Mukesh Ambani Birthday : श्रीनाथजींचे परम भक्त, नाश्ता, जेवणात काय घेतात? ; मुकेश अंबानी यांची लाइफस्टाईल कशी?
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा आज वाढदिवस आहे. देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून मुकेश अंबानी यांच्याकडे पाहिले जाते. मुकेश अंबानी अब्जाधीश असले तरी वैयक्तिक जीवनात ते अत्यंत साधे आहेत.
मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. जगभरातील श्रीमंतांच्या यादीतही त्यांचा वरचा क्रमांक लागतो. प्रचंड संपत्तीचे धनी असलेले मुकेश अंबानी हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अत्यंत साधे आहेत. तसेच धार्मिक प्रवृत्तीचे आहेत. पूजाअर्चा करतानाचे त्यांचे फोटो वरचे वर व्हायरल होत असतात. मुकेश अंबानी यांचे कधी कार्पोरेट जगतातील फोटो व्हायरल होतात, तर कधी कौटुंबीक सोहळ्यातील तर कधी मंदिरात पूजाअर्चा करतानाचे. त्यामुळे अंबानी यांचा लोकसंपर्कही दिसून येतो.
मुकेश अंबानी यांचा मुंबईत अलिशान अँटालिया बंगला आहे. जगातील सर्वात महागड्या घरांपैकी त्यांचा बंगला आहे. या घरात सर्व लक्झरी सुविधा आहेत. घरातच श्रीकृष्णाचं एक मोठं मंदिर आहे. अंबानी कुटुंबाच्या स्टेट्सच्या हिशोबाने हे अतिविशाल मंदिर आहे. अंबानी कुटुंब हे मूळ गुजराती आहे. गुजराती समाजात श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णाच्या श्रीनाथ स्वरुपाला प्रचंड मान्यता आहे. मुकेश अंबांनीही राजस्थानमधील प्रभू श्रीनाथाचे परमभक्त आहेत. कंपनीशी संबंधित कोणतीही मोठी घोषणा असेल, घरातील कोणतंही शुभ कार्य असेल प्रत्येकवेळी मुकेश अंबानी श्रीनाथजींचं दर्शन घेतात आणि पुढील कार्य करतात.
करोडोंचे दान
एवढेच नव्हे तर मुकेश अंबानी सिद्धिविनायक मंदिर, तिरुपती बालाजी मंदिर आणि केदारनाथ मंदिरालाही दरवर्षी करोडो रुपये दान करतात. याशिवाय त्यांनी कुटुंबातील लग्न सोहळे रितीरिवाजप्रमाणेच केले आहेत. वडील धीरूभाई अंबानी यांच्या श्राद्धाशी संबंधित धार्मिककार्यही ते रिवाजानुसारच करत असतात.
कशी आहे लाइफस्टाईल?
मुकेश अंबानी यांची लाइफस्टाईल अत्यंत साधी आहे. मात्र, स्वयंशिस्तीवर त्यांचा अधिक भर असतो. सकाळी 5.30 वाजता ते उठतात. हलका नाश्ता घेतात. नाश्त्यात ताजे फळ आणि पपयाचा ज्यूस घेतात. त्यानंतर ते मेडिटेशन करतात. मुकेश अंबानी अत्यंत साधं आणि सात्विक अन्न घेतात. दिवसभर ते हलका आहार घेतात. शिवाय थोडे थोडे खातात. त्यांच्या जेवणात सूप, सॅलड, घरी बनवलेली डाळ, चपाती आणि गुजराती पदार्थ असतात. सकाळी योगा आणि द्नायधारणा केल्यानंतर मुकेश अंबानी रात्रीही आपल्या आरोग्याची काळजी घेतात. रात्री जेवणानंतर ते नियमितपणे फिरायला जातात. त्यामुळे 66 व्या वर्षातही त्यांनी स्वत:ला फिट ठेवलं आहे.