Budget 2023 | ना सिनेमा तिकिटांचे दर घटले, ना OTT स्वस्त; बजेटमध्ये फिल्म इंडस्ट्रीकडे साफ दुर्लक्ष
थिएटरमधील चित्रपटांच्या तिकिटांचे दर आणि ओटीटी सबस्क्रिप्शनच्या दरात काहीतरी सूट मिळेल, अशी अपेक्षा अनेकांना होती. मात्र अर्थसंकल्पात असा कुठलाही उल्लेख नव्हता. त्यावरून आता दिग्गज निर्माते आणि दिग्दर्शक अशोक पंडित यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई: आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी हा बजेट सादर केला. दरवर्षी बजेटमधून काहीतरी सवलत मिळेल, अशी अपेक्षा प्रत्येक क्षेत्रातील नागरिकांना असते. एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीलाही अशाच काही अपेक्षा होत्या. थिएटरमधील चित्रपटांच्या तिकिटांचे दर आणि ओटीटी सबस्क्रिप्शनच्या दरात काहीतरी सूट मिळेल, अशी अपेक्षा अनेकांना होती. मात्र अर्थसंकल्पात असा कुठलाही उल्लेख नव्हता. त्यावरून आता दिग्गज निर्माते आणि दिग्दर्शक अशोक पंडित यांनी नाराजी व्यक्त केली आहे. फिल्म इंडस्ट्रीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
फिल्म इंडस्ट्रीकडून भरला जातो सर्वाधिक कर
“आमची इंडस्ट्री ही या देशातील सर्वाधिक करदाता आहे. फिल्म इंडस्ट्री दरवर्षी सर्वाधिक कर भरते. मात्र हे अत्यंत दुर्दैवी आहे की दरवर्षी याच क्षेत्राला सोयीस्कररित्या दुर्लक्ष केलं जातं. बजेटमध्ये ज्याप्रकारे इतर इंडस्ट्रीबद्दल बोललं गेलं, मग ते कपड्याविषयी असो किंवा मग इतर कोणतंही.. आमच्या इंडस्ट्रीबद्दल काहीच बोललं गेलं नाही”, अशा शब्दांत अशोक पंडित यांनी नाराजी व्यक्त केली.
फिल्म इंडस्ट्रीला केलं दुर्लक्ष
याविषयी बोलताना ते पुढे म्हणाले, “ज्याप्रकारे दुसऱ्या उद्योगांविषयी चर्चा केली जाते आणि त्यांच्या फायद्याविषयी विचार केला जातो. त्याचप्रमाणे आमच्या इंडस्ट्रीबद्दल कोणी विचार करत नाही. या इंडस्ट्रीला कसं वाचवलं जाईल, त्याला पुढे कसं नेलं जाईल याविषयी विचार केला जात नाही. आम्ही या देशातील सर्वाधिक करदाते आहोत. कोविड महामारीदरम्यानसुद्धा आम्ही घरात बसलेल्या लोकांचं मनोरंजन केलं.”
सिंगल स्क्रीन थिएटर्स आणि मल्टीप्लेक्सच्या तिकिटांच्या दरात बराच फरक आहे. त्याचप्रमाणे ओटीटी प्लॅटफॉर्मच्या सबस्क्रिप्शनचाही दर अधिक असतो. या दरांमध्ये काही सवलत मिळाली तर अधिकाधिक लोक त्याकडे वळतील अशी अपेक्षा होती. मात्र बजेटमध्ये याविषयी कुठलाच उल्लेख न झाल्याने फिल्म इंडस्ट्रीकडून नाराजी व्यक्त होत आहे.