लाडका भाऊ नव्हे, लाडके युवा, केंद्र सरकार देणार रोख 15 हजार, नेमकी घोषणा काय?
देशातील तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जे तरुण आपल्या आयुष्यात पहिल्यांदा नोकरी करणार आहेत, त्यांना आता सरकारकडून तब्बल 15 हजारांची आर्थिक मदत मिळणार आहे. केंद्र सरकार ही रक्कम तरुणांच्या खात्यात जमा करणार आहे. पण ही रक्कम नेमकी कशी जमा करणार? याबाबतची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टप्प्यातील एनडीए सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज सादर केला. या अर्थसंकल्पात तरुणांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. विशेष म्हणजे देशात जे तरुण पहिल्यांदाच नोकरी करणार आहेत, ज्या तरुणांची आयुष्यात पहिली नोकरी सुरु होणार असेल अशा तरुणांना केंद्र सरकारकडून 15 हजारांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. पण त्यासाठी संबंधित लाभार्थी तरुणाचा पगार हा 1 लाख रुपयांपेक्षा कमी असणे अपेक्षित आहे. ज्या तरुणांच्या पहिल्या नोकरीचा पगार हा 1 लाखापेक्षा कमी असेल अशा तरुणांना केंद्र सरकार 15 हजार रुपयांची मदत करणार आहे.
केंद्र सरकार EPFO मध्ये पहिल्यांदा नाव नोंदणी करणाऱ्या तरुणांना 15 हजार रुपयांची आर्थिक मदत करणार आहे. ही मदत तीन टप्प्यांत केली जाणार आहे. हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून दिले जाणार आहे. केंद्र सरकारच्या या योजनेचा फायदा देशातील 2.1 लाख तरुणांना होणार आहे. त्यामुळे तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे.
निर्मला सीतारमन नेमकं काय म्हणाल्या?
“सरकारच्या 9 प्राथमिक गोष्टींमध्ये रोजगार आणि कौशल्य विकाल हे देखील एक आहे. सरकार पहिल्यांदाज बजेटच्या माध्यमातून नोकरी करणाऱ्यांना मोठी मदत करणार आहे. संघटीत क्षेत्रात पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या तरुणांना 15 रुपये मदत म्हणून दिले जातील. हे पैसे EPFO मध्ये रजिस्टर्ड तरुणांना मिळतील”, अशी माहिती निर्मला सीतारमन यांनी दिली.
देशातील 1 कोटी तरुणांना इंटर्नशिप मिळणार
केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमन यांनी इंटर्नशिपबाबत देखील मोठी घोषणा केली. सरकार 500 कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना इंटर्नशिप देण्यासाठी एक योजना सुरु करणार आहे. या योजनेतून तरुणांना प्रत्येक महिन्याला 5000 रुपये इंटर्नशिप भत्ता दिला जाईल. तसेच 6000 रुपये इतर मदत म्हणून दिले जातील, असं निर्मला सीतारमन यांनी सांगितलं.
मुद्रा लोनची किंमत आता 20 लाखांपर्यंत
तरुणांसाठी मुद्रा लोनची किंमत 10 लाखांवरुन आता 20 लाख करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये मुद्रा योजना सुरु केली होती. तरुणांच्या स्वयंरोजगाराच्या उद्देशाने केंद्र सरकारने ही योजना सुरु केली होती. ज्या तरुणांकडे आपला व्यवसाय सुरु करण्यासाठी पैसे नाहीत अशा तरुणांना ही मुद्रा लोन दिली जात होती. याचे तीन प्रकार होते. शिशू लोन, किशोर लोन आणि तरुण लोन. आधी या योजनेतून 10 लाखांचं कर्ज दिलं जायचं. आता हीच रक्कम 20 लाख रुपये इतकी करण्यात आली आहे.