेलं. तसं पाहिलं तर, पहिली केस “घरगुती हिंसा” या प्रकारात मोडते आणि वारंवार घडत असते आणि अस्वलाने हल्ला करण्याची घटना मात्र क्वचितच घडते. घरगुती हिंसेने मरणाऱ्या बायकांच्या तुलनेत, अस्वलाच्या हल्ल्याने होणारी प्राणहानी अगदीच नगण्य आहे. माध्यमांतून मात्र नेमके उलटे चित्र दाखवले जाते. ज्या लोकांना खरोखरीच जीव वाचवायचे असतील तर त्यांनी अस्वलाच्या हल्ल्यांना अवास्तव महत्व न देता घरगुती हिंसेला आळा घालण्याचा प्रयत्न केला पाहिजे!
अशीच गफलत अजून एका ठिकाणी होते. कुठलाही नवीन विषाणूजन्य साथीचा आजार उद्भवला, की सरकार बजेटमधून मोठी रक्कम मदतनिधी म्हणून जाहीर करते. वास्तव मात्र फारच उदासीन आहे. दरवर्षी टीबी आणि स्वाईन फ्लूने होणारी जीवितहानी अनेक पटीने अधिक असूनही या रोगांसाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून दिला जात नाही. इथेही आपली चुकीचे मापन करण्याची वृत्ती प्रबळ असल्याचे दिसते. 2009 साली दोन आठवड्यांच्या कालावधीमध्ये 31 लोकांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. गुगलवर याविषयीचे 2 लाख 53 हजार 442 बातमी संदर्भ उपलब्ध होते; म्हणजेच हे प्रमाण दर मृत्यूमागे 8,176 संदर्भ असं होतं. त्याचं दोन आठवड्यांत 63,066 लोक टीबीमुळे मृत्यूमुखी पडले. बातम्यांमध्ये मात्र यावर दर मृत्यूमागे फक्त 0.1 बातमी संदर्भ उपलब्ध होते. स्वाईन फ्लूच्या प्रत्येक मरण पावलेल्या केसने टीबीच्या केसपेक्षा 82,000 पट जास्त लक्ष वेधून घेतलं होतं!
आपली तथ्यप्रियता जपण्यासाठी:
जेव्हा अवाढव्य आकडा आपल्या डोळ्यांसमोर नाचत असतो, त्यावेळी आपण काय करावे?
1) तुलना (Compare): मोठमोठे stand-alone आकडे स्पष्ट माहिती न देता गोंधळात टाकतात, संभ्रम वाढवतात. त्यासाठी तुलना करावी, त्या संख्येचा आग-पिच्छा माहित करून घ्यावा.
2) 80/20 नियम: जर तुमच्याकडे एक मोठी यादी असेल, तर त्यातले मोठ-मोठे घटक बाजूला काढा आणि त्यावर प्रथम कृती करा; अशाने महत्वाच्या बाबींवर तत्पर कृती होईल.
3) विभाजन (Divide): आकडा आणि दर या दोहोंमध्ये आपल्याला वेगळेच चित्र दिसेल. केवळ आकड्यापेक्षा “दर” जास्त अर्थपूर्ण आहे; विशेषतः दोन वेगवेगळ्या गटसंख्येची तुलना करताना! जेव्हा विभागीय किंवा राष्ट्रीय बाबींची तुलना होते, त्यावेळी “दरडोई” हे एकक प्रमाणबद्ध मानावे!
80/20 नियम
भारतात नवश्रीमंत लोकांच्या यादीत दरवर्षी भर पडत राहते. देशाची एकूण संपत्ती वाढत असताना, प्रत्येक व्यक्तीकडे समान संपत्ती नसल्यामुळे; आर्थिक विषमताही वाढतेय. देशभरातील 80% संपत्तीची मालकी केवळ 20% लोकांकडे आहे. अशीच परिस्थिती जवळपास सगळ्याच देशांची आहे. थोडक्यात काय तर, संपत्तीचा खूप मोठा वाटा मूठभरच लोकांकडे आहे! या असमानतेला/विषमतेला 80/20 नियम म्हणतात.
तुलना करण्यासाठी 80/20 नियम फारच उपयुक्त आहे. एखाद्या मोठ्या यादीत महत्वाचे घटक शोधण्यासाठी हा नियम वापरू शकतो. सरकारी आरोग्य सुविधांचा विचार करता, 80/20 चा नियम वापरून बजेट ठरवता येऊ शकते. जसं की, स्वाईन फ्लू पेक्षा टीबी, मलेरिया या रोगांच्या उपचारासाठी आणि प्रतिबंधासाठी जास्त निधी राखून ठेवला पाहिजे. तसेच, उपचारापेक्षा प्रतिबंधावर जास्त खर्च केला पाहिजे इ.
कुठल्याही कंपनीसाठी बजेट ही फार महत्वाची बाब असते. दरवर्षी बजेट ठरवताना, वेगवेगळ्या घटकांना प्राधान्य दिले जाते. ते ठरवताना देखील 80/20 चा नियम कामी येतो. वेगवेगळ्या विभागांकडून बजेटमध्ये हिस्सा ठरवण्यासाठी माहिती मागवण्यात येते. त्यातील थोडेसेच घटक असे असतात, ज्यांना जास्तीत जास्त हिस्सा दिला जातो.
कुठल्याही कामाच्या यादीमध्ये 20% भाग असा असतो, ज्याला 80% वेळ लागणार असतो. अशा कामांना प्राधान्य देऊन आपण प्रभावीपणे आपला वेळ वाचवू शकतो.
विभाजन पद्धती
नुकताच कोरोना विषाणूने मांडलेले उच्छाद रोज आकडेवारीतून आपल्या समोर येतोय. ज्या घडीला मी हे लिहितेय, त्या घडीचा चीनमधील बाधितांचा आकडा आहे : 89,240 केसेस आणि 3058 मृत्यू! आता ही माहिती कशी समजून घ्यावी? आजमितीला चीनची अधिकृत माहितीनुसार लोकसंख्या आहे: 140.85 कोटी! त्यात विषाणूची लागण झालेल्या लोकांचा दर पाहिला तर तो अगदी नगण्य येतो: 0.0000633 म्हणजेच 0.00633% (दर= बाधित लोकसंख्या/एकूण लोकसंख्या).
बाधित केसेसचा मृत्युदर पाहिला तर तो ही अगदी नगण्य येतो: 0.0343 म्हणजेच 3.43% (दर = मृत पावलेले बाधित लोक/एकूण बाधित लोक).
हा दर प्रत्येक देशासाठी, त्या-त्या देशाच्या लोकसंख्येनुसार बदलत जाईल. अशाप्रकारे जेव्हा आपण दर काढतो, त्यावेळी आपल्याला एकूणच चित्र स्पष्ट होते.
विकासाचा मापदंड म्हणून शालेय शिक्षणाला आपल्या देशाने प्राधान्य दिलंय. प्राथमिक शिक्षणाचा लाभ सर्वांना मिळावा म्हणून बऱ्याच योजना सरकार राबवत असते. अशा परिस्थितीत राबवण्यात येणाऱ्या योजनांना मिळणारा प्रतिसाद मोजताना बऱ्याचदा फसवी माहिती आपल्यापर्यंत येते. जसे की, अमुक तालुक्यातील सरकारी शाळांमध्ये चालू शैक्षणिक वर्षांत मागील वर्षीपेक्षा 40 टक्क्यांनी पटसंख्येत वाढ झाली आहे. वरकरणी ही माहिती प्रभावी वाटत असली तरी सुज्ञ माणसाने जरा खोलात जावे. 40% पटसंख्या वाढणे ही कौतुकाची बाब असली तरी सत्य मात्र वेगळे असू शकते. त्या तालुक्यातील शालेय शिक्षणास पात्र एकूण विद्यार्थी संख्या 5 लाख असेल आणि एकूण पटसंख्या 2 लाख 75 हजार असेल तर 55% विद्यार्थी शाळेत येत आहेत. शाळाबाह्य विद्यार्थी 45% आहेत आणि ही गोष्ट बिलकुलच कौतुकास्पद नाही! हे चित्र आपण जोपर्यंत “दर” काढत नाही, तोपर्यंत स्पष्ट दिसत नाही!
एक संकेत चित्र
सर्वात पहिल्या उताऱ्यात युरोपियन संघाच्या मंत्र्याने केलेले वक्तव्य खरोखरच बिनबुडाचे आणि साफ चुकीचे होते. हे कदाचित इथवर वाचताना आपल्याला उमगले असावे. दावोसला भारताकडूनचे प्रतिनिधी म्हणून गेलेले “मोन्टेकसिंग अहलुवालिया” यांनी या मंत्र्याच्या आरोपांना नम्रतेने उत्तर दिले, ते असे होते: “आजवर फक्त आणि फक्त अति-श्रीमंत देशांनी, शतकानुशतके केलेल्या कार्बन उत्सर्जनामुळे आपल्यावर हे हवामान बदलाचे अस्मानी संकट कोसळले आहे. परंतु, आम्ही तुम्हाला माफ करतो; कारण तुम्हाला त्यावेळी हे माहीतच नव्हते की तुम्ही कुठल्या संकटांना आमंत्रण दिले होते. आपण जे करतोय त्याने भयंकर हानी होणार आहे याची एखाद्याला काहीच कल्पना नसताना; त्याला त्याचा दोष देऊन कसं चालेल?” यानंतर ते जे काही बोलले त्यामुळे सर्वच विकसनशील देशांचा जीव भांड्यात पडला असावा! ते म्हणाले, “यापुढे आपण कार्बन उत्सर्जन “दरडोई” या एककात मोजू.” खालील ग्राफ्स पाहून तुम्हाला युरोपियन मंत्र्याच्या आरोतला फोलपणा जाणवेल. आजही जगभरात सर्वात जास्त कार्बन उत्सर्जन अमेरिका, इंग्लंड, जर्मनी हेच देश करत आहेत!
- इंग्लंड, अमेरिका, भारत, चीन, जर्मनी आणि नायजेरीयामधील एकूण कार्बन उत्सर्जन (1000 टन)
2. इंग्लंड, अमेरिका, भारत, चीन, जर्मनी आणि नायजेरीयामधील प्रति व्यक्ती कार्बन उत्सर्जन (टनमध्ये)
टीप : लेखातील मतं लेखकाची वैयक्तिक आहेत.
संबंधित ब्लॉग:
BLOG: तथ्यप्रियता – भाग 1 : वाढती दरी
BLOG: तथ्यप्रियता – भाग 2 : गौरवशाली भूतकाळाचा भांडाफोड
BLOG: तथ्यप्रियता – भाग 3 : लोकसंख्येचा विस्फोट टाळायला गरीब लोक जगवावेत की नाही?