Arshad Nadeem : कधी होता एकदम कंगाल, आता पालटले पाकिस्तानच्या अरशद नदीम याचे नशीब, नीरज चोप्राला मागे टाकले कमाईत?
Arshad Nadeem Net Worth : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाचा वेध घेणाऱ्या पाकिस्तानच्या अरशद नदीम या खेळाडूचे नशीब एकदम पालटले आहे. तो गरीब कुटुंबातील आहे. पण आता त्याचे नशीब पूर्णपणे पालटले आहे. त्याने कमाईत नीरज चोप्राला मागे टाकले आहे.
पाकिस्तानचा भालाफेक पटू अरशद नदीम याने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये सुवर्ण पदक पटकावले. पाकिस्तानातील अत्यंत गरीब कुटुंबातून येत त्याने ही कामगिरी बजावल्याने त्याचे जगभर कौतुक झाले. भारताच्या नीरज चोप्राला या स्पर्धेत रजत पदकावर समाधान मानावे लागले. सुवर्ण पदक जिंकल्यानंतर अरशदची लोकप्रियता वाढली. रात्रीतूनच त्याचे नशीब पालटले. त्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती, पण आता त्याने संपत्तीत नीरज चोप्राला पण मागे टाकले आहे.
किती आहे अरशद नदीमची संपत्ती?
मीडियातील वृत्तानुसार, ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकण्यापूर्वी अरशद नदीम याच्याकडे मोठी संपत्ती नव्हते. त्याच्याकडे एक मोडकळीस आलेले घर होते. नवीन भाला घेण्यासाठी सुद्धा त्याच्याकडे पैसे नव्हते. पण आता तो श्रीमंत झाला आहे. सोशल मीडियावर पाकिस्तानी इन्फ्लूएन्सरने केलेल्या दाव्यानुसार, अरशद नदीम याच्याकडे आता 9 कार आणि 7 अपार्टमेंट आहेत. आता त्याच्या संपत्तीचा आकडा हा 47 कोटी पाकिस्तानी रुपये इतका आहे. अर्थात अरशद नदीम याने याविषयीचा कोणताही खुलासा केलेला नाही. त्याच्या चाहत्यांनी ही माहिती दिली आहे.
बक्षिसांचा नदीमवर वर्षाव
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्यासाठी नदीम याला 50 हजार डॉलर्स म्हणजे भारतीय चलनात 42 लाख रुपये मिळाले. तर पाकिस्तानी चलनात ही रक्कम 1 कोटी 40 लाख रुपये इतकी होते. याव्यतिरिक्त पंजाब सरकारने त्याला 10 कोटी रुपये बक्षिस जाहीर केले. त्यानंतर अजून पण इतरांनी त्याला आर्थिक मदत केली आहे.
नीरज चोप्राला टाकले मागे
पाकिस्तानी माध्यमांच्या दाव्यानुसार, नदीम याच्या संपत्तीत सातत्याने वाढ होत आहे. पहिल्यांदाच देशासाठी सुवर्ण पदक जिंकल्याने मोठे नेते, व्यावसायिकांनी त्याला अनेक भेट वस्तू दिल्या. तिथल्या पंजाब राज्याचे मुख्यमंत्री, सभापती आणि इतर नेत्यांनी त्याला मोठा निधी बक्षिस म्हणून दिल्याचा दावा करण्यात येत आहे. पाकिस्तानच्या माध्यमांच्या दाव्यानुसार, नदीमची संपत्ती ही नीरज चोप्रा पेक्षा अधिक आहे. नीरज चोप्रा याची एकूण संपत्ती 37 कोटी रुपये इतकी आहे. अर्थात भारतीय चाहत्यांनी पाकिस्तानी माध्यमांचा हा दावा फेटाळला आहे.