ट्रम्प मेहरबान तो एलॉन मस्क पहेलवान! कमाईचे तोडले सर्व रेकॉर्ड
Donald Trump, Elon Musk Networth : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प आल्यावर जगाची डोकेदुखी वाढणार हा अंदाज अगदी अचूक ठरला. अमेरिका फर्स्ट या धोरणामुळे त्यांनी जगाला वेठीस धरले आहे. दरम्यान या धोरणाचा ट्रम्प यांचे कट्टर समर्थक एलॉन मस्क यांना मोठा फायदा झाला आहे.

अमेरिकेतली शेअर बाजारात बुधवारी मोठी तेजी आली. त्यामुळे टेक्नॉलॉजी क्षेत्रातील अनेक शेअरमध्ये तेजी दिसली. Nasdaq 12.16% टक्क्यांनी उसळला. या तेजीमुळे अमेरिकेतील अनेक श्रीमंतांना मोठा फायदा झाला. टॉप 10 गर्भश्रीमंतांच्या एकूण संपत्तीत जवळपास 140 अब्ज डॉलरची तेजी दिसली. इलेक्ट्रिक कार तयार करणाऱ्या टेस्लाच्या शेअरमध्ये 22.69% तेजी दिसली. या घडामोडींमुळे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचा सीईओ एलॉन मस्क याच्या संपत्तीत 35.9 अब्ज डॉलरची म्हणजे भारतीय चलनात 30,88,90,42,10,000 रुपयांची तेजी दिसली. ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्सनुसार मस्क याची एकूण संपत्ती आता 326 अब्ज डॉलरवर पोहचली आहे. या वर्षात त्याच्या संपत्तीत 107 अब्ज डॉलरची घसरण दिसून आली होती.
अशी वाढली संपत्ती
ॲमेझॉनच्या शेअरमध्ये 11.98% तेजी दिसून आली. त्यामुळे कंपनीचे सहसंस्थापक जेफ बेजोस यांच्या एकूण संपत्तीत 18.5 अब्ज डॉलरची तेजी दिसून आली. या अपडेटसह बेजोस यांची एकूण संपत्ती 210 अब्ज डॉलरवर पोहचली आहे. जगातील श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावरील फेसबुकचे मार्क झुकरबर्ग यांच्या एकूण संपत्तीत 25.8 अब्ज डॉलरची तेजी दिसली. या तेजीसह त्यांची एकूण संपत्ती 207 अब्ज डॉलरवर पोहचली आहे.




तर वॉरेन बफे यांच्या संपत्तीत 8.12 अब्ज डॉलर, लॅरी एलिसन यांच्या एकूण संपत्तीत 15.5 अब्ज डॉलर, बिल गेट्स यांच्या संपत्तीत 4.81 अब्ज डॉलर, लॅरी पेज यांची नेटवर्थ 11.0 अब्ज डॉलर, स्टीव बालमर यांच्या संपत्तीत 11.2 अब्ज डॉलर आणि सर्गेई ब्रिन यांच्या एकूण संपत्तीत 10.2 अब्ज डॉलरची तेजी दिसून आली.
अंबानी आणि अडाणी यांची संपत्ती
एआय चिप तयार करणारी कंपनी एनव्हिडिया मध्ये 18.72% ची तेजी आली. त्यामुळे कंपनीचे सीईओ जेंसन हुआंग यांच्या संपत्तीत 15.5 अब्ज डॉलरची भर पडली. मायकल डेल यांच्या संपत्तीत 10 अब्ज डॉलर आणि जिम, रॉब आणि एलिस वॉल्टन यांच्या संपत्तीत 7 अब्ज डॉलरची तेजी दिसली. तर भारतीय शेअर बाजारात काल मोठी घसरण दिसून आली.
मुकेश अंबानी आणि गौतम अदानी या दिग्गजांच्या एकूण संपत्तीत मोठी घसरण आली. अंबानी हे 84.1 अब्ज डॉलर संपत्तीसह श्रीमंतांच्या यादीत 17व्या क्रमांकावर आहेत. तर अदानी हे (69.9 अब्ज डॉलर) 21 व्या क्रमांकावर आहेत. यंदा जगातील टॉप 20 श्रीमंतांपैकी 17 जणांच्या श्रीमंतीत घसरण आली. सर्वाधिक कमाई वॉरेन बफे (20 अब्ज डॉलर) यांनी केली आहे.