मुकेश अंबानी यांच्या बंधूंना दुप्पट आनंद, या दोन घडामोडींमुळे अनिल अंबानी यांना ‘अच्छे दिन’चे संकेत
Anil Ambani Reliance Infra share: रिलायन्स इन्फ्राकडून बुधवार सांगण्यात आले की, कंपनीच्या स्टँडअलोन बाह्य कर्जामध्ये 806% ची लक्षणीय घट झाली आहे. ही रक्कम 3,831 कोटी रुपयांवरून 475 कोटी रुपयांवर आली आहे. त्यामुळे कंपनीचे समभाग सात टक्क्यांहून अधिक वाढले.
देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक आणि रिलायन्स समूहाचे चेअमरन मुकेश अंबानी यांचा प्रगतीचा आलेख नेहमी चढताच राहिला आहे. परंतु त्यांचे बंधू अनिल अंबानी यांच्यासमोर नेहमी संकटे राहिली आहेत. त्यांच्या कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या होत्या. आता दीर्घ कालावधीनंतर अनिल अंबानी यांच्यासाठी चांगली बातमी आली आहे. अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने आपले कर्ज चुकवले आहे. दुसरीकडे पुन्हा एकदा रिलायन्स पॉवरच्या शेअरने आपली पॉवर दाखवली आहे. या शेअरला बाजारात अपर सर्किट लागले आहे.
कंपनीने कर्ज चुकवले
रिलायन्स इन्फ्राकडून बुधवार सांगण्यात आले की, कंपनीच्या स्टँडअलोन बाह्य कर्जामध्ये 806% ची लक्षणीय घट झाली आहे. ही रक्कम 3,831 कोटी रुपयांवरून 475 कोटी रुपयांवर आली आहे. त्यामुळे कंपनीचे समभाग सात टक्क्यांहून अधिक वाढले. बीएसईवर ट्रेडिंग दरम्यान रिलायन्स इन्फ्राचे शेअर 254.40 वर गेले होते. या शेअरमध्ये बुधवारी तब्बल दहा टक्के वाढ झाली आहे.
एलआयसीसोबत केली सेटलमेंट
रिलायन्स इन्फ्राने जाहीर केले की, कंपनीने इन्व्हेंट ॲसेट सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडकडून कर्ज घेतले होते. कंपनीने काही चार्ज केलेल्या सिक्युरिटीजचे नूतनीकरण केले आहे. यामुळे इन्व्हेंट एआरसीची फंड-आधारित थकबाकी शून्यावर येते. तसेच कंपनीने एलआयसी, एडलवाइस एसेट रिकंस्ट्रक्शन कंपनी, आयसीआईसीआई बँक, युनियन बँक आणि इतर अनेक बँका आणि अग्रगण्य वित्तीय संस्थांची थकबाकी पूर्ण भरली आहे. कर्जातील ही मोठी कपात ही कंपनीसाठी मोठी उपलब्धी आहे.
कंपनीने एलआयसीसोबत वन टाइम सेटलमेंट केली आहे. एलआयसीची थकबाकी 600 कोटी रुपये भरली आहे. कंपनीने एनसीडीच्या संदर्भात एडलवाईसला 235 कोटी रुपये पूर्ण दिले आहेत. बाह्य कर्जात घट झाली आहे. यामुळे रिलायन्स इन्फ्राची एकूण नेटवर्थ सुमारे 9,041 कोटी रुपये अपेक्षित आहे.
रिलायन्स पॉवरला अपर सर्कीट
अनिल अंबानी यांची दुसरी कंपनी रिलायन्स पॉवरच्या शेअर्सने बुधवारी अपर सर्किटला स्पर्श केला. बीएसईमध्ये हा शेअर 31.32 रुपयांवर पोहोचला. कंपनीने सांगितले की, सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या ई-रिव्हर्स लिलावाद्वारे 500 मेगावॅट बॅटरी स्टोरेजचा करार कंपनीला मिळाल्याची बातमी आली. त्यामुळे रिलायन्स पॉवरच्या शेअरने चांगली कामगिरी केली.