Defaulters list : कुठे गेले देशातील पैसे? ‘या’ लोकांनी 5 वर्षांत गिळले 10 लाख कोटी रुपये!
गेल्या 5 वर्षांमध्ये अनेक व्यावसायिकांनी देशाची लाखो कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. या व्यावसायिकांनी आपल्या कंपन्यांच्या नावे बँकामधून कोट्यावधी रुपयांचे कर्ज घेतले आहे. तर ते गायब देखील झाले.
मुंबई : गेल्या 5 वर्षांमध्ये अनेक व्यावसायिकांनी देशाची लाखो कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. या व्यावसायिकांनी आपल्या कंपन्यांच्या नावे बँकामधून कोट्यावधी रुपयांचे कर्ज (bank loan)घेतले आणि ते गायब झाले. अर्थ मंत्रालयाने राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार, देशातील अनेक बँकांनी सुमारे 10 लाख कोटी (10 lakh crore) रुपयांची कर्ज बुडीत खात्यात टाकली आहेत. बुडीत खाते म्हणजे, कर्ज म्हणून दिलेली रक्कम परत मिळण्याची जराही शक्यता नाही. या लोकांनी घेतलेलं कर्ज राईट ऑफ (Write off) करण्यात आले आहे. राईट ऑफ म्हणजे थकीत कर्जाच्या यादीतून तेवढी रक्कम वगळण्यात येते. याचा अर्थ ती, कर्ज घेणाऱ्या व्यक्तीकडून वसूल करण्यात येणार नाही असा होत नाही. मात्र थकीत कर्जाच्या यादीतून त्या रकमेचा उल्लेख वगळण्यात येतो.
काही व्यावसायिकांनी देशातील लाखो-करोडो रुपये वर्षानुवर्षे कसे गिळले हे जाणून घेऊया..
बुडीत खात्यात गेले कोट्यावधी रुपये –
गेल्या 5 वर्षांमध्ये राइट ऑफ (Write off)करण्यात आलेल्या एकूण कर्जाचा आकडा आहे, 9,91,640 कोटी रुपये. 2017-18 साली 1,61,328 कोटी रुपयांचे कर्ज राईट ऑफ करण्यात आले होते. तर 2018-2019 मध्ये हा आकडा 2,36,265 कोटी रुपये इतका होता. 2019-2020 साली 2,34,170 कोटी रुपये तर 2020-2021 साली 2,02,781 कोटी रुपयांचे कर्ज राईट ऑफ केले होते. 2021-2022 साली हा आकडा 1,57,096 कोटी रुपये इतका आहे.
देशातील टॉप 5 डिफॉल्टर्स कोण आहेत. ते जाणून घ्या…
डिफॉल्टर्सचे नाव कर्जाची रक्कम
- गीतांजली जेम्स लिमिटेड 7,110 कोटी रुपयांचे कर्ज
- एरा इन्फ्रा इंजीनिअरिंग 5,879 कोटी रुपयांचे कर्ज
- कॉनकास्ट स्टील अँड पॉवर लिमिटेड 4,107 कोटी रुपयांचे कर्ज
- आरईआय (REI)ॲग्रो लिमिटेड 3,984 कोटी रुपयांचे कर्ज
- एबीजी शिपयार्ड लिमिटेड 3,708 कोटी रुपयांचे कर्ज
हे डिफॉल्टर्सही टॉप 10 यादीत आहेत :
- डिफॉल्टर्सचे नाव कर्जाची रक्कम
- फ्रॉस्ट इंटरनॅशनल 3,108 कोटी रुपयांचे कर्ज
- विनसम डायमंड ॲंड ज्वेलरी 2,671 कोटी रुपयांचे कर्ज
- रोटोमॅक ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड 2,481 कोटी रुपयांचे कर्ज
- कोस्टल प्रोडेक्ट्स लिमिटेड 2,311 कोटी रुपयांचे कर्ज
- कुडोस केमी 2,082 कोटी रुपयांचे कर्ज
जाणूनबुजून भरत नाहीत कर्जाची रक्कम –
काही व्यावसायिक मुद्दामून कर्जाची रक्कम भरत नाही. गेल्या काही वर्षांतील डिफॉल्टर्सची संख्या आकडेवारीद्वारे जाणून घेऊया. 2018-2019 साली 2207, तर 2019-2020 साली 2469 लोकांनी कर्ज चुकवले. 2020-2021 साली हा आकडा 2840 इतका होता, 2021-2022 मध्ये तब्बल 2700 डिफॉल्टर्स आहेत.