Donald Trump Tariff : ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेमुळे भारतीय शेअर बाजारात भूकंप, इतक्या लाख कोटीच नुकसान
Donald Trump Tariff : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेने जगातील अनेक देशांना धक्का दिला आहे. भारतीय शेअर बाजारात जणू भूकंपच झाला आहे. काही मिनिटात लाखो कोटी रुपये बुडाले आहेत. अमेरिकेने भारतावर 26 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील अनेक देशांवर टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. भारतावर 26 टक्के टॅरिफ लावण्यात आला आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे भारतीय शेअर बाजारात मोठी वाताहत झाली आहे. बाजार उघडताच सेन्सेक्स 450 अंकांनी खाली घसरला. दुसऱ्याबाजूला निफ्टी 180 पेक्षा जास्त अंकांनी कोसळला. एमकेच्या रिपोर्टमध्ये म्हटलेलं की, 25 टक्के टॅरिफ लावला तर भारताला 31 बिलियन डॉलरपर्यंत नुकसान होईल. अमेरिकेने 26 टक्के टॅरिफची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे आयटी, बँकिंगच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. टीसीएस आणि इन्फोसिसच्या शेअर्समध्ये 2 टक्क्यापेक्षा जास्त घसरण झाली. जाणकराच्या मते, या टॅरिफचा शेअर बाजारावर जास्त दिवस आणि दूरगामी परिणाम दिसणार नाही.
मुंबई स्टॉक एक्सचेंजचा प्रमूख सूचकांक सेन्सेक्स सकाळी 9 वाजून 35 मिनटांनी 400 पेक्षा जास्त अंकांनी कोसळला. त्यावेळी 76,213.99 अंकांवर व्यवहार सुरु होता. आज सेंसेक्स 75,811.86 अंकांवर ओपन झालेला. एकदिवस आधी सेंसेक्समध्ये 593 अंकांची तेजी दिसून आलेली. दुसऱ्याबाजूला नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा प्रमुख सूचकांक निफ्टीचा 9 वाजून 35 मिनिटांनी 65 अंकांच्या तेजीसह 23,267.80 अंकांवर व्यवहार सुरु होता.
कुठल्या शेअर्समध्ये घसरण?
ट्रम्प यांच्या घोषणेनंतर आज शेअर बाजारात बँकिंग आणि आयटी सेक्टरच्या शेअर्समध्ये घसरण पहायला मिळाली आहे. देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी TCS च्या शेअरमध्ये 2.40 टक्के घसरण दिसली. इन्फोसिसच्या शेअरमध्ये 2.28 टक्के घसरण पहायला मिळाली. एचसीएल टेक आणि टेक महिंद्राचे शेअर्स 2 टक्क्यापेक्षा जास्त घसरणीसह व्यवहार करत आहेत. दुसऱ्याबाजूला टाटा मोटर्स आणि अदानी पोर्टच्या शेअरमध्ये एक टक्का घसरण पहायला मिळाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये एक टक्का घसरण दिसून आली आहे.
किती लाख कोटीच नुकसान?
शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांच मोठ नुकसान झालय. एकदिवस आधी शेअर बाजार बंद झाला, तेव्हा मार्केट कॅप 4,12,98,095.60 कोटी रुपये होतं. गुरुवारी बाजार उघडताच हे मार्केट कॅप 4,09,71,009.57 कोटी रुपये झालं. म्हणजे बीएसई मार्केट कॅपमध्ये एका मिनिटात 3,27,086.03 कोटी रुपयांची घट झाली. शेअर बाजारात 21 कोटी पेक्षा जास्त गुंतवणूकदारांच सकाळी 3.27 लाख कोटी रुपयांच नुकसान झालं.