मुंबई विमानतळानंतर आता महाराष्ट्रातील व्यापारी मार्गावरही अदानी समूहाचा ताबा
Adani Group | आता महाराष्ट्रातून बाहेर जाणाऱ्या किं वा महाराष्ट्रात येणाऱ्या व्यापारी वाहतुकीवरील ‘सेवा शुल्क’ वसुलीचे अधिकार अदानी समूहाला मिळाले आहेत. अदानी समूहाने या कंपनीतील 49 टक्के वाटा विकत घेतला आहे. यासाठी 1680 कोटी रुपये मोजण्यात आले.
मुंबई: मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळापाठोपाठ आता राज्यातील व्यापारी मार्गावरही अदानी समूहाच्या ताब्यात गेला आहे. महाराष्ट्राच्या सहा राज्यांशी लागून असलेल्या सीमेवरील तपासणी नाक्यांच्या प्रकल्पांचा कारभार आता अदानी समूहकाडे असेल. या 24 तपासणी नाक्यांची उभारणी करून व्यापारी मालवाहतुकीवरील सेवा शुल्क संकलनाचे अधिकार ‘सद्भाव इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट लिमिटेड’कडे होता.
मात्र, अदानी समूहाने या कंपनीतील 49 टक्के वाटा विकत घेतला आहे. यासाठी 1680 कोटी रुपये मोजण्यात आले. त्यामुळे आता महाराष्ट्रातून बाहेर जाणाऱ्या किं वा महाराष्ट्रात येणाऱ्या व्यापारी वाहतुकीवरील ‘सेवा शुल्क’ वसुलीचे अधिकार अदानी समूहाला मिळाले आहेत.
काही दिवसांपूर्वीच अदानी समूहाने मुंबई विमानतळाचा कारभार हातात घेतला होता. मुंबई विमानतळ व्यवस्थापनामध्ये अदानी समूहाचा 74 टक्के हिस्सा असेल. जीव्हीके समूहाकडे असलेला 50.5 टक्के हिस्सा या समूहाने यापूर्वीच संपूर्णपणे मिळविला असून, आणखी 23.5 टक्के हिस्सा हा एअरपोर्ट कंपनी साऊथ आफ्रिका (एसीएसए) आणि बिडवेस्ट समूह या अन्य अल्पसंख्य भागीदारांकडून खरेदी केला जाईल, अशी माहिती अदानी समूहाकडून देण्यात आली होती.
देशातील प्रमुख विमानतळे अदानी समूहाच्या ताब्यात जाणार?
आता देशातील चार प्रमुख विमानतळांचा कारभार अदानी समूहाच्या हातात गेला आहे. यापूर्वी लखनऊ, मंगळुरू आणि अहमदाबाद विमानतळाचे नियंत्रण अदानी समूहाच्या हातात आले होते. त्यानंतर आता मुंबई हे अदानी समूहाच्या अखत्यारित असलेले चौथे विमानतळ आहे. यानंतर जयपूर, गुवाहाटी, तिरुवनंतपुरम ही विमानतळेही अदानी समूहाच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे.
ही सर्व विमानतळे पुढील 50 वर्षे अदानी समूहाच्या ताब्यात असतील. या काळात या विमानतळांचा विकास, प्रशासकीय कामकाज आणि देखभाल अदानी समूहाकडून करण्यात येईल. अदानी समूहाकडून देशातील अधिकाअधिक विमानतळांचा कारभार हाती घेण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवण्यात आले आहे.
संबंधित बातम्या:
देशातले सर्व विमानतळं अदानी समूहाकडे? केंद्र सरकारनं काय दिलं उत्तर? वाचा,
‘महाराजा’साठी कोण बोली लावणार? हिंदूजा, टाटा की अदानी?
मुंबई विमानतळ अखेर अदानी समूहाच्या ताब्यात, देशातील 4 विमानतळांवर नियंत्रण