ATM PF Withdrawal : ATM मधून कोण आणि कसे PF काढणार? जाणून घ्या A टू Z माहिती
EPFO, IT सिस्टिम अपग्रेड करत आहे. त्यामुळे नोकरदार वर्ग त्यांची पीएफ खात्यातील रक्कम, बँक खत्यातील रक्कमेप्रमाणे ATM मधून काढू शकणार आहे. पण ही प्रक्रिया कशी आहे, एटीएमच्या मदतीने कशी ही रक्कम काढता येईल, जाणून घ्या...
जर तुम्ही नोकरदार व्यक्ती असाल आणि पीएफ खात्यात तुमच्या पगारातून एक ठराविक रक्कम जमा होत असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. सध्या लोकांना पीएफ काढताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. पीएफ रक्कम काढण्यासाठी अर्ज केल्यावर, त्या अर्जावर एक आठवडा केवळ प्रक्रिया करण्यात येते. त्यानंतर हा अर्ज तांत्रिक कारणासाठी बाद होण्याची भीती असते. विशेष म्हणजे पीएफची रक्कम तुमच्या खात्यात जमा व्हायला पण बराच कालावधी लागतो. क्लेम रिजेक्ट होण्याच्या घटना वाढल्याने, त्याविषयी कर्मचाऱ्यांनी अशात बऱ्याच तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे EPFO ने बँक खात्याप्रमाणेच, पीएफ रक्कम काढण्यासाठी ATM सुविधा देण्याची घोषणा केली आहे. पण ही प्रक्रिया कशी आहे, एटीएमच्या मदतीने कशी ही रक्कम काढता येईल, जाणून घ्या…
कोण काढू शकणार ATM मधून पीएफ रक्कम?
EPFO सदस्य आणि त्याचे वारसदार एटीएमचा उपयोग करुन थेट पीएफवरील जमा रक्कमेवर दावा करू शकतात. ईपीएफओ, बँक खाते आणि ईपीएफ खाते यांना जोडण्याची परवानगी देते. पण अद्याप हे स्पष्ट झाले नाही की ते थेट एटीएममधून रक्कम काढण्यासाठी कोणते तंत्र वापरणार.
कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास, त्याच्या वारसदारांना एटीएमचा वापर करुन त्याच्या पीएफ खात्यातील रक्कम काढता येईल. पण त्यासाठी वारसदारांचे खाते सुद्धा कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्याशी जोडावे लागणार आहे. अर्थात याविषयीची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप ईपीएफओने दिलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, एकूण पीएफ रक्कमेतील 50% रक्कम काढण्याची सुरुवातीला परवानगी देण्यात येईल. मयताच्या वारसदारांना ATM मधून पैसा काढता येईल. EDLI योजनेतंर्गत मयत सदस्याच्या कुटुंबाला 7 लाख रुपयांपर्यंतचा विमा दावा करता येईल. ही रक्कम पण एटीएममधून काढता येईल.
पीएफचा पैसा कसा काढता येईल?
EPFO च्या नियमानुसार, बँक खात्याची जोडणी करणे आवश्यक आहे. ईपीएफ खात्याशी सदस्याचे बँक खाते जोडणे आवश्यक असेल. पण अद्याप काही गोष्टी ईपीएफओने स्पष्ट केल्या नाही. ईपीएफ खात्यातून रक्कम काढण्यासाठी बँकेचे एटीएम वापरता येणार की दुसरे एखादे नवीन कार्ड पीएफ खाते देणार हे काही स्पष्ट झाले नाही.
जून 2025 पासून काढता येणार रक्कम
नोव्हेंबर महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात ही बातमी समोर आली होती की, सरकार ईपीएफ सदस्याला एटीएम कार्डद्वारे रक्कम काढण्यासंबंध तजवीज करत आहे. त्यानुसार ईपीएफओ सदस्याला त्याच्या पीएफ खात्यातील जमा रक्कमेतील 50 टक्के रक्कम काढण्याचा पर्याय देण्यात येईल. आता ही सुविधा मे ते जून 2025 या काळात देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. EPFO 3.0 लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना एटीएममधून पीएफ काढता येईल.