लाखो विक्रेते, अब्जावधींचा व्यवसाय.. Amazon Great Indian Festival ची आतली गोष्ट..
घरातल्या गरजेच्या वस्तू, कॉस्मेटिक्स, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स.. छोट्या पिनपासून ते मोठ्यातल्या मोठ्या वस्तूपर्यंत कोणतीही गोष्ट तुम्ही सध्या ऑनलाइन ऑर्डर करू शकतात. मात्र ही सेवा तुमच्या घरापर्यंत कशी पोहोचवली जाते, त्यामागे किती लोक काम करतात, हे सर्व या लेखातून जाणून घेऊयात..
गणेशोत्सव, दिवाळी, होळी.. असे मोठमोठे सण-उत्सव म्हटलं की पूर्वी आई-बाबांसोबत बाजारात जाऊन सणासुणीच्या सामानाची खरेदी केली जायची. आता मोबाइल आणि डिजिटलच्या जमान्यात एका क्लिकवर तुम्ही घरातील छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी वस्तू ऑर्डर करू शकतो. ती वस्तू तुम्ही निवडलेल्या तारखेनुसार घराच्या दारापर्यंत पोहोचवली जाते. एखादी वस्तू खरेदी करणं हल्ली इतकं सोपं झालंय. मात्र ॲपमध्ये एखादी वस्तू ऑर्डर करण्यापासून ते घरापर्यंत ती डिलिव्हर होण्यापर्यंत एक मोठं ई-कॉमर्स काम करतंय. यामागे किती लोक कसे काम करतायत, किती पैशांची उलाढाल होतेय, छोट्या-मोठ्या विक्रेत्यांची यात काय भूमिका आहे, ते आपण या लेखात समजून घेऊयात.
‘ॲमेझॉन डॉट इन’ हा सध्या देशातील सर्वांत मोठा ई-कॉमर्स व्यवसाय आहे. देशभरातील लाखो ग्राहक ‘ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ची आतुरतेने वाट पाहत असतात. या ॲमेझॉनची प्रत्यक्षात सुरुवात 5 जून 2013 रोजी झाली. देशात सर्वाधिक प्रॉडक्ट सर्च हे ॲमेझॉनवरच होतं. बेंगळुरूमध्ये ॲमेझॉनचा मोठा FC सेंटर (फुलफिलमेंट सेंटर) आहे. लाखो चौरस फुटांमध्ये हा एफसी सेंटर पसरलेला आहे. यासारखेच देशभरात त्यांचे 42 एफसी सेंटर्स आहेत. गावोगावी जाऊन सामान विकण्यापासून सुरुवात करणारे मनिष तिवारी हे ॲमेझॉन इंडिया कंस्युमर बिझनेसचे कंट्री मॅनेजर आहेत. त्यांनी ॲमेझॉनचा संपूर्ण व्यवसाय कसा चालतो, हे सविस्तरपणे सांगितलं आहे.
ॲमेझॉनची दहा वर्षे
“या देशात आमची दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. पण आजसुद्धा आम्हाला प्रत्येक दिवाळी ही पहिल्या दिवाळीसारखीच वाटते. एखाद्या परीक्षेला जाताना तुम्ही कितीही तयारी केली तरी थोडी धाकधूक असतेच. तशीच भावना आमच्या मनात ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हलच्या वेळी असते. ही भावना केवळ आमच्याच मनात नाही. तर संपूर्ण देशातील आमच्या एक लाखांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या, कोट्यवधी प्राइम मेंबर्सच्या मनात असते. त्यांनाही या ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हलची प्रचंड उत्सुकता असते. फेस्टिव्हलच्या एका महिन्याच्या कालावधीत चार ते पाच महिन्यांपेक्षाही जास्त सामानाची विक्री होते. आमचे 14 लाखांपेक्षा जास्त सेलर्स (जे माल विकतात) आणि कोट्यवधी प्राइम मेंबर्स या फेस्टिव्हलची आतुरतेने वाट पाहत असतात,” असं तिवारी म्हणाले.
ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हलमागची मेहनत
रात्री 12 वाजता ही सेल सुरू होते. तेव्हा पहिले 24 तास प्राइम मेंबर्ससाठी राखीव ठेवले जातात. सेलच्या पहिल्या 48 तासांत जवळपास साडेनऊ कोटी ग्राहक ॲमेझॉनच्या साईला भेट देतात. जवळपास 10 लाख पॅकेट्स त्याच दिवशी ग्राहकांपर्यंत पोहोचवले जातात. बटण दाबल्याच्या 24 तासांत तुमच्या घरी जे प्रॉडक्ट पोहोचवलं जातं, त्यामागे बारा महिन्यांची मेहनत असते. देशभरात ॲमेझॉनचे 42 एफसी सेंटर्स आणि हजारो लास्ट माइल स्टेशन्स आहेत. प्राइम एअर, रेल्वे, इंडियन पोस्ट यांच्या माध्यमातून हे पॅकेजेस घरपोच केले जातात. यासाठी संपूर्ण बारा महिने काम सुरू असतं. प्रत्येक दिवशी जवळपास 400 टन पॅकेजेस ट्रेनने जातात. ॲमेझॉनकडून आता जलमार्गाचेही पर्याय शोधले जात आहेत.
छोट्या सेलर्सचा मोठा फायदा
यात सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या एक ते दोन महिन्यात छोटे सेलर्स (विक्रेते) हे त्यांची संपूर्ण वर्षभराची कमाई करून घेतात. इतकी ग्राहकांकडून वस्तूंची मागणी असते. इथे छोट्या सेलर्ससाठी ॲमेझॉनची भूमिका काय, हे समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. ॲमेझॉन डॉट इन हे ॲप बनवण्यामागचं तंत्रज्ञान, ग्राहकांचा खरेदीचा अनुभव, सप्लाय चेन म्हणजे वेअरहाऊसमधील मॅनेजमेंट.. ही ॲमेझॉनची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ॲमेझॉन हा स्वत: विक्रेता नाही. तर तो इतर छोट्या-मोठ्या विक्रेत्यांकडून सामान घेऊन ते ग्राहकांपर्यंत योग्य वेळेत पोहोचवण्याचं काम करतो. गेल्या दहा वर्षांत ॲमेझॉनसोबत 14 लाख विक्रेते जोडले गेले आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी TV9 मराठीचे News App डाऊनलोड करा
तुमच्याकडे बिझनेसची एखादी कल्पना असेल. उदाहरण द्यायचं झाल्यास, तुम्ही होममेड साबण बनवत असाल, तर त्याच्या विक्रीसाठी तुम्हाला एक जीएसटी, पॅनकार्ड किंवा आधारकार्ड आणि एक फोन लागेल. तुम्ही साबण बनवून काही मिनिटांत फोनवर रेजिस्टर केलंत तर ॲमेझॉनचे लोक तुमच्या घरी येऊन ते सामान घेऊन जातील. तुमचं हेच होममेड साबण तुम्ही ॲमेझॉनच्या माध्यमातून 180 देशांत विकू शकता. इतकी ही प्रक्रिया सोपी झाली आहे. यासाठी तुम्हाला जाहिरात करण्याचीही फार गरज नाही. पूर्वी जाहिरात, वितरण ही सर्व प्रक्रिया खूप अवघड होती. छोट्या ब्रँड्सना यात यश मिळत नव्हतं. आज तुम्ही जितके युनिकॉर्न्स (1 अब्ज डॉलरपेक्षा जास्त मूल्य असलेली खासगी मालकीची स्टार्टअप कंपनी) पाहत असाल, त्यापैकी 50 टक्के ॲमेझॉनमध्येच तयार झाले आहेत, असा दावा तिवारी यांनी केला आहे. हे सर्व आज ई-कॉमर्समुळे शक्य झाल्याचं ते म्हणतात.
ॲमेझॉन कारीगर
‘ॲमेझॉन कारीगर’ हे ॲमेझॉनचंच एक प्रोग्रॅम आहे. या प्रोग्रॅम अंतर्गत जे विक्रेते चांगल्या गुणवत्तेचे प्रॉडक्ट्स बनवतात, त्यांना थेट विक्रीची संधी दिली जाते. ते थेट ॲमेझॉनकडे जाऊ शकतात किंवा को-ऑपरेटिव्हच्या माध्यमातून ॲमेझॉनपर्यंत पोहोचू शकतात. पूर्वी 10 रुपयांची वस्तू विविध मार्गांनी मार्केटपर्यंत पोहोचेपर्यंत त्याची किंमत 100 रुपये व्हायची. मात्र ॲमेझॉन विक्रेत्याला त्याच्या प्रॉडक्टची किंमत ठरवण्याचं स्वातंत्र्य देतो. ज्या किंमतीत ते सामान विकलं गेलं, तो पैसा सात दिवसांत त्यांच्या अकाऊंटमध्ये पोहोचतो. ॲमेझॉनकडून प्रत्येक जिल्ह्यात सरकारसोबत मिळून हे कॅम्प्स लावले जातात. कानपूरमध्ये अशाच प्रकारचं डिजिटल केंद्र आहे. जिथे तुम्ही तुमचं प्रॉडक्ट घेऊन गेलात, तर ॲमेझॉनची मंडळी तुम्हाला सर्वकाही समजावून सांगतील आणि सहा मिनिटांत तुम्ही तिथले विक्रेते बनाल. एखाद्याचा बांगड्यांचा व्यवयास असेल, तर त्याला ऑनलाइन ऑर्डर तपासायला सांगितलं जातं. त्याप्रमाणे ती ऑर्डर तयार केली की ॲमेझॉनचेच कर्मचारी विक्रेत्याच्या दारापर्यंत येऊन ते प्रॉडक्ट घेऊन जातात. मग देशातल्या कोणत्याही पिनकोडवर अगदी लडाखपासून लक्षद्वीपर्यंत ते सहज पाठवलं जातं.
निर्यातीचा व्यवसाय
एक्सपोर्टबद्दल बोलायचं झाल्यास, ॲमेझॉनच्या ग्लोबल सेलिंग प्रोग्रॅममध्ये जे व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट्स, जे ब्रँड्स बनतायत, त्यांचं 8 अब्ज डॉलर्सचं एक्सपोर्ट 180 देशांमध्ये झालंय. छोट्यातल्या छोट्या गावातले लोक रजिस्टर करून त्यांचं प्रॉडक्ट ॲमेझॉनवर विकू शकतात. त्यामुळे पूर्वी मधल्या मध्ये जे पैसे जायचे, तेसुद्धा आता वाया जात नाही.
ग्राहकांची रुची कशी लक्षात घेतात?
तुम्ही ॲमेझॉनच्या साइटवर काय सर्च करताय आणि किती वेळ सर्च करताय, याची सर्व नोंद ठेवली जाते. त्यावरून ग्राहकांचा कल काय, हे समजलं जातं. याविषयी तिवारी सांगतात, “लाखो लोक दररोज आमच्या ॲपवर येतात. त्यांनी काय सर्च केलं, कोणता प्रॉडक्ट पाहिला, कोणता प्रॉडक्ट किती वेळ पाहिला, कार्टमध्ये कोणत्या गोष्टी ॲड केल्या.. या सर्व गोष्टींचं एक ॲनालिटिक्स (विश्लेषण) बनवलं जातं. हे ॲनालिटिक्स आम्ही आमच्या सेलर्ससोबत शेअर करतो. दररोज ग्राहकांकडून लाखो रिव्ह्यूज आणि रेटिंग येत असतात. ग्राहकांना जी गोष्ट आवडली नाही, जी सर्वाधिक आवडली.. त्याबद्दल ते लिहितात. यावरूनही त्यांचा कल समजण्यास मदत होते. पूर्वी जाहिराती पाहून प्रॉडक्ट्स खरेदी केले जायचे. हल्लीची पिढी अशा जाहिराती पाहून प्रॉडक्ट विकत घेत नाही. ते रिव्ह्यू आणि रेटिंग पाहूनच खरेदी करतात. तिसरी गोष्ट म्हणजे आमचे बरेच सेलर फोरम्स आहेत. मदतीसाठी, सल्ल्यासाठी आणि विक्रेत्यांना एकत्र आणण्यासाठी ते काम करतात. आमचे जितके सेलर्स आहेत, त्या सर्वांना एक कस्टमाइज्ड असिस्टंट देण्याचा आमचा विचार आहे. ॲमेझॉन सहाय म्हणून ते आम्ही लाँच करतोय. तुमचा प्रॉडक्ट कोणताही असेल, ॲपद्वारे त्याची स्कॅनिंग करा.. ग्राहक ज्या ज्या गोष्टींचा विचार करतो, तो सर्व डेटा वापरून तुमच्या प्रॉडक्टचे फिचर्स तो तुम्हाला सांगतो. अशा पद्धतीने तुमचा कॅटलॉग बनतो. ही गोष्ट विक्रेता, ग्राहक आणि आमच्यासाठीही खूप फायदेशीर आहे. ग्राहकांना नेमकं काय हवंय, हे त्यातून समजतं.”
ग्राहकच देवता
“आमचा संपूर्ण व्यवसाय हा ग्राहकांवरच अवलंबून असल्याने आमच्यासाठी ग्राहकच देवता असतो. त्यामुळे एखादा प्रॉडक्ट ग्राहकाला परत करायचा असेल, तरीही आम्ही कोणताच प्रश्न विचारत नाही. आजच्या घडीला आम्ही जवळपास 12 कोटी प्रॉडक्ट्स विकतोय,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
गेल्या 10 वर्षांत काय बदल झाला?
ॲमेझॉनच्या व्यवसायात गेल्या 10 वर्षांत काय बदल झाला, याविषयी सांगताना तिवारी यांनी एक किस्सा सांगितला. “दोन महिन्यांपूर्वीची ही घटना आहे. चंबलसारख्या परिसरात मी आणि माझा एक मित्र बोटीतून प्रवास करत होतो. माझ्या मित्राला फोटोग्राफीची खूप आवड आहे. त्याने बोट चालवणाऱ्या व्यक्तीला माझ्याकडे इशारा करून विचारलं की तू यांना ओळखतोस का? अर्थातच त्यावर तो नाही म्हणाला. तेव्हा माझ्या मित्राने त्याला सांगितलं की, मी ॲमेझॉनमध्ये काम करतो. हे ऐकून बोट चालवणारा म्हणाला की, मीसुद्धा ॲमेझॉनच्या साइटवरून खरेदी करतो. आता तुम्हाला क्वचित अशी एखादी व्यक्ती मिळेल, जी ॲमेझॉनवरून आजपर्यंत एकदाही खरेदी केली नसेल, काही विकलं नसेल, ‘द फॅमिली मॅन’ सीरिज पाहिली नसेल, ज्यांना मिर्झापूर आवडली नसेल, ॲमेझॉन पे वापरलं नसेल किंवा घरी ॲलेक्सावर बातम्या किंवा गाण्यांची फर्माइश केली नसेल. गेल्या दहा वर्षांत आम्ही देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलो आहोत आणि प्रत्येक भारतीयाच्या आयुष्याचा एक भाग बनलो आहोत.”
“दहा वर्षांपूर्वी देशातील जे छोटे-मोठे मार्केट्स, बाजार होते, तिथे जाऊन आम्ही फक्त बसायचो. तिथल्या लोकांना आम्ही आमच्यासोबत फक्त एक चहा प्यायला सांगायचो. चहा पिताना आम्ही त्यांना ऑनलाइन सामान कसं विकता येतं, हे समजावून सांगायचो. बिझनेसच्या सुरुवातीला आम्ही मुंबईत खूप छोटंसं वेअरहाऊस उघडलं होतं. तिथे लोक त्यांच्या गाड्यांमध्ये सामान घेऊन यायचे. ‘फ्रॉम एक्स्ट्रा लार्ज टू एक्स्ट्रा स्मॉल’ हे डाएटिंगचं पहिलं पुस्तक आम्ही ऑनलाइन विकलं होतं. ते पहिलं पुस्तक विक्रीला जाईपर्यंत आम्ही हात जोडून बसलो होतो. आज कंपनी इतकी मोठी झाली तरी तो दिवस आम्ही कधीच विसरणार नाही,” अशा शब्दांत तिवारी यांनी अनुभव सांगितला.
“दहा वर्षांत हा देशसुद्धा खूप बदलला आहे. इंटरनेट वापरणारा वर्गही मोठा झाला आहे. डिजिटल ट्रान्सॅक्शन वाढलंय. या सर्व गोष्टींमुळे छोट्यातला छोटा व्यवसाय करणाऱ्यांचाही फायदा होतोय. या देशात डिमांडची कधीच कमतरता नाही. फक्त सप्लाय चेन मजबूत करणं गरजेचं होतं,” असं ते पुढे म्हणाले.
स्पर्धेच्या युगात आता पुढची प्लॅनिंग काय?
“अशा फार कमी कंपन्या असतात, ज्या 100 वर्षांपर्यंत चालतात. कधीकधी जेव्हा कंपनी मोठी होते, तेव्हा तुम्ही ग्राहकांना विसरून जाता. कंपनीच्या आत विविध टप्पे तयार होतात. एखाद्या निर्णयासाठी पाच ते सहा जणांकडून परवानगी घ्यावी लागते. अॅमेझॉनमध्ये आम्ही नेहमीच ‘डे वन कल्चर’वर भर देतो. तुमचा मूळ उद्देश हाच असला पाहिजे की ग्राहकांना सर्वोत्तम सेवा कशी द्यायची? आमचं इको-सिस्टिम सेलर्सवर अवलंबून आहे. आज आमचे 14 लाख सेलर्स आहेत, तो आकडा एक कोटी बनवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. त्यासाठी लागणारं तंत्रज्ञान आम्ही विकसित करू. मग ते व्हॉईस शॉपिंग असो, व्हिज्युअल शॉपिंग असो..,” असं तिवारी यांनी सांगितलं.
एकीकडे AI मुळे माणसांची नोकरी जाण्याची भीती असताना ॲमेझॉनच्या फुलफिलमेंट सेंटरमध्ये सर्वसामान्यांपासून मूक-बधीर, दिव्यांग व्यक्तीसुद्धा काम करताना दिसतात. अद्ययावत तंत्रज्ञान वापरून पॅकेजिंग करण्याचं काम हे सर्वजण करतात. याविषयी सांगताना ॲमेझॉन इंडिया ऑपरेशन्सचे उपाध्यक्ष अभिनव सिंग म्हणाले, “AI आणि तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी आमच्या व्यवसायासाठी माणूस हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणूनच आम्ही दिव्यांग, मूकबधीरांनाही कामाची संधी दिली. हे लोक फक्त कामच करू शकणार नाहीत, तर त्यात त्यांचा सर्वांगीण विकाससुद्धा झाला पाहिजे. यापैकी काही लोक मॅनेजर लेव्हलला काम करतायत. ॲमेझॉनच्या नेटवर्कमध्ये अॅसिड हल्ल्यातील पीडितसुद्धा काम करतात. आम्हाला फक्त बिझनेसच्या पातळीवर प्रभाव टाकायचा नाही तर माणुसकीच्या पातळीवर प्रभाव निर्माण करायचा आहे.”
ॲमेझॉनची ऑर्डर तुमच्या दारापर्यंत कशी पोहोचते?
ॲमेझॉनच्या वेअरहाऊसमध्ये तुमची ऑर्डर आल्यानंतर स्कॅनरद्वारे ती उचलून एका डब्ब्यात टाकली जाते. तो कंटेनर नंतर कन्वेयर बेल्टद्वारे पॅकिंग स्टेशनपर्यंत पोहोचवलं जातं. तिथे सामानाची पॅकिंग होते. पॅकिंगच्या वेळी कोणता बॉक्स वापरायचा हे सिस्टमच सांगतं. त्यानंतर ते पॅकेज स्लॅम स्टेशनला पोहोचतं. तिथे लेबलिंग केलं जातं. त्यावेळी पुन्हा रिअल टाइम कॅल्क्युशेन केलं जातं. डिलिव्हरी टाइम आणि तारखेनुसार कोणत्या मार्गे ते पॅकेज पोहोचवायचं, याचा निर्णय घेतला जातो. त्यानंतर ते पॅकेज सॉर्टेशन सेंटर्सला पोहोचतं. तिथे कोणतं सामान कुठे जाईल ते ठरवलं जातं. देशभरात ॲमेझॉन आणि त्यांचे पार्टनर्स मिळून दोन हजार लास्ट माइल स्टेशन्स आहेत. तिथून ते पॅकेज ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचवलं जातं. अनेकजण डिलिव्हरीचं काम करतात.