ULIP चा कर सवलतीचा टेकू काढला, वार्षिक गुंतवणूक 2.5 लाखांच्यावर असेल तर मिळणार नाही फायदा
ULIP चा कर सवलतीचा टेकू अखेर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या निर्देशानंतर काढण्यात आला. आता युलिप योजनेत 2.5 लाखांच्यावर वार्षिक गुंतवणूक केल्यास कर सवलतीचा फायदा मिळणार नाही. नवीन नियमांमुळे गुंतवणूक, विमा आणि कर सवलतींचा तिहेरी फायदा घेणा-यांची निराशा होणार आहे.
ULIP चा कर सवलतीचा टेकू अखेर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या ( CBDT-Central Board of Direct Taxes ) निर्देशानंतर काढण्यात आला. आता युलिप योजनेत ( ULIP) 2.5 लाखांच्यावर वार्षिक गुंतवणूक केल्यास कर सवलतीचा फायदा मिळणार नाही. नवीन नियमांमुळे गुंतवणूक, विमा आणि कर सवलतींचा तिहेरी फायदा घेणाऱ्यांची निराशा होणार आहे. आता युलिपमधील भांडवली नफा मोजण्याचे नियम स्पष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे यापुढे युलिप योजनेत करमुक्त उत्पन्नावर पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे. अर्थात 2.5 लाखांपेक्षा तुमची कमाई कमी असेल तर याविषयीचा तोटा होणार नाही. मात्र जुन्या आणि नवीन युलिप पॉलिसी मिळून तुमची वार्षिक कमाई 2.5 लाख रुपये असेल तर मात्र गुंतवणुकदाराला कर सवलतीला मुकावे लागेल.
अर्थसंकल्प 2021 मध्ये सरकारने यूलिपवर कराबाबत प्रस्ताव आला. पण प्रस्तावात अनेक गोष्टींमध्ये स्पष्टता नव्हती. आता सीबीडीटीने यूलिपवरील कर नियम स्पष्ट करणारी अधिसुचना जारी केली आहे. त्यात यूलिपवरील कर नियम स्पष्ट केले आहेत. गुंतवणूकदारांना युलिप बद्दल वेगळे आकर्षण आहे. कारण यामुळे गुंतवणूकदाराला विमा आणि गुंतवणूक या दोन्हींचा फायदा होतो. कर वाचवण्यासाठी मोठ्या संख्येने लोक युलिपमध्ये गुंतवणूक ही करतात.जर तुम्ही करमुक्त कमाईसाठी यूलिप खरेदी करण्याचा विचार करत असाल तर नवीन नियमांचा विचार करणे आवश्यक आहे. आयकर विभागाने कर गणनेविषयी नवीन नियम जाहीर केले आहेत.
युलिप म्हणजे काय
युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन म्हणजेच यूलिप हे एक आयुर्विमा पॉलिसी आहे . ज्यात ग्राहकांना विमा तसेच गुंतवणूक पर्याय मिळतो. युलिपमध्ये ग्राहकांनी गुंतवलेले पैसे शेअर बाजार, रोखे आणि तत्सम मालमत्तांमध्ये गुंतवले जातात तर यातील एक भाग विमा क्षेत्रात गुंतविला जातो. त्यामुळ व्यक्तीला जीवनसंरक्षण मिळते. यूलिपमध्ये गुंतवणूक करण्याबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. कधी कधी काही लोक विचार न करता गुंतवणूक करतात आणि नंतर परतावा आणि विमा यांचे गणित कळाल्यानंतर अस्वस्थ होतात. अनेक युलिप योजनांमध्ये लोकांना परतावा जास्त मिळाला नाही आणि त्यांनी केवळ विमा संरक्षणावर खर्च केला असा त्यांना अर्थबोध झाला. युलिप योजनांची योग्य माहिती न झाल्याने ही समस्या उद्भवली. तसेच अभ्यास आणि तज्ज्ञांचा सल्ला न ऐकल्याने अनेकांना विमा संरक्षण आणि कर सवलतीवर समाधान मानावे लागले. युलिपमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी प्रत्येकाने त्याचे फायदे-तोटे तसेच त्याच्याशी संबंधित जोखीम काळजी घेतली पाहिजे.
काय आहे नवीन नियम
2021 च्या अर्थसंकल्पात असा प्रस्ताव होता की, युलिपमधील वार्षिक गुंतवणूक 2.5 रुपयांपेक्षा जास्त असेल तर परताव्यावर करात सूट मिळणार नाही. ही गुंतवणूक मर्यादा 1 फेब्रुवारी 2021 रोजी किंवा त्यानंतर खरेदी केलेल्या धोरणांना लागू आहे. आधीच्या यूलिपवरील परतावा करमुक्त आहे. असा त्याचा अर्थ काढण्यात येत होता. त्यानंतर या नियमांत आता स्पष्टता आणण्यात आली आहे
आता नवीन नियमांनुसार करसवलतीसाठी जुन्या आणि नवीन या दोन्हींचा एकत्रित विचार करण्यात येणार आहे. जुन्या आणि नवीन युलिप योजनांची एकत्रित वार्षिक रक्कम 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर गुंतवणुकदारांना कर सवलतीवर पाणी सोडावे लागेल. वार्षिक प्रीमियम अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर त्यावरील गुंतवणुकीवर सवलत उपलब्ध होणार नाही.